नागपंचमी

 नागपंचमी

प्रा. पवार अलोक अर्जुन अलका

हिंदू संस्कृतीला अनुसरून आपण देवतांना तर पूजतोच पण या देवतांमध्ये आपल्याला बरेचदा निसर्गातील काही ठळक ठराविक तरतुदी समोर येताना दिसतात. ज्यामध्ये शंकरासोबत नंदी, नाग, देवी सोबत सिंह, अगदी गणपती सोबत उंदीर दिसून येतो. निसर्गातील याच गोष्टींना मान देणे हे आपण या विविध सणांद्वारे शिकतो आणि शिकणेच अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीमागील शास्त्र समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. सर्व प्रथम आपण पारंपरिक पुराण काय सांगतात याकडे पाहू.

गरुड पुराणानुसार, एका ब्राम्हणाला सात मुलं होती, सर्वांची लग्न झाली होती. श्रावण महिना आल्याने सात सुनांपैकी सहा सुना या माहेरी मार्गस्थ होतात. त्यांच्या कडे माहेरी जाण्याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यातील रक्षाबंधन. भावाला भेटण्याचा दिवस. उर्वरित सून खूप उदास होऊन देव्हाऱ्यात बघते आणि प्रार्थना करते मला भाऊ असता तर मी त्याला ओवाळले असते राखी बांधली असती. देव्हाऱ्यात असलेल्या शेषनागाला ही धाव ऐकू येताच तो त्वरित सरपटत त्या स्त्रीच्या घरी ब्राम्हण वेशात येतो आणि त्या स्त्रीला राखी बांधण्यास सांगतो. भावाच्या आशेने घरी आलेल्या शेष नागाला स्त्री राखी बांधते. दुधाची खीर खाऊ घालते. प्रसन्न होऊन शेवटी शेष नाग त्या स्त्रीला मूळ रुपात येऊन तुही थोडे दिवस माझ्या घरी म्हणजे पाताळात येण्याची विनवणी करतो. व पुढे तो तिला स्वतःच्या मस्तकावर बसवून पाताळात घेऊन येतो. पाताळात आल्यावर तिकडे शेष नाग यांची पत्नी  नागराणी हिला यांना भरपूर पिल्ले झाल्यामुळे शेष नाग या स्त्रीला दिवा घेऊन चालायला सांगतात जेणे करून कधी चालताना त्या स्त्रीच्या पायाखाली एखादे पिल्लू येता कामा नये. मात्र तरीही एकदा चुकून अंधारात त्या स्त्रीच्या पायाखाली एक पिल्लू येते व त्याची शेपटी तुटते. ती स्त्री काही दिवसांनी आपल्या घरी सासरी परत येते. 

पुन्हा एक वर्षांनी म्हणजे पुढच्या श्रावणात त्या स्त्रीला पुन्हा आपल्या भावाची आठवण होते. ती शेष नागाची प्रतिमा तयार करते. आणि त्याला पूजते. दुसऱ्या बाजूला ते जे छोटे नाग पिल्लू आहे ते मोठे झालेले असते. ते त्याच्या आईला त्याच्या शेपूट तुटण्याचे कारण विचारते. आई सांगते पृथ्वीलोक वर राहणारी तुझी एक आत्या आहे, एकदा तुझी शेपूट त्यांच्या पायाखाली आली आणि तुटली. हे सर्व ऐकून क्रोधीत नाग बदला घेण्याच्या भावनेने पृथ्वीवर त्या स्त्रीच्या घरात येतो. मात्र तिच्या घरी ती स्त्री शेषनागाची पूजा करते आहे हे पाहून हा बालक शांत राहतो. पूजा पूर्ण झाल्यावर त्या स्त्रीची नजर त्या नागाकडे जाते ती त्यालादेखील प्रसाद म्हणून खीर देते. नाग पटकन खीर ग्रहण करतो. आणि प्रसन्न होऊन त्या स्त्रीला नागांना भाऊ मानल्या बद्दल अकाल मृत्यूचे भय असल्यास त्यातून मुक्ती तर सर्प दोष जो त्याच्या शेपटी तुटल्यातून झाला होता त्यातून मुक्त करतो.

