लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन
दिवाळीतील सर्वात मोठा आणि विशेष दिन. देव आणि दानवांच्या युद्धावेळी जे समुद्रमंथन झाले त्यातूनच लक्ष्मीची उत्पन्न झाली आणि पुढे ती विष्णुप्रिया म्हणजेच भगवान विष्णू यांची पत्नी बनली. हिंदू धर्मातल्या जवळजवळ प्रत्येक घरात किंवा कार्यालयात लक्ष्मीपूजन अगत्याने केले जाते.
काहीही झाले तरीही लक्ष्मी प्राप्त करणे तिला आपल्या घरी आणणे. ती कायमची राहावी म्हणून दिवसरात्र मेहनत करणे हे प्रयत्न प्रत्येकजण करीत असतो. आणि ते करणे देखील गरजेचे आहेत. व्यक्ती शिकला की तो अर्थार्जना कडे वळतो. म्हणजे पैसे कमावण्यासाठी तो एकतर नोकरी किंवा व्यवसाय करतो. लक्ष्मी ही चंचल स्वरूपात असते असे म्हणतात म्हणजे ती एक जागी राहत नाही. त्यामुळे तिला सांभाळणे तितकेच जिकिरीचे काम असते.
लक्ष्मीचे रूप किंवा लक्ष्मीचा संबंध थेट धनाशी जोडला गेला आहे, म्हणजे आपण धन कशाला म्हणतो आणि त्या धनाला आपण कसे जपले पाहिजे याचा लक्ष्मीपूजनाशी संबंध आहे असे म्हणावयास हरकत नाही. व्यक्ती काहीशा प्रमाणात आपली गृहस्थी चालवली जावी यासाठी अर्थार्जन करतो, तो काम करून पैसा घरी आणतो त्याला धन म्हणू शकतो. घरातील आजी आजोबा आपल्या नातू नातवंडांना धन समजत असतात, आणि तीच त्यांच्या आयुष्यची जमा पुंजी असते, स्त्रिया आपल्या नवऱ्याला धन समजतात आणि त्यावरूनच त्याला ग्रामीण भागात 'धनी' असे देखील म्हणले जाते. बायकोला देखील लक्ष्मीस्वरूप मानले जाते, माझे भाग्य उजळवणारी भाग्यलक्ष्मी असे गृहस्थाश्रमात येणाऱ्या स्त्रियांना म्हणले जाते. तर काही ठिकाणी पहिली मुलगी झाली तर तिला देखील ' पहिली बेटी, धनाची पेटी' असे म्हणले जाते.एवढे असूनही पैसा आणि सोने याला जे मूल्य आहे लक्ष्मीची कृपा त्यावर अधिक आहे असेच मानणारे लोक जास्त आहे.
आज आपण हे लक्ष्मीपूजन वेगळ्या स्वरूपात समजून घेणार आहोत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही खर्च नाही करायचे असे म्हणले जाते, आणि त्यासाठीच लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे साहित्य आधीच खरेदी केले जाते.यामध्ये सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे 'झाडू'. लक्ष्मीपूजन हे झाडू अगदी देवघरासमोर मांडून पूजा केली जाते. रोजच्या कचरा काढणाच्या झाडूला लक्ष्मीपूजनामध्ये एवढे अनन्यसाधारण महत्व का दिले आहे? असे म्हणतात, ज्या ठिकाणी स्वच्छता आहे लक्ष्मी तेथेच वास करते. त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळी सुरू होण्याच्या आधीच घराची सजावट करणे, रंगरंगोटी करणे, स्वयंपाक घरातील भांडी घासणे ही सर्व कामे अगत्याने केली जातात. अर्थात कचरा होऊ न देणे हे अतिशय महत्वाचे काम आहे, आपल्या घरात कचरा न करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे मात्र हा कचरा उत्पन्न होणाऱ्या गोष्टींचा मज्जाव करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे असे म्हणावयास हरकत नाही.आपण कचरा काढून तो बाहेर टाकतो त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योग्य जागा आहे का हे देखील पाहिजे. म्हणजे आपण आपले घर तर स्वच्छ ठेवतो, मात्र रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कचरा करतो याचे भान देखील आपणच ठेवले पाहिजे. रस्त्यावरील प्राणी जसे की कुत्रे किंवा अन्य मोकाट जनावरे हे नेहमीच आपले अन्न शोधण्याच्या प्रयत्नात भटकत असतात ते अशा कचऱ्यातून आपल्याला काही भेटते का हे पाहत असतात आणि त्यामुळे रस्त्यावर असा कचरा पसरतो. प्राण्यांना डोके नसते मात्र आपण जर विकसित देशातील रस्ते पाहिले तर आपल्याला अजिबात असे चित्रण दिसत नाहीत. तेथे कडक कायदे केलेले दिसतात, आपल्याकडील नेतेमंडळी मात्र काहीशा मतासाठी कडक कायदे करण्यासाठी घाबरतात का हे कळत नाही. आपण घरात स्वच्छता केली की लक्ष्मी घरी येते असे जर म्हणत असू किंवा मानत असू तर रस्त्यावर आपण केलेला कचरा पाहून ती पुन्हा माघारी जाण्याची चिन्हे अधिक असतात त्यामुळे आपल्या घरासोबत आपला परिसर कसा स्वच्छ राहील याकडे देखील आपण लक्ष दिले पाहिजे. तो झाडू ती केरसुणी कदाचित आपल्याला स्वच्छता संदेश तर देत असते.
