सीता : का ती नकोशी झाली....
सीता : का ती नकोशी झाली....
प्रा. अलोक पवार
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील घटना. साधारण २६५ मुलींना एका कार्यक्रमात बोलावले होते. बर या सर्व मुलींची नाव एकच होती. आणि त्या सर्वांसाठीचा हा कार्यक्रम. बर कार्यक्रमात त्या सर्व जणींना नवीन नाव प्राप्त होणार होते. या सर्व जणींचे नाव काय होते माहिती ..... नकोशी. अगदी पुण्यातील एक घटना ...२०१२ मधील मात्रेपुलाजवळ नदीपात्रालगत एक मुलगी भेटली. म्हणजे या दोन्ही घटना महाराष्ट्रातल्या. त्याच महाराष्ट्रातल्या जिथून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना आधुनिक शिक्षण देण्याची सुरवात केली. आधी काही राजस्थान मधील घटना ऐकल्या होत्या, की मुलगी नकोय म्हणून जन्मल्यावर लगेचच तिला दुधाने भरलेल्या मोठ्या पात्रात सोडायची. खरच या मुली नकोश्या झाल्या आहेत का? कुठे आहोत आपण अजूनही रामायणात अडकलो आहोत का? अजूनही त्याच युगात आहोत का हा विचार करायला पाहिजे.
सीता आजही नकोशीच आहे ना? सीता तिच्या जन्माविषयी नाही माहिती पण ती राजा जनक याला वैशाख महिन्याच्या नवमीला धरणीमातेच्या पोटात भेटली, तोच तिचा जन्म म्हणावा. हीच असते ना सीता नवमी.
भारतामध्ये सध्याही बरेच असे प्रदेश आहेत जिथे भयावह दुष्काळी भाग आहे. वर्षानुवर्षे या भागांत पाऊसच पडला नाही. सध्याच्या भारतभूमीच्या जवळच म्हणजे सध्या जनकपुर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेपाळ देशातील असाच एक भाग भगवान रामाच्या काळी देखील होता, मिथिला.....जो अतिशय भयावह परिस्थितीशी झुंजत होता. तेथील राजा 'जनक' हा देखील ही परिस्थिती कशी हाताळावी या गहन विचारात होता. अयोध्येसारख्या भागातील राजांकडून मदत येत होती पण ही मदत तितकी पुरेशी नव्हती. जनक राजाची पत्नी 'सुनयना' ही या संपूर्ण परिस्थितीला स्वतः जवाबदार मानत होती कारण तिला अद्याप स्वतचे मूल नव्हते. मात्र राजा जनक या गोष्टीला राणीची काही चुकी नसून असे जर काही असेल तर त्यामध्ये तो देखील तितकाच जवाबदार समजत होता.
अशातच ही परिस्थिती हताश होऊन सांभाळायची नाही तर काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने राजा जनकाने सोन्याचा नांगर तयार केला आणि मोठ्या थाटामाटात तो आपल्या प्रदेशातील शेतात चालवायला घेतला. जनक राजाला नांगर चालवताना एका भागात काहीसे जड जड वाटले, राजाने लगेच पाहिले तर त्याला धरणीच्या कुशीत एक पेटी दिसली. अलगत ती पेटी काढून बघितली तर त्यातून एक दिव्य प्रकाश बाहेर येताना दिसला. पेटीचे झाकण खोलताच जनकाला त्या पेटीत एक बालक - कन्या दिसली. राजा जनकाने लगेच तिला आपल्या हातात उचलली. त्या क्षणी मिथिला नगरीमध्ये लगेचच काळे ढग आले आणि मोठी मेघ गर्जना सुरु झाली. थोड्याच वेळात मोठा पाऊस सुरु झाला. देवाने आपल्याला अपत्य दिले आणि या अपत्याचा पायगुण इतका उत्तम की लगेच जिथे अकाली परिस्थिती तोंड वर काढत होती तिथे सर्व व्यवस्थित होत होते. राजा जनक आणि राणी सुनयना एकदम आनंदी झाले होते. जी बंजर भूमी होती तिथे पालवी फुटली होती. पक्ष्यांची किलबिल एकू येऊ लागली होती.
