आपल्यातला बुद्ध...
आपल्यातला बुद्ध
प्रा. अलोक अर्जुन अलका पवार
सर्वत्र आनंद झाला होता, राणी महामाया ने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. तो दिवस होता वैशाख पौर्णिमेचा. नेपाळ मधील लुंंबिनी शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन आपल्याला मुलगा झाला, आपल्या राज्याला राजकुमार मिळाला म्हणून प्रचंड खुश झाला होता. मात्र राजपुत्राच्या जन्मानंतर अवघ्या सात दिवसांत त्याची आई म्हणजेच राणी महामाया यांचे निधन झाले. एका बाजूला राज्याला राजकुमार मिळाल्याचा आनंद होता तर दुसऱ्या बाजूला राणी यांचे निधन झाल्याने राज्य शोक व्यक्त करीत होते. राजकुमाराला सांभाळण्याची जवाबदारी राणीची सख्खी बहीण गौतमी हिने घेतली, व तिने पुढे राजा शुद्धोधन याच्याशी विवाहदेखील केला. त्या तेजस्वी बाळाला बघायला आलेल्या ऋषीमुनींनी राजाला सांगितले की जर हे बाळ पुढे भविष्यात राजा झाला तर हा चक्रवर्ती राजा बनेल आणि जर याच बालकाने सन्यास घेतला तर त्याला जगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊन तो पुढे बुद्ध म्हणून प्रसिद्ध होईल. राजकुमाराचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले होते. राजा शुद्धोधन आपल्या मुलाला सर्व आनंद उपभोगता येईल त्याला शाही थाटात राहता येईल याकडे स्वतः जातीने लक्ष देत होता. त्याला योग्य शिक्षण देखील देण्यात आले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्धार्थ याचा विवाह यशोधरा हिच्याशी लावून देण्यात आला. राजा शुद्धोधन याने सिद्धार्थ याला हाताशी नोकरचाकर, गजांत वैभव आणि इतकी संपन्नता दिली होती ज्यामुळे सिद्धार्थला कोणत्याच अडचणींना सामोरे जावे लागत नव्हते. हे सर्व जणू काही असे होते की राजा शुद्धोधन याने सिद्धार्थाला भावी राजा बांधण्याचा चंग बांधला होता. राणी गौतमी ही देखील सिद्धार्थला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळत होती. तिच्यामुळेच सिद्धार्थला गौतम असे नाव प्राप्त झाले. राजकुमाराला कोणत्याही प्रकारची झळ सोसावी नव्हती लागती. राजाने हे सर्व ऋषीमुनींच्या भविष्यवाणीला अनुसरून करणे योग्य समजले होते. पुढे यशोधरा गर्भवती राहून तिने देखील एका मुलाला जन्म दिला त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले.
एक दिवस सिद्धार्थ याला फिरण्याची लहर आली. त्यासाठी त्याने राजेशाही रथाच्या सारथी चन्ना याच्या हातातील घोड्यांचा लगाम देखील स्वतःच्या हातात घेतला. चन्ना याने खूप अडविण्याचा प्रयत्न केला मात्र सिद्धार्थ त्या दिवशी अगदी न ऐकण्याच्या मूड मध्ये होता. सिद्धार्थ राजमहालाच्या परिसरातून बाहेर पडला. तो पहिल्यांदाच राजमहालाबाहेरची परिस्थिती कशी आहे हे नजरेतून बघणार होता. तो इतके दिवस फक्त त्याच्या खोलीच्या खिडकीतून फुले, फुलपाखरे यांचं दर्शन घेत होता आज मात्र तो एका वेगळ्या वास्तवास सामोरे जाणार होता. सिध्दार्थला बाहेर पडल्यावर जे दिसलं ते त्याच्यासाठी अगदीच नवीन होते. त्याने सुरवातीला एक वृद्ध व्यक्तीला बघितले. तो व्यक्ती अगदीच जरर्जर झालेला होता. त्याला एक कुष्ठरोग आजाराने व्याप्त व्यक्ती देखील दिसला, पुढे त्याला एक प्रेतयात्रा देखील दिसली. या यात्रेमध्ये त्या मृत व्यक्तीचे दुःखी नातेवाईक देखील दिसले. आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्याने ते सर्व हळहळ करून रडत होते. सिद्धार्थ ला या सर्व गोष्टी अगदीच नव्या आणि मनाला सुन्न