राम ...रामाची अपेक्षा आणि रामराज्य
राम... रामाची अपेक्षा आणि रामराज्य
अलोक पवार
रामाचे जीवनचरित्र पाहिले तर त्याग, सत्य, सेवाभाव या गोष्टींवर आधारलेलं असे दिसते. रामाचे आयुष्य बऱ्याच गोष्टींमध्ये गुरफटलेलं असे दिसून येत. त्यामधून रामाला एका बाजूला परमोच्च अवतार तर दुसऱ्या बाजूला भरभरून नावं ठेवली जातात. आपण आपल्या देवतांची नेहमीच एक चांगल्या बाजूने विचारसरणी या कलयुगामध्ये स्वीकारायला बघतो. आणि तसे अंगीकारणे होते आहे का असे देखील बघतो.
बरेच जण रामराज्य येण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र हे रामराज्य अयोध्येयत मंदिर बांधून येणार का? या गोष्टींकडे एक मोठ्या विचाराने बघितले पाहिजे. सध्या २०२० पासून भारत देश कोरोना च्या संकटाला सामोरे जातोय.
या कोरोनाला सामोरे जाताना प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांनी आपल्या जेष्ठांना सांभाळले पाहिजे. रामाला जेंव्हा वनवासात पाठवले गेले तेंव्हा सावत्र आई कैकई आणि तिची इच्छा जोपासत दशरथाने देखील कठोर मनाने रामाला चौदा वर्ष वनवास सांगितला. भविष्यात अयोध्येचा राजा थेट वनवासाला गेला. याठिकाणी राम हा आदर्शवत असा समोर येतो. आपल्या आई- वडिलांचा आदेश त्वरित स्वीकारून ज्याप्रमाणे राम वनवासाला गेला त्याच प्रमाणे सध्या आई वडिलांना कोरोना कालावधीत अत्यंत चोख पणे सांभाळून त्यांना जपले पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे. त्यांना सांभाळले तरच आपल्याला आपल्यासोबत एक बुलंद इतिहास आहे असे होऊ शकते. तेंव्हाच रामराज्य येईल.
राम हा फक्त आई वडील नाही तर आपल्या भावंडांमध्ये देखील प्रिय होता. भरत याने रामाच्या पादुका राज गादीवर ठेवून राज्य सांभाळले. लक्ष्मण हा देखील बंधू वनवासाला निघतो आहे तेंव्हा त्याच्या सोबतच तितकाच काळ वनवासात जायचे. युद्धामध्ये मूर्च्छित झालेल्या लक्ष्मणाला पुनर्जीवित करण्यासाठी रामाने हनुमानाच्या मदतीने संपूर्ण पर्वतच संजीवनी बुटी साठी मागवला होता. हे चित्र सध्या दिसते का यावर विचार करायला हवे. भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. बहिणींना प्रॉपर्टी मिळणार नाही असे चित्र दिसून येते. मग इथे राम आठवला पाहिजे. तेंव्हाच रामराज्य येईल.
रामाने आपल्या पत्नीवर देखील प्रचंड प्रेम केले. सीता आणि रामाचा विवाह सीता स्वयंवरात संपन्न झाला. शिवधनुष्य मोडून, इतर वरांना हरवून, परशुराम यांचा राग स्वीकारून शेवटी राम आणि सीता यांचा विवाह संपन्न झाला. सीता ही देखील रामसोबत वनवासात होती. मग सोनेरी हरणाची इच्छा, बजावून सुद्धा लक्ष्मण रेषेला पार करून रावणरुपी व्यक्तीला भिक्षा देण्यासाठी बाहेर आलेल्या सीतेमुळे रामायण घडले. तरीही तिला वाचवण्यासाठी राम रावण युद्ध झाले. मात्र पुढे सीतेला अग्निपरीक्षा गोष्टींना सामोरे जावे लागले यासाठी राम बराच विरोधी चर्चेत पुढे येताना दिसतो. पुढे सीता एकटी आपल्या दोन्ही पुत्रांना एकटी वनात सांभाळते तिथे देखील राम विरोधी चर्चेला बळी पडतो. मात्र एक धोब्याच्या म्हणण्यानुसार जर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली नसती तर तो प्रजाहितदक्ष नाही, आपल्या पत्नीची बाजू पुढे घेण्यासाठी प्रजेच्या बोलण्याकडे केलेल्या विरोधाला पण सामोरे जावे लागले असते. वनवासात पत्नीला घरासाठी, कंदमुळे जमा करून चंद्रमौळी झोपडीतही सोनेरी संसार थाटला. मग सध्या लग्न करून वनवासाइतका नाही पण आहे इतक्या संसारात गोडी आणणाऱ्या स्त्रिया समोर आल्या पाहिजेत. आणि आपल्या पत्नीला नेहमीच आपल्या सोबत ठेवणारे पुरुष समोर आले पाहिजेत. आज पुरुषांनी स्त्रियांना मान सन्मान दिला तर आणि तेंव्हाच रामराज्य येईल.