ती कन्या मुळात धरणीच्या कुशीतून जन्मली होती. मात्र जनक राजाने तिचा मुलगी म्हणून तिचा स्वीकार केला होता म्हणून तिचे नाव जानकी देखील होते. जनक राजाने सोन्याच्या नांगर जमिनीवर चालवून एक रेषा तयार झाली होती. या रेषेला सीता म्हणतात. म्हणजेच जमीन नांगरताना जी कन्या राजा जनकाला प्राप्त झाली तिचे नाव पुढे सीता ठेवण्यात आले. मिथिला प्रदेश असल्याने सीतेला मैथिली असेही म्हणतात. तर राजा जनक हा विदेह देशाचा राजा म्हणून ओळखला जात असल्याने सीतेला वैदेही असेही म्हणतात. काही रामायण कथेमध्ये सीतेला रावणाची मुलगी म्हणले जाते. मात्र तीच पुढे रावणाच्या अंताची कहाणी बनली. पण इथे हा प्रश्न असा उपस्थित होतो. सीता जमिनीच्या कुशीत त्या पेटीत कशी भेटली. म्हणजे आजच्या नकोशी सारखी तिची तर तर काही कहाणी नाही ना? असो आपण अजून सीतेला समजून घेऊ.
सीता फक्त जमिनीच्या कुशीत जन्मली नव्हती. तर ती खरी आद्य बिजमाता होती. तिला शेतीमधील तंत्र नांगरणी, मशागत, काढणी, या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित होती. उत्तम बीज कसे असते, ते कसे ओळखावे याची सर्व कल्पना सीतेला होती. सीता ही साक्षात लक्ष्मीचा अवतार असल्याने धान्यलक्ष्मीचे सर्व गुण सीतेमध्ये होते. जानकी ही राजकन्या असली तरीही थेट शेतामध्ये काम न करणे, इतर राजकन्या जसे राजभवनाचा उपभोग घेतात तसा शाही घराण्यामध्ये आराम करणे या गोष्टींपेक्षा निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडायचे. सीतेची कहाणी अशीच पुढे गेली. सीतेचे स्वयंवर झाले. अयोध्येच्या दशरथ राजाच्या मुलासोबत म्हणजेच भगवान श्रीराम यांच्या सोबत सीतेच लग्न झाले. पुढे दशरथाची तिसरी पत्नी कैकई हिला तिच्या मुलाला म्हणजे भरत याला राजा बनविण्याच्या अट्टाहासाने राजा दशरथ याला रामाला वनवासात पाठविण्याची आज्ञा देण्यास प्रवृत्त करते. रामासोबत सीता देखील वनवासात निघाली. सीतेसाठी पतीधर्म महत्वाचा होता. त्यांच्यासोबत रामाचा धाकटा आणि लाडका भाऊ लक्ष्मण देखील निघाला. मात्र लक्ष्मणाची पत्नी 'उर्मिला' ही अयोध्येतच राहिली. आता प्रश्न इथे असा होता, रामाला राजा करायचे नव्हते म्हणून त्याला वनवासात पाठवले. सीतेला पाठविण्याच्या काहीच उद्देश नव्हता. मग जर उर्मिला राजदरबारी राहिली तर सीता तिथेही नकोशी होती.
राम सीता आणि लक्ष्मण वनवासातील आयुष्य व्यतीत करीत होते. सीता आधीच बिजामाता होती, पर्यावरण प्रेमी होती, ती अगदी आनंदाने वनवासातील हा संसार व्यवस्थित पणे चालवत होती. मात्र जंगलात फिरत असताना शूर्पणखा (श्रीलंकेचा राजा रावणाची बहिण) हिला जेंव्हा राम आणि लक्ष्मण यांनी नाक कापून न ऐकण्याची शिक्षा दिली त्याच वेळी शुर्फणका हिचा झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावणाने सीतेच अपहरण केल. इथे प्रश्न येतो चुकी किंवा जे काही कृत्य घडले होते ते झाले होते राम आणि लक्ष्मणाकडून. मग शिक्षा सीतेला. इथेही ती नकोशी होती.