अवस्थेत टाकणाऱ्या अशा होत्या. चन्ना याने या सर्व गोष्टी जीवनामध्ये अटळ असतात, हे स्पष्ट केले. पुढे सिद्धार्थ ने संन्यासी देखील पाहिला, ज्याने आपल्या संसाराचा त्याग करून भक्तीच्या मार्गाने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीत होता. या सर्व गोष्टी आपल्या पुत्राच्या नशिबी येऊ नये म्हणूनच राजा शुद्धोधन याने धार्मिक, अध्यात्मिक, चिंता, जप तप आणि वैराग्य यांसारख्या गोष्टी पासून दूर ठेवले होते. सिद्धार्थ राजमहालकडे आला मात्र अजूनही त्याचे मन बाहेर घडणाऱ्या गोष्टींकडेच होते. जर एक दिवस प्रत्येकाला मृत्यू होणे अटळ आहे तर हे राजवैभव काय कामाचे? प्रत्येक गोष्टीचा मोह काय कामाचा? त्याच्या मनामध्ये कल्लोळ चालू होता. या सर्व गोष्टी तडीस जाऊन त्याने राज वैभव सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच रात्री त्याने यशोधरेला लांबून पाहिले, आपल्या बाळाला राहुलला जवळ घेऊन त्याचे चुंबन घेऊन त्याला पुन्हा यशोधरेच्या बाजूला ठेवले. आणि त्याने महाल सोडला. सारथी चन्ना ला अर्ध्या वाटेपर्यंत स्वतःला सोडायला लावून सिद्धार्थ ने त्याला परत राज दरबारी जाण्यास सांगितले. चन्नाने राजपुत्राला भरपूर विनवणी केली पुन्हा दरबारात येण्याची मात्र सिद्धार्थ आपल्या निर्णयावर एकदम ठाम होते.
कर्म करण्याच्या गोष्टींमध्ये मुलाला जन्म देऊन त्याला सांभाळण्याचे काम आई व वडील दोघांचेही असते. मात्र सिद्धार्थ याच्या आयुष्यात त्याने लग्न करून यशोधरेला आणि जन्म देऊन राहुल ला मध्येच सोडले इतकेच विधान सिद्धार्थ च्या आयुष्यात कुठेतरी खुपण्यासारखे जाणवते. राहुल ला राजवैभव तर होते मात्र पितृप्रेम त्याच्या आयुष्यात कमी वाटते. यशोधरेच्या आयुष्यात तिने इच्छिलेले पतिप्रेम कमी जाणवते.
मात्र या सर्व मोहमायेच्या गोष्टी आहेत जीवनात मोक्ष हे अंतिम सत्य आहे हे जाणून घेतलेल्या सिध्दार्थने संन्यासी जीवन निवडले होते. त्याने पिंपळाच्या वृक्षाखाली बसून असाधारण ध्यानधारणेस सुरवात केली. त्याने जीवनातील अनेक सत्याच्या चिरंतन अभ्यास करून बहुमोल असे ज्ञान प्राप्त केले. त्यातूनच त्यांचे पुढे नाव गौतम बुद्ध असे झाले.
शरीरासाठी आवश्यक तेवढ्या भिक्षेचा वापर करून आयुष्य काय आहे यासाठी बुद्धाने जगाच्या अभ्यासाला सुरवात केली. अथक ज्ञान प्राप्ती करून त्यांनी काही नितीमुल्य जगाला दिली.
चार महत्वाची आर्यसत्य बुद्धांनी मांडली त्या मध्ये सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे दुःख. प्रत्येक व्यक्ती आयुष्य जगत असताना मोहात अडकतो त्याला त्याच्या यानुसार कोणत्याही गोष्टीची प्राप्ती न झाल्यास तो दुःखाच्या गोष्टींमध्ये अडकतो. दुसरे सत्य होते तृष्णा, प्रत्येक गोष्टीचा हव्यास ती गोष्ट अधिकाधिक प्राप्त होण्यासाठी मनुष्य भरपूर धडपड करतो मात्र ते न मिळण्यास तो पुन्हा दुःखाच्या भोवऱ्यात अडकतो. म्हणून बुद्धाने तिसरे सत्य सांगीतले ते म्हणजे दुःख निरोध, म्हणजेच ज्या गोष्टी दुःख देतील त्यांना आपल्यापासून लांब ठेवण्याची, मोह होणाऱ्या गोष्टी आपल्यापासून लांब ठेवण्याची.आणि म्हणूनच चवथे सत्य होते प्रतिपाद म्हणजे दुःख लांब ठेवण्यासाठी आपल्या जीवनात सदाचार ठेवणे योग्य असते. आणि यासाठी अष्टांग मार्गाचा अवलंब देखील त्यानें दिला. ज्यामध्ये सम्यक विचार होते, दृष्टी, संकल्प, वाचा, कर्म, आजीविका, व्यायाम, स्मृती आणि समाधी या आठ म्हणजेच अष्टांग गोष्टींचा विचार त्याने जगासमोर मांडला.
