वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी
वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी
प्रा. पवार अलोक अर्जुन अलका
ते दोघेही नोकरी करत होते. कला आणि मनोज दोघांची नोकरी अत्यावश्यक सेवेमधली होती त्यामुळे दोघांनाही नोकरीवर कोरोनाची भयानक परिस्थिती असूनही जावे लागत असे. एक बाजूला रोजचे मृत्यूचे वाढते आकडे कानावर यायचे. पण यांच्या नोकरीवरची सेवा त्यांना करायलाच लागे. एके दिवशी अचानक कलाला तिच्या नवऱ्याचा फोनवरून फोन येतो की, "तुमचे अहो सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहेत, त्यांना श्वास घ्यायला अतिशय प्रॉब्लेम होतोय. त्यांची कोरोना ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे." ही बातमी ऐकूनच कलाच्या पायाखालची जमीन हलते. कलाच्या सासू आणि सासऱ्यांना दोघांनाही मधुमेहाचा त्रास होता. सासऱ्यांचं नुकतंच अटॅक येऊन गेल्यामुळे मोठं आजारपण निस्तरल होत त्यामध्ये कला आणि मनोज च होत तेवढी साठवणूक घालवली होती. कलाला आता सर्व निर्णय एकटीलाच घ्यायचे होते. ती कामावर होती त्यामुळे तिने त्वरित तिच्या वरिष्ठांना कळवून तेथून बाहेर पडली आणि सिटी हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे बाहेर न रिक्षा होती ना बस. तिचे घर जवळ असल्यामुळे ती घरून कामावर ये जा ही चालतच करीत होती. तिचे घर अगदीच लहान म्हणजे वन रूम किचन आणि एक छोटीशी बाल्कनी होती. कला जेंव्हा लग्न करून त्या घरी आली तेव्हा तिला बाल्कनीच्या शेजारीच दुसऱ्या बाल्कनीमधल्या एका नुकत्याच लग्न झालेल्या मैत्रिणीशी सुलभाशी ओळख झालेली होती. तिने रस्त्यातूनच तिला फोन लावला आणि सर्व परिस्थिती सांगितली आणि तेथूनच माझ्या सासू सासऱ्यांना रात्रीचे जेवण देशील का अशी विनंती केली. सुलभा ही स्वभावाने अतिशय चांगली होती. तिने लगेचच बाल्कनीमधून कलाच्या सासूला बाल्कनीमधून आवाज देऊन दोन कप चहा दिला आणि आजचे जेवण देखील असे बाल्कनीमधून मीच देईल तुम्ही बनवू नका मी कलाला सांगितले आहे असे सांगितले.
इकडे दवाखान्यात पोहोचल्यावर कला ला रिसेप्शन वर आल्या आल्या तुम्ही का मनोज यांच्या पत्नी , हे पैसे तुम्हाला जमा करावे लागतील, मनोज ला ऑक्सिजन सिलेंडर लावला आहे. कलाने लगेच तिचे डेबिट कार्ड काढले आणि पैसे भरले कलाचा बँक बॅलन्स एकदमच नाहीच्या बरोबर होता. आणि रिसेप्शन वर तुम्हाला उद्याही पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आले. मनोज थोडा सिरीयस होता इतके कळले पण त्याला बघता कुठे येतेय. नवा माणूस मास्क घालून फक्त रिसेप्शन पर्यंतच येऊ शकत होता. कला हिला आता हॉस्पिटलमध्ये रोज यावे लागणार मग घरी मधुमेहाने त्रस्त असलेल्या सासू सासऱ्यांकडे जाणे चुकीचे ठरेल म्हणून तिने निश्चय केला की ती तिच्या नसलेल्या माहेरी जाणार. कलाचे वडील सहा वर्षांपूर्वी वारले होते. कला त्यांच्या जागीच नोकरीला लागली होती. आणि आई मागच्याच वर्षी कर्करोगाने गेली होती. त्या घराची चावी कला कडेच होती. तिने परत त्या बाजूच्या मैत्रिणीला फोन लावून मला थोडे दिवस तिकडे येणे शक्य नाही तर तू माझ्या सासू सासऱ्यांना जेवण वैगरे करून देशील का? आम्ही कामानिमित्त दुसरी कडे जातोय असे त्यांना सांगाव लागणार आहे. ही बाल्कनी मधली मैत्रीण थोड्याच दिवसात जीवस्य कंठस्य मैत्रीण झाली होती. तिने काळजी करू नकोस मी बघते इकडे असे सांगितले.