रामाने सीतेला परत आणण्यासाठी श्रीलंकेपर्यत प्रवास केला, हा प्रवास सोप्पा नव्हता. त्याने बरीच जंगले, पर्वत, डोंगर, नद्या अगदी समुद्र देखील पार केला. सध्या या प्रवासाच्या सुविधा उत्तम झाल्या पाहिजेत, कारण आजही योग्य उपचार मिळण्यासाठी रस्त्यातच काही जणांच्या मृत्यू होतो. गावातील रस्ते अजूनही अत्यंत गंभीर आहेत. रामाने समुद्रावर सेतू बांधला, मात्र आजही काही विद्यार्थी नदीवर अवघड बांध ओलांडून शाळेत जातात पावसात तर त्यांना घरीच बसावे लागते. आज अशा भक्कम रस्त्यांची गरज आहे. तेंव्हा रामराज्य येईल.
राम मुळात अयोध्येत किती राहिला, कारण तो अगदी श्रीलंकेपर्यत आपल्या पाऊल खुणा दाखवतो. मग सध्या कोरोनाचे संकट देशावर येते आहे आणि अयोध्येच्या राम मंदिरासाठी इतकी वर्गणी गोळा करून खरंच राम मंदिर योग्य आहे का. राम त्या मंदिरात राहील. नाही राम तर अगदी श्रीलंकेपर्यत आहे. त्याला मंदिराची गरजच नाही. आज गरज आहे ती कोरोनाच्या विळख्यातून देशाला बाहेर काढण्याची. नाहीतर सध्याच्या दशरथाला राजाला पुत्र विरहाच्या शापाला सामोरे जावे लागेल. सध्याच्या परिस्थिती मध्ये आपल्यासोबत हनुमान नाही मात्र तरीदेखील कोव्हीशिल्ड आणि कोव्हक्सिन सारख्या संजीवनीची देशातल्या लक्ष्मणाला गरज आहे. कधीतरी रेमिडीसीवर नावाचे इंजेक्शन देखील संजीवनी बनत आहे. अशा विविध लसी, आरोग्य सुविधा आणि बऱ्याच सुखसोई जेंव्हा अगदी खेडोपाडी होतील, दवाखाने, हॉस्पिटल सारख्या सुविधा प्रत्येक गावागावात होईल, जेंव्हा कोणालाच ऑक्सिजन, गोळ्या, इंजेक्शन साठी आता भटकावे नाही लागणार आणि मंदिरांपेक्षा हॉस्पिटलनिर्मिती साठी प्राधान्य दिले जाईल तेंव्हा रामराज्य येईल.
रामाचे शिक्षण गुरुकुलात झाले. सीतेने देखील आपल्या पुत्रांना गुरुकुलात शिकवले. मात्र आजकालची शिक्षणपद्धती यामध्ये शिक्षकांचा अनादर होताना दिसतो. मातृभाषा शिक्षण यापेक्षा रोजगार निर्मितीचे शिक्षण मिळू लागले आहे त्यामुळे बराच विद्यार्थी गण दहावी बारावीपेक्षा रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष देतो आहे. आपल्या कडे सक्तीचे शिक्षण असेही आहे. मात्र तरीदेखील बरीच मुले रस्त्यावर आजही भीक मागताना दिसत आहेत. ही तर अजिबात रामराज्याची संकल्पना नाही. शिक्षण हे प्रत्येकाच्या मूलभूत अधिकारांच्या पैकी एक अधिकार आहे म्हणून मंदिरनिर्मिती पेक्षा गावागावात शाळा महाविद्यालयाची निर्मिती हे आग्रही असले पाहिजे. आहे त्या शाळा महाविद्यालयांचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी पाठपुरावा झाला पाहिजे. शाळांच्या अडचणी काय आहेत हे लोकप्रतिनिधींनी समजावून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांना बहुजिनसी शिक्षण कसे प्राप्त होईल याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आणि मुळात आपण ज्या ठिकाणी शिक्षा प्राप्त करतो आहेत , शिक्षण घेतो आहे त्यालाच मंदिर का समजू नये ही देखील भावना लक्षात घेतली पाहिजे, मग त्या मंदिरात आपल्याला राम निश्चित दिसेल. आणि तेंव्हाच रामराज्य प्रस्थापित होईल.
रामाच्या कालखंडात राजा प्रजा असे चित्रण होते, त्या मध्ये राजा, प्रजा, दासी, सेवक, धोबी, दुकानदार असे बरेच लोक दिसून येतात. रामाने वनवासात घेतलेला निर्णय हा कैकई नाही तर तिच्या दासीच्या मंथरेच्या डोक्यातून उत्पन्न झालेला होता. रामाने वनवासात शबरीची जी एक आदिवसी स्त्री होती तिने बोरे गोड आहेत का? याची पाहणी करून उष्टे केलेले बोर रामाने खाल्ले होते, तर पुढे धोब्याच्या सांगण्यावरून सीतेला अग्नीपरीक्षेला सामोरे जाण्यास सांगितले होते. रामाच्या काळात या घटनांवरून तो कसा जाती वर्ण व्यवस्थेला सामोरे गेला नव्हता, तेच आपण आजही स्वीकारले आणि प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून स्वीकारले तर आज रामराज्य येईल.
