नरकचतुर्दशी

 नरकचतुर्दशी

हा जो सण आहे तो आपण एक वेगळ्या प्रकारे समजावून घेणार आहोत. दिवाळी ही हिंदू धर्मीयांमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा हा एक सण आहे आणि त्यातलाच नरकचतुर्दशी हा एक महत्वाचा भाग. आधी आपण या नरकचतुर्दशी गोष्ट समजावून घेऊ, मग त्याच्या विश्लेषणात्मक भागाकडे वळूयात. भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातले एक मोठे योध्ये किंवा रणनितीकार म्हणावयास हरकत नाही. त्यांनी महाभारत पांडवांनी जिंकावे यासाठी बऱ्याच व्यूहरचना आखल्या होत्या. श्रीकृष्ण आणि महाभारत ही कथा वाचल्यास एक मोठा व्यवस्थापक एक मोठा लीडर समोर येताना दिसतो.

मात्र महाभारताच्या देखील आधी इराक वर एक असुरी शक्ती राज करीत होती तो म्हणजे नरकासुर. या नरकासुराने अधिक शक्तिशाली आणि सुरक्षित राहण्यासाठी ब्रम्हदेवकडून एक वरदान मागितले होते की कोणताही पुरुष देवता माझा वध करू शकत नाही माझा मृत्यू हा केवळ भुदेवी म्हणजेच पृथ्वीमाते कडून होऊ शकतो. मात्र याच वराचा दुरुउपयोग करून त्याने आपला अत्याचार सुरू केला. एकूण १६००० राजकन्यांना पळवून आणणे आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांच्या मर्जीशिवाय त्यांच्याशी विवाह करण्याचे काम त्याने केले. श्रीकृष्ण हा लहानपणीपासूनच पराक्रमी असा योद्धा राहिलेला होता, मात्र त्याला यावेळी जर नरकासुरावर हल्ला करायला जायचे असेल तर तो एकटा असमर्थ होता. ब्रम्हदेवाच्या वरदानामुळे श्रीकृष्ण काय कोणताच पुरुष नरकासुराला हात देखील लावू शकत नव्हता. मात्र या १६००० स्त्रियांचा बचाव तर करायचा होता, त्यांना नरकासुराच्या जाचातून वाचवायचे होते. श्रीकृष्णाच्या दोन बायका होत्या रुक्मिणी आणि सत्यभामा. श्रीकृष्णाची तुला तुळशीच्या पानांनी मापणारी आणि चातुर्य दाखवणारी रुक्मिणी सर्वांनाच माहिती आहे मात्र आज आपण श्रीकृष्ण यांची दुसरी पत्नी सत्यभामा हिच्याबद्दल ऐकणार आहोत. श्रीकृष्ण गरुडावर आरूढ होऊन आपली पत्नी सत्यभामा हिच्यासोबत नरकासुराचा वध करण्यास निघाला. नरकासुराबरोबर युद्ध चालू असताना एका हल्ल्यात श्रीकृष्णाला तीर लागून तो बेशुद्ध पडला. नवरा असा युद्धस्थळी शत्रूच्या वाराने बेशुद्ध पडलेला पाहून सत्यभामा चिडली. आणि पुढील युद्धधुरा तिने तिच्या हातात घेतली. आणि शेवटी सत्यभामेच्या तीराने नरकासुराचा वध निश्चित झाला. सत्यभामा ही भुदेवीच रूप असल्याने तिच्याकडून हा सामना यशस्वी झाला आणि ती जिंकली. त्याकाळच्या या लढाईने सत्यभामा ही लढाऊ योद्धा किंवा त्या १६००० स्त्रियांना वाचवण्यासाठी पुढाकार घेणारी, अन्यायाविरुद्ध लढणारी अशी स्त्रीवादी म्हणून आपण तिच्याकडे पाहू शकतो. १६००० या राजकन्या जेंव्हा नवरा नरकासुराचा वध झाल्यावर आत्महत्या करावयास निघाल्या भले तेंव्हा त्यांना हा समाज असुरांच्या बायका म्हणून स्वीकारणार नाही त्यांना समाजात कोणतेही स्थान मिळणार नाही  त्यावेळी श्रीकृष्णाने या सर्व स्त्रियांशी लग्न केले. १६००० बायकांमध्ये जरी वाटणी झाली तरीही समाजात या स्त्रियांना जगायचे स्थान मिळेल त्यांच्यावर जो अत्याचार झाला आहे त्यातून त्या बाहेर निघतील या उद्देशाने सत्यभामेने आपले पती श्रीकृष्ण याना साथ दिली. कारण तिला माहिती होत की तिचे स्थान काहीही झालं तरी श्रीकृष्णाच्या मनात हृदयात हे उच्च स्थानी असणार आहे. आणि युद्ध जिंकल्याने ते तर अधिकच असणार आहे.



