रमजान ईद ... ईद मुबारक

 रमजान ईद ... ईद मुबारक 

प्रा. पवार अलोक अर्जुन अलका 

रमजान ईद .... मुस्लीम बांधवांचा आनंद साजरा करायचा सण. रमजान ईद सुरु करण्याच्या साधारण एक महिना आधीच या सणाची चाहूल लागायला सुरवात होते. सर्वत्र एक प्रकारचे पावित्र्य असे दिसून येते. सर्व मुस्लीम बांधव रमजानच्या सणाच्या आधीच एक महिना उपवास धरतात. हा उपवास म्हणजेच रोजा साधारण २९ ते ३० दिवसांचा असतो. मुस्लीम धर्माच्या दिनदर्शिकेनुसार हा रोजा समाप्त होतो आणि शव्वाल च्या पहिल्या तारखेला म्हणजेच ईद च्या दिवशी चंद्र दर्शनानंतर ईद साजरी केली जाते. महिनाभर आपले काम अंगमेहनत सांभाळून काहीच न खाण्यापिण्याचा उपवास धरणे ही एक प्रकारची परीक्षाच असते. आणि या परीक्षेला सामोरे जाण्याची शक्ती देवाने दिली म्हणून त्याचे आभार प्रदर्शन या सणाच्या दिवशी केले जाते. रोजा धरण्यासाठी सूर्योदयापूर्वी खाल्ले जाते आणि मग दिवसभर कडक उपवास पाळला जातो.  



रमजान आणि ईद हे दोन्ही शब्दांचे अर्थ पहिले तर एक उत्कृष्ठ अर्थ समोर येतो. रमजान म्हणजे भरभराट आणि ईद म्हणजे आनंद. म्हणजेच हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात भरभराट आणि आनंद देतो. ईद हा एकट्याने साजरा करायचा असा सण नाही. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून बरेच जण एकमेकांना भेटतात. गळाभेट घेतात. सर्वत्र मंगलमय असे वातावरण असते. या सणामध्ये कोणी श्रीमंत - गरीब असा भेदभाव नसावा म्हणून देवाने सांगितलेल्या मार्गाने सर्वांनी जकात द्यावयाची असते म्हणजेच सर्वांनी दानधर्म करणे देखील पुण्याचे काम समजले जाते. हा जकात ईदच्या आधीच दिला जातो जेणेकरून सर्वांकडे ईदच्या दिवशी फक्त आणि फक्त उत्साह आणि सणाचे साजरा केला जावा. मुस्लीम लोकांचा धर्मग्रंथ 'पवित्र कुराण' याच महिन्यात तयार झाल्याने या ईदच्या दिवसांमध्ये सर्वत्र मंगलमय आणि उत्साही वारे वाहत असतात. याच दिवसांत रोज रोजा सोबत कुराणाचे पठन देखील होते, त्याच सोबत जे काही वाचले गेले आहे, त्यावर मनन चिंतन करणे आणि त्यास आचरणात आणणे हे देखील गरजेचे असते, त्यावर मोठी भर दिली जाते.  

ईदच्या महिन्यामध्ये देवाच्या सांगण्यानुसार प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त पुण्य आत्मसात करायचे आणि त्याने त्याचे होईल तेवढे पाप जाळून टाकायचे आहे. आपण जर खरेच पाप केले असेल तर त्यानुसार त्याचे प्रायश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण नेहमी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. या महिन्यात उपवास म्हणजे रोज्यासोबत दिवस आणि रात्री मिळून एकूण नऊ वेळा नमाज (प्रार्थना) केली पाहिजे. हा रोजा साधासुधा नसून काहीच खाणे पिणे वर्ज्य असते. सूर्योदयापासून एकूण १२ तासांचा हा उपवास अगदी मनोभावे केला जातो. या महिन्यातील तीस दिवसांचे वर्गीकरण म्हणजे पहिले १० दिवस देवाची कृपा समजण्याचे, मधले १० दिवस देवाची भक्ती करण्याचे आणि शेवटचे उरलेले १० दिवस जो व्यक्ती मनोभावे रोजा करतो आहे त्यांच्या रक्षणाचे असे असतात. एकंदरीत देव आपल्यासोबत आहे आणि आपल्यासोबतीचे सर्व जण हे देखील त्यांच्या आयुष्यात आनंदोत्सव साजरा करणे हे या रमजानच्या सणाचे - महिन्याचे विशेष. 