सीता ही जनक राजाची कन्या होती. जनक राजा जेंव्हा प्रजा दुष्काळात सापडली होती तेंव्हा सोन्याच्या नांगराने जमिन नांगरली तेंव्हा एका पेटीमध्ये सीता जनक राजाला मिळाली, म्हणजेच सीता ही भूमीकन्या आहे. सीतेच्या आगमनाने जनक राजाच्या राज्यातील दुष्काळ मुक्ती झाली. जनकाने त्या कन्येचा पुत्री म्हणून स्वीकार केला. समाज पाहिजे तसा मुलींचा स्वीकार करीत नाहीत, त्यांना दुय्यम दर्जा अजूनही आहे. त्यांना कमी शिक्षण, बालविवाह, अधिकार पासून वंचितता अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. मग आज सीतेपेक्षा गंभीर परिस्थिती आहे कारण त्यांच्यासाठी जनक नाहीत.
सीता ही बीजमाता होती. तिने देखील शेती तंत्र शिकून प्रजेची लग्नाआधी सेवा केली होती. पण आजकालच्या शेतकरी कर्ज, रासायनिक खते किटनाशके आणि दुष्काळाच्या झळा यांच्या मध्ये अडकलेला दिसतो. मग त्या शेतकऱ्यांना त्या दुष्कळांतून बाहेर काढायला सीता अवतरेल का या युगात. शक्य आहे पण त्यासाठी कृषी शिक्षण, दुष्काळ सज्ज होणारी यंत्रणा अशी एक मोठी नांदी होण्याची गरज आहे. मंदिरांची नाही. तरच रामराज्य येईल.
रामाने त्याचा शेवट देखील शरयू नदीमध्ये देहत्याग करून केला. शरयू नदी सध्या कशी आहे, एकंदरीत नद्यांची अवस्था कशी आहे.नद्यांमध्ये घरातील,उद्योगातील खराब पाणी सोडले जाऊन तिला प्रदूषित केले जाते. त्यात निर्माल्य फेकले जाते. त्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि भयावह रंग दिलेले गणपती विसर्जित केले जातात आणि नंतर त्या नद्यांकडे बघितले देखील जात नाही. या नद्या या भारतभूमीच्या रक्तवाहिन्या आहेत. त्या स्वच्छ ठेवल्या, त्या खराब होणार नाहीत याची दक्षता घेतली तर नक्कीच रामराज्य येईल.
राम हा विचार सर्वांनी स्वीकरला पाहिजे, राम ही मंदिरात ठेवून दर्शन घेण्यासाठीची गोष्ट नाही. राम हा मनामनात असला पाहिजे. कारण रामराज्याची धुरा पसरवण्यासाठी राममंदिर नाही तर रामाचे विचार जसे की सत्य, साथ, प्रेम, त्याग, मदत या सर्वांची आपल्या मनाच्या मंदिरात गरज आहे.
एक गरजू विद्यार्थ्याला शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा... रामराज्य असेल
एक गरजू स्त्रीकडूनच फळे भाज्या विकत घ्या... राम राज्य असेल
आपल्या आईला वडिलांना भावंडांना पत्नीला आणि पतीलाही प्रेम द्या माया द्या ..... रामराज्य असेल
जगामध्ये अधर्मी गोष्टी आहेत, त्यांना नष्ट करा ... रामराज्य असेल.
निदान एक झाड लावून त्याला जोपासण्यासाचा प्रयत्न करा.. रामराज्य असेल.
आपल्या मनाचे मंदिर उघडा हनुमानासारखेच आपल्यालाही रामराज्य दिसेल....
प्रा. अलोक पवार

Wov Alok , तुझ्या लेखनशैलीत दिवसेंदिवस प्रगल्भता येत आहे! Very good! Ani tu tujhe vichar agdi spasht pane mandato आहेस! छान खूप शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद शारदा मॅडम
Deleteखूप छान लेख आहे.सध्याच्या रामाचे कर्तव्य पटवून दिले आहे.त्या प्रमाणे अनुकरणही होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ReplyDeleteहो सासूबाई.... आपण प्रयत्न करतोय
Deleteराम हे नुसते देवाचे नाव नसून ती एक विचारधारा आहे आणि तू ते रामराज्य कसे असावे ह्या संकल्पनेतून स्पष्ट केले असे रामराज्य येण्यासाठी वैचारिक, मानसिक, सामाजिक प्रगल्भता होणे खूप गरजेचे आहे... आधुनिक काळातील रामराज्य ही संकल्पना अतिशय सविस्तरपणे स्पष्ट केली आहेस...खूप छान 👌 👌
ReplyDeleteधन्यवाद.....
Delete