नरकासुर युद्धस्थळी धारातीर्थी पडल्यावर त्याने भूमाता म्हणजेच सत्यभामेच्या जवळ एक वरदान मागितले की माझा मृत्यू हा भूलोकवरील सर्वांकडून साजरा केला जावा. आणि म्हणूनच आपण या दिवाळीमध्ये हा सण साजरा करतो.

सत्यभामेने द्वापारयुगामध्ये आपले  स्त्रीवादी विचार जगापुढे मांडले होते मात्र असे असूनही आज कलयुगात देखील स्त्रिया या बऱ्याच विविध प्रकारच्या नरकासुरांच्या अत्याचाराला बळी पडताना दिसतात. मग कधी स्त्री आहे, लाचार आहे, अबला आहे म्हणून तिची होणारी अवहेलना असेल किंवा स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत त्यांच्यापुढे जे नरकासुर उत्पन्न होत आहेत त्यावर त्यांनी सत्यभामा आठवावी. स्त्रियांकडे शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे त्याचा वापर त्यांच्या नीती आखण्यासाठी होऊ शकतो. स्त्रियांकडे स्वाभिमान हे दुसरे मोठे शस्त्र आहे जो लक्षात घेतला तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. नवरा नोकरी करतोय आणि आपण फक्त चूल आणि मूल ही पारंपरिक संकुचित वृत्ती राहिली तर बाहेरचे जग किती तेजोमयी झाले आहे आणि त्याला अनुसरून आपल्यात किती बदल करायचे आहेत हे कोणत्याही सत्यभामेच्या लक्षात येणारच नाही त्यासाठी तीनेदेखील स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. आज नोकरीच्या, शेतीच्या  किंवा व्यवसाय अशा अनेक ठिकाणी स्त्रिया बाहेर पडताना दिसतात. आत्मशक्ती हे महिलांकडे असणारे तिसरे शस्त्र आहे. स्वतःमधील शक्ती जागृत करुन कोणत्याही प्रकारच्या सामन्यासाठी स्त्रिया सज्ज होऊ शकतात. फक्त आपल्यासमोर येणारा नरकासुराचा वध त्यांनी योग्य दिशेने केला पाहिजे. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण कार्यात अनेक नरकासुर दगडधोंडे मारून चिखलफेक करून त्यांचा शिक्षणप्रवाह खंडित होईल यासाठी प्रयत्न करीत होते मात्र त्या डगमगल्या नाहीत. श्रीकृष्णाप्रमाणेच महात्मा फुले यांनी देखील सवित्रीवाई फुले यांना अखंड मदत केली आणि आज बऱ्याच मुली शिक्षण घेत आहेत. 

मात्र तरीही नरकासुर डोके वर काढतो, शिक्षणाचे स्त्रियांना काय महत्व आहे, शेवटी चूल आणि मूल, पती हाच परमेश्वर, नवरा करतोय ना नोकरी तुला बाहेर पडण्याची गरज नाही अशा विविध नरकासुरी भूमिका समोर येताना दिसतात. आणि १६००० या बायकांच्या आकड्या मध्ये वाढ होताना दिसते आहे. मात्र दर वेळी आपल्याला सत्यभामा किंवा सावित्रीबाई फुले या अंधकारामधून दूर काढतील ही अपेक्षा बाळगणे मुळातच चुकीचे आहे. आणि त्यासाठीच आजचा दिवस. आपल्या आयुष्यात कोणता नरकासुर आहे हे ओळखण्याची. नरकासुर हा पुरुषच असेल असेही नाही आपले अज्ञान, आपल्यातले लपलेले सुप्तगुण जे आपण बाहेर काढू इच्छितच नाही, आपल्यातली जुनी परंपरा ज्याला पुरुषसत्ता पितृसत्ताक पद्धतीची बुरसटलेली विचारधारणा जोडली गेली आहे तिचा नाश झाला पाहिजे. 

सर्वांना नरकचतुर्दशी या विजयी दिनाच्या शुभेच्छा! सर्वांना प्रामुख्याने स्त्रियांना आपल्यातले तेज ओळखण्यासाठी दिनाच्या शुभेच्छा!

प्रा. अलोक अर्जुन अलका पवार

Comments

  1. सणाच्या निमित्ताने कथेच्या माध्यमातून समकालीन परिस्थितीचे खूपच सुंदर अवलोकन केले आहे. कारण आजच्या काळातील सत्यभामा आणि श्रीकृष्ण यांच्या वाटादेखील तितक्याच काटेरी आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. वाटा सोप्या असतील तर काय कोणीही पुढे जाईल, काटेरी मार्गांवरून पदक्रमण करण्यात जी मज्जा आहे ती काहीशी वेगळीच... अनुभव आणि मार्ग

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त