बुद्ध हे सिद्धार्थ चे नाव नव्हते मात्र त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारावर त्याला दिलेली उपाधी होती. आपलेही जीवन अशाच सुन्न विभिन्न दुःखांनी व्यापलेले असते. या दुःख देणाऱ्या गोष्टी आपण जर बाजूला सारून बघितले तर आयुष्य सुकर होते. यासाठी आपल्याला बुद्धासारखे आयुष्य त्याग करून सन्यास घेण्याची गरज नाही. मात्र आपल्या शरीरात बुद्ध जागृत करणे नक्कीच आवश्यक आहे. बुद्ध म्हणजे जीवनातील सत्याचा स्वीकार करणे, बुद्ध म्हणजे अष्टांग मार्ग.
सध्या या धावपळीच्या जीवनात सुख आणि दु:ख यांची ये जा चालूच असते. सुख आले तर आपण त्याला त्वरित स्वीकारतो मात्र आपण त्या सुखाच्या मागे इतके धावतो की जर त्या सुखाच्या मात्रेत थोडाफार जरी फरक आला तर आपण कासावीस होतो आणि आपले दु:ख सुरु होते. इथेच आपल्याला आपल्याला आपल्यातला बुद्ध जागृत करायचा आहे. आपल्याला त्या दुःखाच्या गाड्यात अडकून ब बसता ते दु:ख आयुष्यापासून लांब सारता येईल का याचा विचार करावयाचा आहे.
आज बुद्धपोर्णिमा म्हणजेच महान अशा गौतम बुद्ध यांचा जन्म दिवस. तेंव्हा त्याच्या या मूलमंत्राचा चार सत्यांचा आणि अष्टांग आयुष्य जगण्याच्या मार्गाला स्वीकार केले तर नक्कीच आपले आयुष्य सुकर होऊ शकते.
२६ मे २०२१

बुद्धाची जीवनगाथा उत्कृष्ट उलगडून दाखवली..अलोक..
ReplyDeleteआजच्या धावपळीच्या जीवनात सुखदुःखाच्या मात्रेतील सुखात जरा जरी फरक पडला तर आपण कासावीस होतो...हे तुझे म्हणणे अगदीच खरे आहे... आणि इथेच दु:खाची शृंखला सुरू होते.. म्हणूनच तू म्हणतोस तसे...
आपल्याला आपल्यातल्याच बुद्ध शोधता आला पाहिजे..कारण बुद्धाकडे तर राजवैभव होते...एक सुंदर सद्गुणी पत्नी आणि पुत्र ही होता तरी त्याला..हे सारे क्षणभंगुर...अशाश्वत आहे, हे कळाले आणि त्याने सत्याच्या शोधार्थ 'राज्यत्याग'..केला.
तर आपण अगदी सामान्य माणसे आहोत...संन्यास शक्य नाही...पण दु:ख बाजूला सारून शाश्वत सत्याच्या विचार केला पाहिजे...हे तू तुझ्या ..'आपले सण'..या लेखमालेतून तेव्हाचा बुद्ध आणि आत्ताचा इंटरनेट युगातला बुद्धीवान माणूस यांची सांगड घालत... अतिशय हळूवारपणे..दु:खाचा बाऊ करण्यापेक्षा 'निचरा'...करता येतो...हे समर्पक रित्या मांडले आहेस...
यातील मला भावलेले...
वाक्य..'आपल्याला आपल्यातला बुद्ध जागृत करायचा आहे.'
रेखा मावशी तुझा अभिप्राय एकदम सुंदर आहे. पण त्याकाळच्या बुद्धाचे मला एकच पटले नाही, की तो यशोधरा आणि राहुल यांना सोडून गेला. आपण लग्न करतो आपण मूल जन्माला घालतो तेंव्हा 'आपले कुटुंब आपली जवाबदारी' असते. मात्र बुद्धाचे उर्वरित आयुष्य जी बुद्धीची वाटणी करण्यात झाली ती समर्पक आहे
Delete