आता ही झाली एका बाजूची गोष्ट. मात्र जर आपण शास्त्रीय बाब पडताळणी केली तर साप नाग हे ग्रामीण भागात जास्तीत जास्त आढळतात. ग्रामीण भागातील बहुतांशी लोकांचा व्यवसाय हा शेती हा असतो. बराचसा शेतमाल जमा करून ठेवण्यासाठी शेतकरी बांधव घरालागत गोदामांची सोय करतात. गहू- तांदूळ अशा बऱ्याच धान्याला उंदीर घुशी यांच्यापासून हानी होते. उंदरांच्या सुळसुळाट वाढल्यास गोदामातील धान्य लवकर खराब होण्याची देखील संभावना असते. भातशेतीमध्ये बेडकांच्या वाढत्या प्रादुर्भावाने देखील त्रास होतो. अशा वेळेस या उंदीर आणि बेडकांच्या वाढीला रोखण्याचे काम नाग/ साप करीत असतात. माणसापेक्षा कित्येक पटीने लहान असलेला हा नाग स्वतःहून माणसाला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही. उलट त्याला आकाराने मोठा माणूस दिसल्यास तोच लांब पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र कधीतरी स्वतःच्या बचावासाठी त्याला सर्पदंश करावा लागतो. निसर्गाने सर्पदंशात विष भरले आहे त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो.

मात्र हेच साप नाग उंदरांचा नायनाट केल्याने एका बाजूला शेतकऱ्यांचे मित्र म्हणून कार्यरत राहतात. आणि याच मित्रासाठी एक दिवस राखीव म्हणून आपण नागपंचमी साजरी करतो. बहुतांशी खेडेगावात या दिवशी शेतामध्ये नांगर चालवणे, खड्डा खणणे या गोष्टी टाळल्या जातात. पावसाळ्यात साप बिळातून बाहेर निघतात त्यामुळे या महिन्यात नांगरणी, पिकाची काढणी करणे या गोष्टी टाळल्या जातात. आपल्या हिंदू धर्मात याच शास्त्रांचा आधार घेऊन आपण नागपंचमी साजरी करतोय शहरी भागात लुप्त होत चाललेले साप किंवा नाग हे फक्त काही सर्प उद्यानात बघायला भेटतात. मात्र आपण निसर्गातील घटकांना तितकाच सन्मान दिला तर त्यांच्या असण्याचा अर्थ आपणास लक्षात येईल.



आपल्या भारतीय चित्रपटांच्या आधारे देखील वेगळ्या पद्धतीने नाग आणि आपले नाते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीदेवी ने इच्छाधारी नागिनीच्या भूमिकेत साकारलेलं 'मे तेरी दुश्मन तू मेरा दुश्मन, मे नागीण तू सपेरा' हे गाणं आजही लोकप्रिय आहे. आधीच्या काळी गारुडी लोक सापांना पकडून त्यांचे दात आणि विष काढून त्यांना पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापरत. कथेतील नाग दूध किंवा खीर खातो मात्र सत्यामध्ये सापाला - नागाला दूध दिल्यास त्याच्या पचन संस्थेत बिघाड होऊन त्याचा मृत्यू देखील ओढवू शकतो. म्हणून नाग आणि गारुडी म्हणजेच सपेरा हे खरेच एकमेकांचे शत्रू आहेत असे म्हणले जाते. वन्यजीव संरक्षण कायद्याला अनुसरून आता सापांना पकडणे त्यांना खेळ म्हणून किंवा नागपंचमी सारख्या सणाला त्याचा कमाई साठी वापर करणे हे गैर आहे. 

या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या तरच आपण नागपंचमी खऱ्या अर्थाने साजरी करू शकतो. तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा. आपल्या भावाच्या - शेतकरी मित्राच्या सणाच्या दिनी कोणत्याही नाग किंवा सापाच्या कोणत्याही प्रजातीला स्वतःकडून त्रास होणार नाही याची दक्षता घेऊयात.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

काळभैरव जयंतीनिमित्त