पुढे रामायण घडले. रामाने भाऊ लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव आणि प्रचंड वानरसेना यांच्या सहाय्याने रावणावर मात केली. आणि सीतेला त्याच्या कैदेतून मुक्त केले. या सर्व गोष्टींमध्ये चौदा वर्षांचा वनवास संपला होता. त्यामुळे राम सीतेला घेऊन अयोध्येत परतला होता. राम राजा झाला. राम आणि रावणाच्या युद्धाची, सीतेच्या अपहरणाच्या गोष्टी रामाच्या प्रजेपासून लपल्या नाहीत. प्रजा कुरकुर करू लागली, इतके दिवस रामपत्नी रावणाकडे होती, मग ती खरीच चारित्र्यवान आहे का? रावणाच्या आश्रयाला राहिल्यावर या रामाच्या प्रजेविषयी विवंचना होती त्यातून ही सीता या प्रजेलाही नको होती, असे वाटत होते. अगदी प्रजेपैकी धोब्याने हा प्रश्न उपस्थित केल्यावर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. प्रजेच ऐकणारा राजा राम हा देखील सीता हिच्यापासून लांब होता. जशी शुर्फणका त्याला भेटली होती तशा अनेक स्त्रिया त्याला देखील भेटण्याच्या संभावना नाकारल्या जाऊ शकत नव्हत्या मग अग्निपरीक्षा फक्त सीतेलाच का? कारण ती नको होती. सीता अग्निपरीक्षा पास झाली. मात्र तरीही प्रजेची कुरकुर काही थांबत नव्हती त्यामुळे रामाला एका बाजूला प्रजा आणि दुसऱ्या बाजूला आपली पत्नी सीता अशी द्विधा मनस्थिती झाली होती. सीता त्या वेळी गर्भवती होती. सीतेने रामाला राजा असल्याने प्रजेकडे प्रामुख्याने पहिले पाहिजे, त्यांचे सुख माझ्या नसण्यात असेल तर मी अयोध्या सोडून जाते असे म्हणून गर्भावस्थेत सीता ही वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहायला गेली.
आश्रमातच सीतेने दोन जुळ्या मुलांना म्हणजेच लव-कुश ला जन्म दिला होता. सीता आपल्या मुलांना वाल्मिकी आश्रमात अगदी व्यवस्थित सांभाळत होती. त्यांना श्रेष्ठ राजा पराक्रमी राजा रामाच्या गोष्टी देखील सांगायची. पुढे रामाच्या अश्वमेघ यज्ञाच्या वेळी श्रीराम आणि लव- कुश ची भेट होते. कुमार वयातील ही मुले आपलीच आहेत हे कळताच रामाने लगेच सीतेला ऋषीमुनींच्या मार्फत बोलावणे पाठवले. सीता आली देखील. मात्र रामाने तिला पुन्हा एकदा अग्निपरीक्षा द्यायला लावली. वाल्मिकी ऋषींनी सीता ही पतिव्रता आहे हे पटवून दिलेच. रामाला देखील हे मान्य होते. मात्र प्रजेच्या शंकेच्या दृष्टीकोनातून त्याने सीतेला या दुसऱ्या वेळी अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडले. यावेळी मात्र सीता हतबल झाली. जी सीता वनवासात जाताना रामाच्या बरोबर गेली, त्याची साथ दिली. जिची काहीची चुकी नसताना, शूर्पणखेच्या कारणावरून तिचे रावणाने अपहरण केले, एकदा अग्निपरीक्षा पास होऊनही हा दुसऱ्या अग्निपरीक्षेचा जो थाट तिच्यासमोर मांडला होता ती त्याला कंटाळली होती. राजा राज्य करीत असताना प्रजा हे त्याच आद्य कर्तव्य असते मात्र हे कर्तव्य बजावत असताना कोणी निर्दोष बळी तर जात नाहीना या गोष्टीकडे देखील राजानेच लक्ष दिले पाहिजे. सीता ही जेंव्हा वाल्मिकी ऋषींच्या दरबारी होती तेंव्हा ती राणीसारखी न राहता ऋषींच्या आश्रमातील सामान्य एका स्त्री होती. मग जर प्रजा एखाद्या निरापराध व्यक्तीची चारीत्र्याविरोधी तक्रार करीत असेल तर राजाने त्यामध्ये किती तथ्य आहे हे तपासून मग शिक्षा सुनावली पाहिजे. खरे तर पहिली अग्निपरीक्षा हीच सीतेसाठी एक मोठी शिक्षा होती. तरीही तिने ती राजीखुशी स्वीकारली. मात्र दुसऱ्यांदा जेंव्हा सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली गेली. त्यावेळी तिला पुन्हा पुन्हा या परीक्षेसाठी सज्ज करणे. एकंदरीच कदाचित यावेळी रामाला पण नकोशीच होती सीता.