कलाकडे तिचे मंगळसूत्र होते. ती ज्या ठिकाणी काम करीत होती तेथील एका व्यक्तीच्या वडिलांचे सोनराचे दुकान होते जे लॉकडाऊन मध्ये बंद होते. कलाने त्याला लगेचच फोन फिरवला आणि सर्व परिस्थिती कळवली. दुकान उघडणे अशक्य असूनही त्याने त्याच्या वडिलांना दुकान उघडायला लावून कलाचे मंगळसूत्र गहाण ठेवून तिला पैसे द्यायला लावले. बाल्कनीमधली मैत्रीण आणि हा ऑफिस मधला व्यक्ती यांच्या सहकार्याने आत्तापर्यंत सर्व तारले होते. कला आईच्या घरी आली होती. ती खुर्चीवर बसली. सर्व घरात जळमटे लागली होती. ती आईच्या घरी सगळीकडे खुर्चीवर बसून बघत होती. तिचे लक्ष किचनकडून बाहेरच्या बाजूला उघडणाऱ्या दुसऱ्या दरवाज्याकडे गेले. ती उठून लगेच त्या दरवाज्याकडे गेली. दरवाजा उघडताच मोठी हवेची झुळूक आतमध्ये आली. आणि बाहेर तिला एक विलक्षण चित्र दिसले.
बागेमधल्या लिंबाच्या झाडाला टपोरी लिंब लटकत होती. सीताफळाच्या झाडालाही प्रचंड सिताफळे आली होती. तुळशी वृंदावनातली तुळस देखील मंजिऱ्यानी बहरली होती. आईने वड आणि पिंपळाच्या झाडाचे बोन्साय केले होते ती झाडे अगदी झुपकेदार वाढली होती. कलाने सर्व विसरून सीताफळ तोडले आणि सर्व विसरून ती खाऊ लागली होती तिच्या आईची तिला प्रचंड आठवण झाली होती. कोणीही पाणी घालायला नसूनही सोसायटीमधील वाहते पाणी झाडांना कसे मिळेल आणि रोजच्या घरातील ओल्या कचऱ्याचा निचरा कसा होईल हे तिने बघितले होते. कलाला बागेत गेल्यावर लगेच तिचे सीताफळ खाता खाता एक फोन आला, मनोज चे ऑक्सिजन काढले आहे आता तो बरा आहे, त्याला फक्त विलगीकरणात ठेवावे लागणार. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे काल भरलेले काही पैसे सुदधा तिला रिफंड होणार होते. कलाने त्या रात्री झोपणे सोडून आईची खोली व्यवस्थित आवरली. दुसऱ्या दिवशी मनोज ला स्वतःच्या घरी न जाता आईच्या घरी पाठवले सोबत रोज त्या आईच्या घरी बाल्कनी मध्ये बसायचे, जेवणाचा डब्बा येईल जर ताटात काही उरले तर त्याचे उष्टे कसे कुंडीत टाकायचे, झाडांना पाणी घालायचे याची एक यादीच कलाने हॉस्पिटलच्या रिसेप्शन कडे लिहून दिली होती. मनोज चे चौदा दिवस अगदी कसे गेले त्यालाही कळले नाही कधीतरी तो बागेत डुलकी मारायचा. कला चा डब्बा आला की दार उघडून बघायचा आणि तिला लांबूनच हात दाखवायचा. मनोज घरी आला पण कलाला रुखरुख लागली होती तिने मनोज ला ती आईच्या घरातील सर्व झाडे इकडे याघरी आणू देत का हे विचारले, मनोज स्वतः चल जाऊयात आणायला. असे म्हणून दोघांनी निदान सतरा ते अठरा कुंड्या गाडीवर फेऱ्या मारून घेऊन आले. कला ची बाल्कनीमधली मैत्रीण हे पाहून खूप खुश झाली. तिने देखील बाल्कनी मध्ये झाडे आणायचा निश्चय घेतला.