या दिवशी पूजेत ऊस ठेवला जातो. दिवाळीच्या नंतर साधारण हिवाळ्यात साखर कारखान्यात ऊसाची गाळप होते, साखर निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. आपला भारत देश हा कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो, आणि महाराष्ट्र हा साखर निर्मितीमध्ये अग्रेसर आहे. ऊस निर्मिती करणाऱ्या शेतकरी बांधवांना किंवा साखर कारखान्याशी संबंधित सर्व बांधवांना या गोष्टीपासून मिळणारे उत्पन्न हे त्यांच्यासाठी अधिक मौल्यवान असते आणि तेच महत्वाचे असते. त्यामुळे देवीसमोर बत्तासे मांडले जातात ते देखील याच उसाचे प्रतिनिधित्व करतात.
देवीसमोर आपली खातेवही ठेवून व्यापारी लोक आपली पूजा संपन्न करतात. ही खातेवही खातेवही ही थेट लेखापाल म्हणजे अकौंटिंग शी संबंधित आहेत. यामध्ये आपले येणे किती बाकी किती असा वार्षिक अहवाल लिहिला जातो. म्हणजेच वाणिज्य शिकणारा विद्यार्थी पुढे जाऊन लक्ष्मीशी आपले डील करणार आहे हे त्याने लक्षात घ्यायला काही हरकत नाही.
एकंदरीत काय जो व्यक्ती विद्यार्थी दशेत भरपूर अभ्यास करतो म्हणजे सरस्वतीला प्रसन्न करतो तो विविध मार्गांनी सरस्वतीसोबत लक्ष्मीला देखील प्रसन्न करण्याचे काम करतो. मग हा विद्यार्थी वाणिज्य शाखेतील असो, विज्ञानातील असो, कृषिअभ्यासातील असो वा कला शाखेतील असो त्याच्याकडे लक्ष्मी प्रसन्न करण्याची कला असली पाहिजे.
आपण लक्ष्मीला वैभवलक्ष्मी असे देखील म्हणतो मग व्यक्तीने आपले वैभव म्हणजे नक्की काय हे लक्षात घ्यावे पैसे कमावण्याच्या नादात जर माणसे एकमेकांपासून दूर जात असतील घरच्यांकडे लक्ष द्यायला वेळच नसेल तर ते सुख काहीच कामाचे नाही. आपले आई वडील आजीआजोबा लहान लेकरं हीच आपली वैभव लक्ष्मी आहे हे लक्षात असायला पाहिजे.
मी गावाला गेलो की तिथे एक नवीन पूजा मांडली होती गावातल्या घरी शेतीमधून जे पीक तयार होत ज्यामध्ये गहू, तूर, शेंगदाणे, कापूस, हरबरा अशा सर्व गोष्टींची मांडणी पूजेत केली होती कारण त्या धान्यसंपदे मध्येच शेतकरी बांधवांच हित सामावलेलं आहे असे दिसते. शेतकरी रक्ताचा घाम गाळून शेतीच सोन करतो, पाण्याच्या नाना प्रकारच्या सोई करून तो शेतमळे हिरवेगार करतो. त्यामुळे त्याचा गहू आणि डाळी त्याच्यासाठी सोने तर कापूस त्याच्यासाठी हिऱ्यांपेक्षा कमी नसते. ज्वारी बाजरी तर मोती म्हणावयास हरकत नाही.
लक्ष्मीपूजनाचे वैज्ञानिक स्वरूप आपण समजून घेतले पाहिजे. पैसे हे लक्ष्मीचे रूप आहेच मात्र आपल्याकडे असलेली विद्वत्ता आपल्याकडे असलेली माणुसकी, आपल्याकडे असलेली प्रेमाची नाती, आपला समाज हे सर्व आपले धन आहे. हे नवीन लक्ष्मीस्वरूप आपण ओळखले पाहिजे.
चला लक्ष्मीपूजन साजरे करूयात..
प्रा. अलोक अर्जुन अलका पवार



👍
ReplyDelete