पहिले जन्माला आलेले एकेरी पालकत्व

 पहिले जन्माला आलेले एकेरी पालकत्व

प्रा. अलोक अर्जुन अलका पवार

लग्न झाल्यावर प्रत्येक स्त्री पुरुषांना आपले स्वतःचे संतान व्हावे असे वाटत असते. त्यामध्ये आदी माता आणि आदि पुरुष ज्यांना संबोधले गेले आहे असे पार्वती आणि महादेव यांना सुद्धा वाटत असणारच. तसे कार्तिकेय त्यांचा प्रथम पुत्र. मात्र कार्तिकेयने आपल्या पित्याच्या सृष्टी संवर्धनाची जवाबदारी घेतल्याने देवी पार्वती यांच्या जवळ तो कमीच होता. 

देवी असल्या म्हणून त्यांचं मातृत्व, बाळाचे लाड करायचे हे त्यांच्या ममतेमधून थोडे कमी होणार. पार्वतीचे निवासस्थान आपल्या पतीसोबत ते म्हणजे कैलास पर्वतावर. अगदी स्मशानात म्हणले तरीही चालेल. जिथे बऱ्याच जणांचे आपल्या महादेवाला भेटण्यासाठी येणे जाणे होते. कैलास पर्वतावर स्नान करताना आपल्याला कोणी बघू नये यासाठी पार्वतीने आपल्या अंगावरील मळापासून एक बालक तयार केला आणि साक्षात देवी असल्याने त्याला मूर्त स्वरूप दिले. आपल्या शरीरापासून तयार झालेले तेजस्वी बालक पार्वतीला स्वतःचे वाटले. आणि पहिलाच धडा पार्वतीने त्या बालकाला शिकवायला सुरवात केली. माझी अंघोळी आणि आवरून होईपर्यंत या कक्षात कोणासही प्रवेश करून देऊ नकोस, दारातच उभा राहून लक्ष दे. नवजात वेगळ्या प्रकारे जन्मलेल्या त्या बालकाला आई काय आणि वडील काय सध्या दोघेही पार्वतीच होते. म्हणजे या घडीला पार्वती म्हणजे प्रथम एकेरी पालकत्व स्वीकारणारी आणि संपन्न करणारी स्त्री म्हणावयास हरकत नव्हती. आज्ञाधारी बालक त्वरित दारात उभा थांबला. 

त्याने कधीच महादेवाला म्हणजेच अगदी म्हणायचे झाले तर आपल्या बापाला बघितले नव्हतेच. दुसऱ्या बाजूला महादेवाने देखील या नव्या पद्धतीने जन्मलेल्या स्वतःच्या मुलाला बघितले नव्हते. नऊ महिने नऊ दिवस पोटात न वाढवून थेट जन्मलेल्या या बालकापासून महादेव अनभिज्ञ होते. पृथ्वी परिक्रमा करून ते कैलास पर्वतावर परतले. दारात एक छोटा बालक बघून सुरवातीला महादेवांना देखील काहीसे वेगळे वाटले. मात्र कैलासाच्या प्रवेशद्वारातून तो बालक महादेवाला आतमध्ये येऊन देईना. खुद्द आपल्या निवास स्थानाहून एक छोटा बालक आपल्याला आत येऊ देत नाही हे बघून शांत महादेवाचा हळू हळू पारा चढत चालला होता. मात्र तो बालक टस की मस होईना, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते लहान बालक महादेवांना आतमध्ये येऊन देईना. महादेव अतिशय क्रोधीत झाले आणि त्यांच्या त्रिशूळाने त्यांनी त्या बालकाचा शिरच्छेद केला. 

काहीतरी विपरीत घडले आहे हे जाणल्याने पार्वती त्वरित बाहेर आली आणि तिने बाहेर घडलेला प्रसंग पहिला. माझ्या आज्ञेचे पालन करणाऱ्या बालकास माझ्या अंशास महादेवांनी असे मारले याचा ती त्रागा करू लागली. माझ्या बालकास काही करून पुनर्जीवित करा यासाठी ती महादेवाला सुनावणी करू लागली. महादेवाच्या त्रिशूळाने ज्या शिराचा धडापासून छेद करण्यात आलेले आहे तेच शीर पुन्हा त्या धडाला जोडणे अवघड होते. मात्र पार्वतीला काही करून तिने जन्म दिलेला तो बालक पुनर्जीवित करून पाहिजेच होते. तिने रडून अगदी हट्ट धरला होता. सृष्टी रचेता एक माता मग ती कोणतीही माता असेल तिच्या समोर हरणारच.

त्यांनी आपल्या गणाला आदेश दिला जा जी माता आपल्या संतांनाकडे पाठ करून असेल त्या बालकांचे शीर घेऊन या. स्वतः महादेव देखील शीर शोधण्यासाठी निघाले.  सर्व बालकांच्या कडे त्यांच्या आईचे अगदी व्यवस्थित लक्ष होते. माणसेच काय अगदी प्राणिमात्र यांच्यामध्ये आईचे महत्व तसेच दिसून आले. एक ठिकाणी फक्त एक हत्तीण तिच्या लेकराकडे पाठ फिरवून बसलेली दिसली. महादेवांनी तिच्या म्हणजेच गजमुखाला ताब्यात घेतले आणि कैलासावर आले. त्यांनी ते गजमुख त्या शिरच्छेद केलेल्या बालकाच्या धडाला जोडले. आणि पुन्हा त्या बालकाला मूर्तरूप दिले आणि झाला तो बालक गजानन. गजानन असा जन्म म्हणजे कदाचित सृष्टीमधील पहिला अवयव प्रत्यारोपणाचा प्रसंग असेल. आणि तोही मानव आणि प्राणिमात्रांच्या अवयव प्रत्यारोपणाचा. 

पार्वती पुन्हा तिच्या बालकाला काही हानी पोहचू नये यासाठी सजग झाली होती. तिने महादेवकडून काही मागणी केली. एकदा संतापाच्या भरात आपल्या पत्नीला इतका त्रास देऊन सुज्ञ झालेले महादेव पार्वतीची कोणतीही मागणी पूर्ण करू असे आश्वासन तिला देतात. तसे पालक आपल्या बालकांना नेहमीच खूप ठेवत असतात मात्र पार्वतीने आपल्या बालकासाठी आद्य स्थान मागितले होते. माझा हा गजानन सर्वांच्या आधी पुजला जाईल अगदी तुमच्या पूजेच्यादेखील आधी. त्याला पाहिले स्थान दिले जाईल. महादेवांनी ही पार्वतीची इच्छा लगेच पूर्ण केली. 

आणि अशा प्रकारे झाला गणेश जन्म. आई ही नेहमीच आपल्या बालकांसाठी आधारवड असते. ती जन्म देतेही आणि त्याचा सांभाळही करते.आपल्या मुलांचं ती नेहमी कल्याण करत असते. पार्वतीच्या या रूपाने गजाननाला प्रथम मानाचे स्थान प्राप्त झाले होते. पार्वतीने या पुत्राला इतके बुद्धिमान बनवले होते की कोणत्याही गोष्टी आपल्या तीक्ष्ण कानाने ऐकू शकत होता. कोणत्याही घडामोडी आपल्या पोटात संचयित करू शकत होता म्हणून तो लंबोदर होता. इतक्या मोठ्या डोक्यामध्ये खूप मोठ्या बुद्धीचा समावेश होत होता. 

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त