सीता लग्न झाल्यावर वनवासात जाते, तेथून रावण तिचे अपहरण करतो, तेथून परत आल्यावर अयोध्येची प्रजा जी रामराज्यात जगत होती त्या प्रजेने शंका घेतली त्यामुळे आश्रमात गेल्यावरही सीतेच्या माहेरच्यांची कोणतीच मदत सीतेला मिळाली नव्हती. मिथिला नगरी राजा जनक त्या सीतेला विसरला का काय जिच्या प्राप्तीमुळे मिथिला नगरी दुष्काळ मुक्त झाली होती. का 'दिली तिथे मेली' या उक्तीप्रमाणे राजा जनक आणि संपूर्ण मिथिला या सीतेला विसरली होती. का सीतेच्या या माहेर वासियांना देखील सीता नकोशी झाली.
सीतेने या ठिकाणी जेंव्हा तिला पुन्हा अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडले गेले तेंव्हा तिने असह्य होऊन धरणीमातेला विनवणी केली की, "हे धरणीमाता जर मी पवित्र असेल, जर मी नेहमीच माझ्या पतीशिवाय कोणत्याही परपुरुषाचा कधीच विचार केला नसेल तर तू मला तुझ्या पोटात सामावून घे."त्या आईने म्हणजेच धरणीमातेने देखील आपल्या व्यथित कन्येला आपल्या पोटात सामावून घेतले. सीता धरतीच्या उदरातून जन्माला आली होती ती पुन्हा धरतीच्या उदारातच गेली.
सीता राम असताना गेली. रामाने तिला राणीचा किंवा तिच्या सन्मानाने काही रामराज्यात केले नाही. जी सीता जन्माला आल्याने दुष्काळ मिटतो, त्या तिच्या पुत्रांनी देखील सीतेसाठी आज काहीही केले नाही. कोण सीता, ती नाही जी धरणीमध्ये सामावली. ती सीता. जी आज आहे. भारतामध्ये आजही सीता उपेक्षितच आहेत. या सीता शेतामध्ये मशागत करतात पण त्यांना शेतकरी म्हणून संबोधले जात नाही. त्या सीता जंगलामधून किंवा आधुनिक युगात बाजारातून आपल्या घरासाठी सामान गोळा करते. तरीही आज या सीता (पत्नी) नाकारल्या जातात. आजही बरेच रावण बऱ्याच मुलींचे अपहरण करतात. बर रावणाने सीतेच्या मर्जीशिवाय तिच्याशी कोणताही गैरप्रकार कधीच केला नाही. मात्र आजकालचे जे रावण आहेत ते या मुलींवर अत्याचार तर करतातच. त्याशिवाय त्यांना जीवे मारून टाकायला देखील पुढे मागे बघत नाहीत. का कारण या सीता जगाला नको असतात. स्त्री आई म्हणून पत्नी म्हणून स्वीकारली जाते. पण तिला मुलगी म्हणून या एकविसाव्या शतकात देखील स्वीकारले जात नाही. पत्नी म्हणून स्वीकारले तरीही पुत्र आसक्ती म्हणून तिला स्वीकारले जाते.
