आपल्यातच कुठेतरी असतो तो मारुती शोधला पाहिजे फक्त

आपल्यातच कुठेतरी असतो तो मारुती शोधला पाहिजे फक्त

अलोक पवार

आम्ही आधी पर्वती दर्शन ला राहायचो म्हणजे पर्वतीच्या अगदी जवळ. मला पप्पा सकाळी उठून पर्वती ला घेऊन जायचो. पर्वताच्या पायऱ्या चढून चढून मनात अनेक प्रश्न यायचे. कोणाची पर्वती. पेशव्यांची. मग काय या पेशव्यांना खाली असे मोक्याच्या ठिकाणी हे बांधकाम नाही का करता आले. उगाच एवढ्या उंचावर चालत जावे लागते. तेंव्हा अगदी बालबुद्धी होती. तेंव्हा अगदी पर्वती च्या मागे असलेली वाघजाई पर्यंत जाणे व्हायचे. पुण्याला पर्वती, तळजाई म्हणजे व्यायामाचे आणि व्यायाम करणाऱ्यांंसाठी एक मोठी देणगीच मिळाली आहे म्हणायला काही हरकत नाही. 

प्रत्येक बाळ हे लहानपणी थोड्या उचपत्या करत असते. आपले हनुमानजी देखील असेच. आमच्या लहानपणी आम्हाला आंबा, चिक्कू अशा फळांचे आकर्षण. मात्र या बालक हनुमानाला असे थोडे थिडके छोटे फळ नाही त्याला तगडे मोठे फळ खाण्याची इच्छा झाली. कोणते माहिती थेट सूर्य. आणि तशी या बालकाने सूर्याकडे झेपही घेतली. अंजनी आणि केसरी या वानर कुटुंबातील हा बालक. लहानपणापासूनच चपळ. या बालकाच्या शक्तीने खरच सूर्याला ग्रहण केले तर. सर्वच देवता भयभीत होते. शेवटी इंद्राने आपले ब्रम्हास्त्र काढून बालकाकडे फेकले आणि ते बालक मूर्च्छित होऊन खाली पडले. ब्रह्मस्त्राच्या प्रहराने बालकाच्या तोंडावर मात्र सूज कायमची राहिली.

राम सीतेच्या वनवासात जेंव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेंव्हा आपल्या जन्माच्या ठिकाणी म्हणजे नाशिक मध्येच राम आणि हनुमानाची भेट झाली. भेटता क्षणीच विष्णुरूपी राम आणि शंकर अवतारी हनुमान यांची मैत्री झाली. आणि हनुमानाने कायम रामाची सेवा करेल असे आश्वासन देखील दिले. राम आपले प्रभू म्हणजेच माता रुपी सीतेला त्वरित वाचवले पाहिजे यासाठी रामाच्या आधीच हनुमान लंकेकडे निघाला. आणि रावणाच्या लंकेत शिरला. सीतेला शोधण्यासाठी लंकेला अगदी ढवळून काढले. रावणाच्या सैनिकांनी या हनुमानाला पकडून रावणासमोर हजर केले तेंव्हा रावणाने त्याला शेपटीला आग लावा असे आदेश दिला. आज्ञेप्रमाणे जेंव्हा हनुमानाच्या शेपटीला आग लावण्यात आली तेंव्हा हनुमानाने इकडे तिकडे पळून रावणाच्या पूर्ण महालालाच आग लावली. अशा शक्तिशाली हनुमानाची भेट माता सीतेसोबत झाली. आणि तिचा निरोप घेऊन हनुमान पुन्हा रामाकडे आला. 

पुढे जेंव्हा राम - रावण युद्धामध्ये लक्ष्मण धारातीर्थी पडले तेंव्हा संजीवनी न भेटल्याने या हनुमानाने संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच युध्दास्थळी उचलून आणला होता. लक्ष्मण पुनर्जीवित झाले. रामाच्या सेतू बांधण्याच्या कामातही हनुमानाने विलक्षण कामगिरी बजावली होती आणि रावणाच्या सैन्याला पराभूत करण्यामध्ये देखील हनुमान मागे नव्हता. अशा शक्तिशाली वीर हनुमानाची सोबत होती म्हणून रामाने युद्ध जिंकले. 

अशाच हनुमानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ताकद. आपल्या सर्वांमध्ये देखील ती असते. लहानपणी पर्वती चढताना ज्या गोष्टी कळत नव्हत्या उमजत नव्हत्या. त्या काहीश्या कळायला लागल्या आहेत. व्यायाम करणे, उत्तम शरीर कमावणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. आपल्या शरीराची सेवा व्यायामाने आपण नाही केली तर राम आपल्या देहात राहणार नाही. त्यामुळे वेळीच आपण आपली ताकत ओळखून साधना केली पाहिजे. स्थूल शरीराला काही काम करावेसे नाही वाटत आणि तेच कष्टाच्या व्यायामाच्या शरीराला कुठे बसावेसे किंवा आराम करावसा नसतो वाटत. आणि म्हणूनच शरीराला आकार देणे हे सूज्ञपणाचे लक्षण आहे. 

कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती हा शब्द ऐकला असेल. आपले शरीर जितका व्यायाम करेल, तितका बाह्य रोगांशी सामना करण्यास शरीर हे प्रबळ बनत असते. आपल्या प्रत्येक पेशी मध्ये हनुमान संचारून तो रावणरुपी रोगांशी लढत असतो आणि आपल्या शरीराचे रक्षण होत असते. 

कोरोना कदाचित आज असेल उद्या नक्की जाईल. मात्र आपले शरीर नेहमीच आपल्या सोबत राहणार आहे. त्याच्यामुळे या प्रतिभासंपन्न शरीराला जपणे, व्यायाम करणे हे प्रत्येक व्यक्तीचे काम आहे. आपण आपल्या नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की आपले आदीपुरुष म्हणजेच हनुमान हे जसे शरीराची , व मनाची उपासना करतात, तसे आपणही शरीर मन सांभाळले पाहिजे आणि आपल्यातच कुठे तरी असतो तो मारुती तो हनुमान फक्त आपण शोध घेतला पाहिजे....

सर्वांना हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त