ईदच्या दिवशी सकाळी दही - साखर - भात याचे जेवणच प्रार्थना झाल्यावर केले जाते. खाण्यामध्ये खजुराला अनन्य साधारण महत्व दिले गेले आहे. कारण महमंद पैगंबर त्यांच्या काळात त्यांना आणि त्यांच्या परिवाराला हाच एक जिन्नस गोड असा खाण्यासाठी उपलब्ध होता. याच दिवशी गोड धोड पदार्थाची रेलचेल असते. आणि या सर्व गोड धोड पदार्थांमधील प्रमुख पदार्थ म्हणजे 'शिरखुर्मा'. शेवया, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे, खजूर, नारळ, दुध आणि साखर अशा पोष्टिक पदार्थांनी हा स्वादिष्ट चवदार शिरखुर्मा बनविला जातो. बर हा शिरखुर्मा प्रत्येक घरात बनवला जातो आणि तो एकमेकांना स्नेहाप्रती वाटला जातो. महिला अतिशय आनंदी वातावरणात शेवया करणे या कार्यक्रमात उत्साह दाखवितात. काही लोकांच्या घरी गव्हाचे गुलगुले देखील बनविले जातात.          

ईद च्या दिवसांत आणखीन एक उत्साहपूर्ण गोष्ट केली जाते ते म्हणजे 'ईदि वाटप'. सर्व लहान आपल्या मोठ्यांकडे ईदि मागतात आणि मोठे सर्व लहान व्यक्तींना काही वस्तू, जसे की कपडे, खेळणी, मिठाई, चॉकलेट्स, अशा गोष्टी मोठ्यांकडून प्राप्त होतात. या सर्व गोष्टींना लहानांचा अधिकार समजला जातो. त्यातून लहान - थोरांत किती प्रेम आहे हे देखील दिसून येते. 

याच ईद ला ईद - उल - फित्र असे देखील म्हणले जाते. फित्र हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ कुर्बानी होतो. म्हणजे आपण जी जकात देणार आहोत, जे आज आपले आहे ते उद्या कोणा दुसऱ्याचे होणार आहे, तेंव्हा त्यावरील आपल्या हक्काची कुर्बानी देण्याचा दिवस, आणि तोही अगदी आनंदाने द्यायचे आहे, म्हणजे हा आनंद दायी ईदचा दिवस.    

यंदा म्हणजे २०२१ ची रमजान ईद ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी केली जात आहे. त्यामुळे एकत्र येऊन नमाज पठन करणे, एकमेकांची गळाभेट करणे, एकमेकांच्या उत्साहात सहभागी होणे यासाठी मुस्लीम बांधवांनी स्वतहून पुढाकार घेऊन अत्यंत सध्या पद्धतीने ही ईद साजरी करण्याचा निश्चय घेतला आहे. त्यामुळे यावर्षीची ही ईद अगदी साधी आपल्याला घरीच बसून एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, एकमेकांना भेटलो तर गळाभेट न करता सलाम करून प्रशासनाचे नियम पाळून ही ईद साजरी करण्याचे आदेश जेष्ठ मुस्लीम प्रशासनकर्त्यांनी आपल्या बांधवांना दिला आहे. बीड च्या शिक्षणतज्ञ प्रा. सिराज खान आरजू म्हणतात की, सर्व मुस्लीम बांधव नक्कीच प्रशासनाला कोरोनाशी लढण्यासाठी मदत करतील तसेच भारताला या कोरोनाच्या या विळख्यातून मुक्त करण्यासाठी सर्व जण अल्लाकडे प्रार्थना देखील करतील. 

भारतामध्ये राहताना हिंदू - मुस्लीम ऐक्य या ईद किंवा दिवाळी सारख्या सणांतून पुढे येताना दिसतात. कोरोनाच्या काळात तर हिंदू मुस्लीम लोकांची एकमेकांप्रती आत्मीयता अगदी प्रकट होताना दिसली. सांगली, मिरज सारख्या भागामध्ये मुस्लीम बांधवांनी महानगर पालिका कर्मचार्यांना कोरोना झालेल्या काळात अगदी मृत झालेल्या हिंदू बांधवांना मुखाग्नी दिला. पंढरपूरचा मुस्लीम समाजाचा युवक कमलीवाले याने ज्या कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीये त्यांच्यासाठी 'ओन्ली बेड अँड हॉस्पिटल' नावाचा व्हॉट्सप ग्रुप बनविला आहे. कमलीवाले हा नेहमीच हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सच्या संपर्कात असून तो गरजूंना बेड मिळवून देण्याचे काम अगदी जलदगतीने करून देतो. त्यामुळे पंढरपुरातील हिंदू बांधवांसाठी तो प्राण वाचवून देणारा विठोबाच ठरत आहे. प्रयागराज येथील फैजुल नावाच्या एका तरुणाने देखील आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. कोरोना काळात तो शववाहिनीची उपलब्धता करून देणे, मृतांना खांदे देणे, त्यांचे अंत्यसंस्कार करून देण्यात मदत करणे या गोष्टींमध्ये मदत करण्यासाठी फैजुल पुढे सरसावला आहे. हे सर्व करताना त्यांने यंदा ईद ला रोजे ठेवले नाहीत. 

आपल्याला सर्वांना गरज आहे हा आनंद असाच टिकवून ठेवण्याचा. माझ्याकडून सर्व मुस्लीम बांधवांना या आनंद देणाऱ्या सणाच्या भरपूर शुभेच्छा !       

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त