अनुसया पुत्र दत्तात्रय
अनुसया पुत्र दत्तात्रय
प्रा. अलोक पवार
आजचा दिवस सर्व लोक दत्तजयंती म्हणून साजरा करतोच मात्र या सर्वामंध्ये जर कथा विशेष बघितला तर आपण सपशेल अनुसया नामक देवीला विसरतो. स्त्रियांचा विसर, स्त्रियांनी केलेल्या त्यागाचा विसर पडणे ही नवीन गोष्ट नसली तरीही आपल्याकडील पुरातन गोष्टींमध्ये, पुराणात, लेखांत जे सीता, राधा, लक्ष्मी, पार्वती आधी स्त्री देवतांविषयी गोष्ट आहे ती आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे भक्ती करणे गरजेचे आहे. कारण सर्वांना दत्तात्रय माहिती आहे मात्र दत्तात्रय घडविणारी माता सर्व जण विसरले आहेत तर आठवणीत आणण्याचा आजचा दिवस दत्तजयंतीचा.
महान ऋषी अत्रीमुनींची पत्नी अनुसया. अनुसया ही अतिशय पवित्र आणि पतिव्रता म्हणून प्रसिद्ध होती. आश्रमात आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे त्या आदरातिथ्याने स्वागत करीत आणि त्यांच्या भोजनाची आणि संपूर्णच मानपानाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायच्या. या आश्रमात आलेला एकही पाहुणा तो जरी भिक्षुक असला तरीही अतृप्त होऊन परत जात नसे. अशा अनेक ऋषीमुनींचे, भिक्षुक्षांचे, पाहुण्यांचे आशीर्वाद अनुसयेला प्राप्त झालेले होते. तिच्या पतीव्रता धर्माबद्दलही ती प्रसिद्ध होती. तिच्या याच ख्यातीने सुर्यदेवता देखील तिच्यापुढे नतमस्तक व्हायचा. त्याची अग्निदेखील त्या अनुसयेच्या पुढे थंड शीतल व्हायचा.
हीच बातमी आपले त्याकाळातील न्यूज रिपोर्टर नारदमुनी यांना कळली. कळीचा नारद म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या नारदमुनी यांनी हिच बातमी की अनुसया ही सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे तिन्ही देव्या जसे की लक्ष्मी, पार्वती, आणि सरस्वती यांच्या कानावर घातल्या. आमच्यापेक्षाही श्रेष्ठ कोणी असू शकते का ही न पचणारी गोष्ट लक्षात घेऊन तीनही देव्यांनी आपापल्या पतीच्या म्हणजेच विष्णू, शंकर आणि ब्रम्हाला ही गोष्ट सांगितली आणि अनुसयेचे हे पत्नीव्रत नक्की काय आहे, ती आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का याची इत्यंभूत तपासणी करण्यास भाग पाडले. आपल्या पत्नींची समर्पकता करण्यासाठी तिन्ही देव गरीब भिक्षुकाचे रूप धारण केले, धोतर गुंडाळून तिघेही अत्रीमुनींच्या दारात भिक्षाम देही म्हणत आले. अनुसया देवीने लगेचच दारात आलेल्या तीनही पाहुण्यांचे स्वागत केले, त्यांचे पाय धुतले त्यांना जेवणास बसण्याची सोय केली.
तीनही देवांच्या मनात काहीतरी वेगळेच षडयंत्र चालू होते. अनुसया देवीचे हा पतीव्रता धर्म कसा तुटू शकतो यावर त्यांची नीती चालू होती, खरं तर आपल्या पत्नी च्या मतानुसार दुसरी स्त्री ही पतिव्रता आहे का पवित्र आहे का हे तपासणे हे त्या काळातील मूर्खता दर्शविणारी ही कथा वाटते. मग जिथे आजही लग्नापूर्वी स्त्रीची पवित्रता काही ठिकाणी बघितली जाते ही त्याच प्रकारची मानसिकता आहे. पण ठीक आहे सर्वांनी परीक्षा पास होणे गरजेचे असते, अनुसया देवीने देखील जगाला ही परीक्षा एक वेगळ्या मूल्यमापणातून पास होऊन दाखवली होती.