बघा आजही रामाचे मंदिर बांधले जाते आहे. त्यासाठी बऱ्याच लोकांनी वर्गणी काढून राममंदिर उभारण्याचा प्रण केला आहे. सीतेची एखादी मूर्ती देखील त्या मंदिरात नक्कीच ठेवली जाईल. राम जन्म म्हणजेच राम जन्म घरोघरी साजरा केला जातोय. पण सीता नवमी आहे लक्षात. सीतेसाठी कुठे शेतकरी मातांच्या कुशलतेसाठी केला जाते आहे का प्रयत्न. आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे सीतेचा त्याग दाखवतो रामाची महानता. सीतेचा त्याग दाखवतो रामाचे प्रजेकडे लक्ष देणे. सीतेचा त्याग दाखवतो राम - रावणाच्या युधातील रामाचा विजय. सीतेचा त्याग दाखवतो एका पुरुषाची गोष्ट जो कदाचित आपल्या पत्नीच्या चरित्रावर विश्वास ठेवू नाही शकला. आणि आजही सीता त्यागच करते आहे.
आजही मुलीचा जन्म झाल्यावर बरेच पुरुष, बरेच सासरची मंडळी दुखी होतात, तिथे सीता आठवा. आजही पत्नीचा बऱ्याच कारणांवरून छळ होतो, तेंव्हा सीतेचे धरतीमध्ये सामावणे आठवा. आजही आपण एका बाजूला बसून माहिती नसलेल्या गोष्टींवरून स्त्रियांच्या चरित्रावरून बोलतो, त्यावेळी आपण त्या रामाच्या प्रजेपैकी आहोत का याचा एकदा विचार करा.
चला रामराज्य होणे रामाला अपेक्षित आहे की नाही माहिती नाही मात्र तरीही आपण रामराज्याची वाट बघतो आहे. मग सीता सन्मानासाठी सध्या हयात असण्याऱ्या स्त्रियांना सन्मान द्या. आजची सीता नवमी साजरी करूयात.
बोलो सीता मैया की जय....


सीतेबद्दल अतिशय सुंदर माहिती दिलीस..अलोक..
ReplyDeleteमिथिला नगरी नेपाळमधे होती..हे मला पहिल्यांदाच कळाले...
खरंच हा प्रश्न कधीच कसा कोणास पडला नाही...जो तुला भेडसावला अलोक...की सीतेवर एवढे दु:खाचे प्रसंग आले...तेव्हा तिचे माहेर कुठे होते...??
ज्या सीतेच्या जन्मामुळे जनकाची मिथिला..सृजलाम सुफलाम झाली... सृजनाने अंकुरली... आणि जनकालाही अपत्य लाभ झाला...
अशी मिथीला नगरी...राजा जनक सीतेला विसरला कसा..??
आजही आपल्याकडे मुलींबाबत 'दिली तिथे मेली'...म्हणणारा भला मोठा समाज आहे... तेव्हा इथेही हे मनात येणे स्वाभाविकच आहे...
तुझा दुसरा एक मुद्दा अतिशय समर्पक आणि विचारशील आहे..
तो म्हणजे ...'त्याग'...
रामरायाचा त्याग सर्वश्रुत आहेच..
पण...
सीतेच्या त्यागाचे काय..??
सीतेचा त्याग दाखवतो..रामाची महानता...
सीतेचा त्याग दाखवतो..रामाच प्रजेबद्दलचे प्रेम..
सीतेचा त्याग म्हणजे..राम रावण युद्धातील श्रीरामाचा विजय...
अतिशय वैचारिक लेखन..
आजही 'सीता'..वंचित का...
मावशी माझं या लिखाणाचे प्रयोजन हेच आहे की सीता म्हणजेच स्त्रियांची परिस्थिती तेंव्हाही तीच होती आणि आजही ज्या स्त्रिया आहेत त्यांची परिस्थिती तिच्या पेक्षा वेगळी नाही. रामासाठी आजही रामराज्याची निर्मिती केली जाते पण सीता वंचित ठेवल्या जातात. मोजून१८ वर्षाच्या झाल्या की लग्नाच बघतात मग काय त्यांचं करिअर, शिक्षण सर्वच अर्धवट राहते. म्हणून विचारमंथन
Delete👍👍
ReplyDelete