पोहे, मित्र आणि बरंच काही

 पोहे, मित्र आणि बरंच काही

प्रा. अलोक पवार

घरात जरा खूपच तणतण होती. मुलं पण काही दिवसांपासून उपाशी राहिली होती. पूजा अर्चना करून कोठून येणार पैसे घरी. सुदामा अगदीच परिस्थितीशी झुंज देत होता. बायको आणि पोरांची अगदी अन्नावाचून हालत झाली होती. घर, घर कसले चंद्रमोळी झोपडी होती. पण परिस्थिती बदलायची होती. काहीतरी तजवीज तर केली पाहिजे.

मात्र आपला मित्र आहे तो मित्र मला नक्कीच या गरिबीच्या झोतातून बाहेर काढेल अशी अपेक्षा मनाशी घेऊन सुदामाने द्वारकेच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. मित्राकडून मदत मागणे थोडी लज्जास्पद वाटेल, त्याला भेटायला जातोय तर रिकाम्या हाताने जाणे योग्य ठरेल का म्हणून सुदामाने बायकोला काहीतरी घरातील जिन्नस पदार्थ शिल्लक आहे का बघायला लावला. बायकोने घरातले थोडे उरलेले पोहे दही साखरेत घातले आणि त्याची पुरचुंडी बांधून आपल्या नवऱ्याकडे सुपूर्त केली. सुदामा द्वारकेच्या दिशेने मित्राला काहीतरी खाऊ म्हणून ती पोह्याची पुरचुंडी घेऊन निघाला.

द्वारकेमध्ये पोहोचताना रस्त्यातच सुदामाला आपल्या मित्राच्या घराची चाहूल लागत होती. अगदी सोनेरी किरणे समोर प्रसन्न पणे जाणवत होती. सुदामा द्वारकेत पोहोचल्यावर त्याला समोर कृष्णाचा महाल दिसला. संपूर्ण महाल जणू सोन्याचा दिसत होता. सर्व रेलचेल होती, दारात रखवालदार पहारा देत होते. इतका लवाजमा पाहून सुदामा थोडा धास्तावला. दारात रखवालदारांनी त्याला अडवले त्याच्या अवतारकडे बघून कोण तू कोणाला भेटायचे आहे असे प्रश्न सुदामाला विचारले. 'मला कृष्णाला भेटायचे आहे, तो माझा मित्र आहे, आम्ही दोघे बालमित्र आहोत, एकाच गुरुजींनी आम्हाला दोघांना शिकवले आहे.' सुदामा थोड्या हलक्या आवाजात रखवालदारांना म्हणाला. रखवालदार थोडे हसू लागले. 

दारातल्या ओळखीच्या आवाजाने श्रीकृष्ण बाहेर आला. आपल्या बालमित्राला पाहून त्याला गहिवरून आले. सुदामाला बघताच श्रीकृष्णाने त्याला आलिंगन केले. सुदामाला घेऊन श्रीकृष्ण महालाच्या आत आला. महाल आतून पाहून सुदामाचे डोळे दिपले गेले. श्रीकृष्णाने त्याला आपल्या आसनाच्या बाजूला बसवले आणि विचारपूस करायला घेतली. दोघांना लगेच बालपणीचे सांदीपानी ऋषींच्या आश्रमातील दिवस आठवले. सुदामा आपली पुरचुंडी लपविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र श्रीकृष्ण त्याच्या पासून काय लपते का. त्याने लगेच मित्रा काय आणले मला पुरचुंडीत असा सुदामाला प्रश्न केला. सुदामाने दबकत पोह्याची पुरचुंडी श्रीकृष्णा कडे केली. दही पोहे माझ्या अतिशय आवडीचे, असे म्हणून कृष्णाने लगेच त्या पोह्यांवर ताव मारला. कृष्ण ते पोहे खाण्यात इतका मग्न झाला की त्याला सुदामाचे प्रेम अगदी आपसुख मिळाले होते. श्रीकृष्ण खुश होऊन त्याने सुदामाला दोन दिवस त्याच्याकडे राहण्याचा आग्रह केला. आपल्या मित्राचा आग्रह कसा नाकारायचा, हा देखील गहन प्रश्न होता. सुदामाने आपल्या परिस्थिती विषयी, किंवा कोणत्याही पद्धतीच्या मदतीविषयी कृष्णकडे कोणतीच बोलणी श्रीकृष्णाकडे केली नव्हती.

पोहे खाऊन झाल्यावर त्यांनी महालात जेवण केले, श्रीकृष्णासोबत जेवण करून, बालपणीच्या आठवणीत दोन दिवस कसे गेले सुदामाला कळले नाही. आपली करून कहाणी सांगून सुदामाला कृष्णाला हताश करावेसे नाही वाटले, म्हणून सुदामा दोन दिवसांच्या पाहुणचाराचा निरोप घेऊन पुन्हा आपल्या झोपडीच्या वाटेने निघाला. कृष्णा महालाच्या दाराशी सोडवायला आला. सुदामा वाटेत जाताना त्याला पुन्हा डोळ्यासमोर तेच प्रश्न घेऊन निघाला, आता काय होणार, संसाराचा डोलारा कसा सांभाळायचा. सुदामा आपल्या घराकडे पोहोचला मात्र त्याला काहीतरी वेगळेच भासत होते. त्याची झोपडी नाहीशी झाली होती. त्याच्या झोपडीच्या जागी त्याला एक डौलदार घर दिसत होते. त्याची चंद्रमोळी झोपडी आता एक मोठ्या वाड्यात रूपांतरित झालेली त्याला दिसली. घराबाहेर सुदामाची बायको स्मित हास्याने त्याची वाट पाहत होती. घरात प्रवेश केल्यावर घर दुधदुबते आणि धान्याने भरलेले दिसले. 

श्रीकृष्णाने महालात दोन दिवस राहण्यास सांगितले तेंव्हा दुसऱ्या बाजूने त्याने दोन दिवसांत हा चमत्कार करून दाखवला होता.

सुदामा कृष्णाकडे मदत मागण्यासाठी गेला जरूर होता मात्र त्याने त्याला काहीच सांगितले नाही, मित्र श्रीकृष्णासारखा असावा. काही न मागता जो आपल्या भावना ओळखू शकतो असाच मित्र असावा. आपला मित्र गरीब आहे, अशी गरीब श्रीमंतीची भावना डोक्यात न आणता कृष्णाने सुदामा ला आपल्या आसनाशेजारी बसवले, त्याचे पोहे खाल्ले, त्याच्या सोबत भोजन केले, मित्र असाच असावा. 

श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचा हा दिवस होता अक्षय तृतीयेचा. थोडेसे पोहे खाऊन श्रीकृष्ण सुदामाच्या परिस्थितीशी अवगत झालेला होता. आपली देण्याची थोडी तरी दानत असली तरी परमेश्वर आपल्या पुड्यात न संपणारा आनंद मांडतो. अक्षय तृतीयेचा हा सण सांगतो मैत्रीची कहाणी, हा सण सांगतो आपल्या घासतला घास दुसऱ्याला देण्याची कहाणी, हा सण सांगतो आपल्याला मनकवड्या कृष्णाची कहाणी ज्याला काही न सांगता संपूर्ण संसाराची माहिती आहे. 

चला अशाच एका कृष्णाला अशाच एका मित्राला आठवा, आणि करा त्याला फोन, सर्वांना अक्षय तृतीयेच्या, मित्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त