भिक्षुक स्वरूपातील त्रिदेवांनी आम्ही दुरून आलो आहोत, आम्हा तिघांना तू तुझं मोहिनी रूप नग्न अवस्थेत दाखवून त्याच अवस्थेत भोजन वाढावे अशी तिन्ही देवांनी इच्छा प्रकट केली. अनुसया देवीने लगेच तिची परीक्षा चालू आहे हे ओळखले. ती देखील अत्रीमुनींची पत्नी असल्याने तिच्यात देखील अफाट शक्ती होती. तिने तिच्याकडे उपलब्ध असलेल्या कमंडलूमधील पाणी तिन्ही पाहुण्यांवर शिंपडून त्यांना लहान बालकांमध्ये रूपांतरित करते. आणि याद्वारे जर त्या बालकांना स्तनपान द्वारे भोजन देऊ शकली तर तिची पतिव्रता खंडित होणार नाही हे तिने लक्षात घेतले. तिन्ही बालके एक एक करून दुधाची तृष्णा मिळण्याने खुश झाले. अत्रीमुनींच्या आश्रमात अशा तिन्ही बालकांचे नंदन फुलण्याने एक आनंद बहरला होता. मात्र खूप दिवस होऊनही अजून आपले पती घरी कसे नाही आले या चिंतेने तीनही देव्या चिंताग्रस्त झाल्या होत्या.
शेवटी त्या तिघीही अत्रीमुनींच्या आश्रमकडे धाव घेतात. अत्रीमुनींच्या आश्रमात आपले पती नजरेस न पडल्याने देव्या अत्रीमुनींकडे झालेल्या गोष्टींची पुष्ठी करतात. अत्रीमुनी पुन्हा कमंडलू मधील मंत्रीत जलाने तिन्ही बालकांना आपल्या मूळ रुपात आणतात. आपल्या पतीला बघून तीनही देव्या खुश होतात. सर्वानाच अनुसया देवीच्या पवित्रतेची जाणीव होते. तिच्यावर अतिप्रसन्न होऊन त्रिदेव तिला इच्छित वर मागण्यासाठी सांगतात.अनुसयने तीनही बालकांना मातृत्व प्रदान केले होते, त्यामुळे हे तिचे मातृत्व तिच्याकडे कायमच असावे ही तिची इच्छा असणारच. त्यामुळे त्रिदेवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेयांची निर्मिती झाली जो अनुसया पुत्र दत्त म्हणून प्रसिद्ध आहे. तीनही देव्यांना आपली चुकी लक्षात आली.
इतके असूनही दत्ताची पूजा करताना माता अनुसया आजही अलिप्त आहे, ती कोणत्याही प्रतिमेत दिसत नाही निदान दत्त जयंतीला अनुसया मातेला आठवावे. तिची श्रद्धा आठवावी. जर पुराणांमध्ये आहे तर त्या अनुषंगाने ती आठवावी. दत्तजयंती आपण जर यथेच्छ पणे साजरी करीत असू तर दत्त माता अनुसया हिला देखील कुठेतरी स्थान द्यावे ना.
या कथा कुठेतरी आपल्याला जगातील वेगवेगळे अन्यायाला वाचा फोडण्यास शक्ती देत असतात. आजकालच्या स्त्रियांचे आणि अनुसयेचे कार्य भलेही वेगळे असेल पण आपण त्या कार्याला विसरत असू तर कुठेतरी आपण चुकतो असे होते. त्यामुळे आपल्या मातेला तिच्या कष्टांना तिच्या दूध पाजवून आपल्याला मोठे करण्यासाठी उभारी देण्याच्या अविरत प्रक्रियेला विसर पाडणे होऊ नये हे ही कथा वेगळ्या प्रकारे सांगण्याचा उद्देश.
चला दत्तजयंती साजरी करूयात अनुसया मातेचे नाव अमर करू.

Comments
Post a Comment