ही कहाणी पूर्णपणे काल्पनिक असली तरीही विकतच्या ऑक्सिजनचा आणि त्या झाडांचा परस्पर कुठे तरी संबंध येतोच ना. आज वट सावित्रीचे व्रत आहे. बऱ्याच स्त्रिया हे व्रत करतात. वडाच्या झाडाभोवती ज्या वेळी सात फेऱ्या मारतात तेंव्हा नकळत वडाच्या झाडातील उत्सर्जित ऑक्सिजनची प्राप्ती त्यांना होत असते. वडाच्या झाडाचे महत्व खूप आहे. हा मोठा वृक्ष इतका मोठा पसरतो कि त्याच्या छायेखाली खूप थंडावा असतो, त्यातून मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा देखील प्रचंड मोठा असतो. या वृक्षांचे आणि आपले नाते अगदी अकाउंट मधल्या टॅली सारखे असते आपण त्यांना जपले तर ते आपल्याला भरघोस ऑक्सिजन देतात. आणि त्यांना जपणे म्हणजे काय तर त्यांना फक्त थोडे मोठे होईपर्यंत पाणी घालणे.
सत्यवान आणि सावित्री ची कथा आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आजही कुठेतरी ताजी वाटते. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांना पुन्हा दृष्टी आणली आपले गेलेले राज्य पुन्हा प्राप्त करून दिले. आज सावित्री कोणीही बनू शकते फक्त निसर्गातील या गोष्टींवर विश्वास ठेवला तर. आपण निसर्गाचे देणेकरी लागतो. निसर्गाचा मानवाने बराच ऱ्हास केला आहे. डोंगर फोडले, नद्यांना बांध घातले, रस्ते बांधणी करताना मध्ये येणारे मोठे मोठे वृक्ष तोडले आहेत. त्यामध्ये बरेच पक्षी यांची घरटी तुटली. त्यांची पिल्ले म्हणजे अंडी फुटली. अगदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालगतची झाडे देखील रस्तारुंदी मध्ये तोडली. तेंव्हा सुंदरलाल बहुगुणा सारखे चिपको आंदोलन पुण्यातल्या स्त्रीवाद्यांकडून किंवा वृक्षप्रेमी यांच्याकडून राहूनच गेले. म्हणजे वृक्ष वाचविण्याची मोहीम ही त्यांनीच करावी असे काही नाही पण अजूनही वेळ आहे. कोरोनाने आपल्याकडून बरेच हिरावले आहे तसेच आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. वट सावित्री च्या निमित्ताने आणि कोरोनाच्या बहाण्याने आपण निदान प्रति व्यक्ती एक याप्रमाणे एक वृक्ष लावण्याची आणि जमले तर त्यात एक मोठा वड लावण्याचा निर्णय घेतला तर बरेच सत्यवान बरेच मनोज यांना विकतचा ऑक्सिजन घेण्याची गरज पडणार नाही.
आजचे व्रत करताना आजची सावित्री फक्त तिच्या नवऱ्यासाठीच नाही तर पूर्ण समाजाच्या साठी हे व्रत करणार आहे. ती असे वटवृक्ष असावेत त्यांना तोडू नये यासाठी व्रत करणार आहेत. ती तिच्या सत्यवानाच्या मदतीने अजून काही ठिकाणी वटवृक्ष लावण्याची मोहीम करणार आहे. ती वटाची फांदी तोडून नाही तर वडाचे झाड शोधून पूजा करणार आहे. वडाची फांदी तोडून या पूजेला काहीच अर्थ नाही हे देखील ती समजणार आहे आणि समजून सांगणार आहे.

Comments
Post a Comment