बलिप्रतिपदा - पाडवा

 बलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा



बळीराजा - वामन - व्यूहरचना - दानशूरता... याच धर्तीवर आजचा सण साजरा करतो आहे. बळीराजा म्हणून एक प्रसिद्ध राजा, ज्याने आपली प्रजा नेहमी सुखी राहावी याचा विचार केला. बळीराजाच्या राज्यात प्रजा अत्यंत खुश होती कारण सर्वत्र शेतमळे फुलले होते. कृषी इतकी हिरवीगार होती की सर्व जण खाऊन अगदी आपल्या राजावर खुश होते. याच बळीराजाने आपले कार्यक्षेत्र देखील एक बाजूला वाढविण्याचे ठरवले होते. यासाठी त्याने जवळ जवळ १०० अश्वमेघ यज्ञ केले. बळीराजाचा पुढचा अश्वमेघ यज्ञ हा देवराज इंद्र याला शह देण्यासाठीचा होता. बळीराजा आणि इंद्र हे दोन राजांमधील युद्ध होते. इतिहास ऐकला वाचला तर इंद्र त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर तो थोडासा कावरा बावरा होतो ब्रम्हा विष्णू महेश यांच्या धावा करतो. यावेळी तो विष्णूकडे धाव घेतो. 

जवळ जवळ १०० पेक्षाही जास्त अश्वमेघ यज्ञ करून इतके राज्य जिंकले यावर या बळीराजाची पुढची नजर जेंव्हा देवराजा इंद्राच्या नगरी वर गेली तेंव्हा विष्णूला थेट युद्ध तर शक्य नव्हते तेंव्हा त्याने बटू म्हणजेच वामन रूप धारण केले. आणि हा वामनरुपी विष्णू यज्ञस्थळी पोहोचला. बळीराजा हा प्राथमिकत: राजा होता, आपली प्रजा नेहमीं सुखी राहील हा विचार त्याच्या मनात नेहमी असायचा. कृषी म्हणजेच शेतीमध्ये बळीराजाने आमूलाग्र बदल केला होता आणि क्षत्रिय असूनही त्याने लोकांचा पोशिंदा झाला होता. 

वामन एका छोट्या बटूच्या अवतारात पाहून बळीराजमधील प्रजाहितदक्ष राजा जागृत झाला आणि त्याने त्याला काय दक्षिणा पाहिजे हे विचारले. मला तीन पावले जमीन पाहिजे हे वामनाने उत्तर दिले. निसंकोचपणे बळीराजाने छोट्या बटू कडेपाहून स्वीकृती दर्शवली. बटूने स्वतःचा आकार वाढवून  पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला. व तिसरे पाउल कुठे ठेवू असे विचारले. बळीराजा आपल्या शब्दाला जागृत राहणारा असा होता. मगितल्याप्रमाणे मी वामन म्हणजेच बटू ची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे या उद्देशाने पुढचे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव असा पर्याय बळीराजाने वामानाला दिला. तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवुन वामनाने त्याला पाताळात पाठवले. आणि अशा पद्धतीने इंद्राने आपली इंद्रनगरी वाचवली. 

पुराणातल्या या गोष्टी आपल्याला बराच संदेश देऊन जातात. ज्यामध्ये बळीराजाची शूरवीरता, प्रजाहितदक्षता, कर्तव्यदक्षता असे गुण दिसून येतात तर विष्णूचे चातुर्य, व्यूहरचना या गोष्टी दिसून येतात. 

या गोष्टींवरून आपण काय शिकलो पाहिजे हे लक्षात घेण्यासारखे आहे, 'बळीराजाचे राज्य पुन्हा येऊ दे' अशी हाक शेतकरी वर्ग आपण भारतीय करीत असतो, आपल्याला येथे नक्की बळीराजा कोण आहे वामन कोण आहे याचा बोध घेतला पाहिजे. शेतकऱ्याने ज्यांच्याकडे शेती आहे त्याने आपली शेती कसली पाहिजे तिला फुलवली पाहिजे, त्यातून धान्य निघेल ते बाजारात योग्य बाजारभावात विकून समृद्ध झाले पाहिजे तेंव्हा शेतकरी पण बळीराजा होऊ शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये काही भागात पाऊस येणे पाऊस न येणे या इंद्रराज दरबारातील वरुण राजाच्या खोड्या चालू असतात. मात्र यातील वामन नक्की कोण आहे हे आपण शोधले पाहिजे. अतिप्रमाणात वृक्षतोड करणे, डोंगर पोखरून तिथे भल्यामोठ्या इमारती उभ्या करणे, या अशा अनैसर्गिक कृत्याने ढग अडवले जात नाहीत आणि पाऊस पडत नाहीत. नदी समुद्र किंवा अन्य जलस्रोत देखील स्वच्छ पाण्याचे राहिले नाहीत त्यातही माणसाने घाणीचे साम्राज्य केले त्यामुळे शेतीपर्यंत पाणी पोहोचत नाही. पाऊस न येण्याने सरकारने जाहीर केलेल्या योजना ग्रामीण जनतेमध्ये शिक्षण, संदेशवहन, वाहतूक, तंत्रज्ञान या गोष्टींचा अभाव असल्याने या बळीराजाला उभारी आणण्यासाठी कष्ट सहन करावे लागतात. 

या बळीराजा कडून जो भाजीपाला, धान्य येते त्याच्या किमती काही वेळा याच कारणाने गगनाला भिडलेल्या दिसतात त्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतो. मात्र बळीराजाचा शाश्वत विकास करावयाचा असेल तर आपण आपला पोशिंदा म्हणजेच शेतकरी बांधव याच्या कष्टाची जाणीव लक्षात घेतली पाहिजे. भरपूर प्रमाणात ज्या शेतजमिनी विकल्या जात आहेत आणि त्या नॉन अग्रीकल्चर करून त्यावर ज्या उंच उंच इमारती उभारल्या जात आहेत याने बळीराजा सुखी होईल. तेंव्हा का शेतजमिनी विकल्या जात आहेत का त्यावर इमारती किंवा औद्योगिक वसाहती होत आहेत.मग आपणच या नवीन वामनाला स्वीकारून बळीराजाला कष्टी करीत आहोत का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ही लक्षण आहेत तो असंतुष्ट असमाधानी असल्याची. 

त्यामुळे आता वेळ आली आहे बळीराजाचे राज्य परत आणण्याची, आपल्याला वामन हा या बळीराजाचा द्वारकपाल आहे तसे आत्ताही त्या वामनाशी मैत्री करून घ्यायची आहे.शेतीमध्ये शेतीचे सेंद्रिय पद्धतीने लागवड त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी समस्या सोडवल्या पाहिजेत.

स्त्रिया आजच्या दिवशी आपल्या नवऱ्याला ओवाळतात. नवरा बायकोला ओवाळणी देतो. दोघेही एकमेकांच्या प्रगतीची इच्छा व्यक्त करतात. आधीच्या काळी नवरा बायको मिळून शेती करायचे, दोघांना दिवाळीत एकमेकांना समजण्याचा एकमेकांना वेळ देण्याचा आजचा दिवस. साडेतीन मुहूर्तापैकी आजचा अर्धा दिवस त्यामुळे सोने खरेदी करणे नवीन गोष्टींची उलाढाल करण्याचा आजचा दिवस.

चला सर्वांना बलिप्रतिपदा आणि पाडव्याच्या शुभेच्छा!

प्रा. अलोक अर्जुन अलका पवार

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त