गोष्ट नरसिंह जयंतीची गोष्ट एका अधर्म नाशाची
गोष्ट नरसिंह जयंतीची गोष्ट एका अधर्म नाशाची
प्रा अलोक अर्जुन अलका पवार
"बोल वत्सा, तुला काय वरदान हवे", आधीच्या काळी साधारण हे असे ब्रम्हवाक्य प्रसिद्ध होते. हिरण्यकश्यपूने ऊन, वारा, पाऊस सर्व त्रास झेलून शेवटी ब्रम्हदेवाला प्रसन्न केले होते. ब्रम्हदेव पण इतकी कडक तपश्चर्या बघून त्वरित हजर झाले होते. त्यावेळी फक्त तथास्तू हा एक शब्द बोलले म्हणजे झाले. मात्र त्यावेळी पुढे कोणत्याही प्रकारची तोंडी परीक्षा नव्हती की पुढे काय करणार वरदान मिळाल्यावर, पुढचे थोडे फ्युचर प्लॅन सांगा वैगरे थेट तथास्तू. आणि मग याच तथास्तू च्या जोरावर पुढे जे काही होईल त्याला परत एक मोठा हंगामा अशी परिस्थिती. त्या काळी अगदी वरदान देताना लाभार्थी चे बॅकग्राऊंड तपासणे, कोणी रेफरन्स देत आहे का वरदान दिले की लाभार्थी कोणत्याही प्रकारे चुकीची कामे करणार नाही हे देखील काही नव्हते. या सर्व अद्ययावत मोहीमा फक्त कलयुगातच. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग सर्व युगात ही सर्व अंधाधुंदी म्हणायला काही हरकत नाही.
बर कोणते वरदान होते याची यादी बघा.
कोणत्याही मानवाच्या किंवा प्राण्यांच्या हाती मारला जाणार नाही.
रात्र आणि दिवसा मृत्यू शक्य नाही.
कोणत्याही अस्त्र शस्त्राच्याद्वारे मृत्यू नाही.
आकाशात किंवा खाली जमिनीवर मृत्यूची संभावना नाही.
पृथ्वीच्या आत किंवा बाहेरही मृत्यूची संभावना नाही.
बघा वरदान पण कसे, देण्याऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एकदा देण्याऱ्याचे हात पण घ्यावेत. म्हणजे खरेच त्या ब्रम्हदेवाने पण घाबरून राहावे.
हिरण्यकश्यपू वरदान मिळून अतिशय शक्तिशाली झाला होता. मात्र याच हिरण्यकश्यपूकडे त्याचा मुलगा हा जरा वेगळ्या चालीरीतीचा निघाला म्हणायला हरकत नव्हती. हिरण्यकश्यपने सर्वांना तंबी भरली होती की कोणीही विष्णूची पूजा करणार नाही. त्याने विष्णूची मंदिरे देखील तोडली होती. मात्र आपल्याच घरात त्याने प्रल्हादाला जन्म दिला होता तो काही केल्या ऐकेना. तो नुसता एकच जप करीत होता नारायण नारायण.. त्याला खूप समजावून सांगितले. आपण राक्षस कुळातले आपण आपली राक्षसी प्रवृत्ती दाखवायची असते, वागवायची असते मात्र तो प्रल्हाद ऐकतोय कसला. या सर्व गोष्टीतून हिरण्यकश्यपू चा पारा मात्र वर चढत होता. प्रल्हाद देखील तस की मस होईना, नुसते आपले नारायण नारायण.... प्रल्हाद शेवटी हिरण्यकश्यपूचा मुलगा जशी त्यांनी कडक तपश्चर्या करीत होता तशीच त्याचा लेक देखील करीत होता. दोघांच्या तपश्चर्या मध्ये फरक एकच होता की हिरण्यकश्यपू हा त्याला वरदान प्राप्ती साठी देवाचे नाव घेत होता तर प्रल्हाद हा भक्तिभावाने देवाचे नाव घेत होता. हिरण्यकश्यपू शेवटी लेकाच्या प्रयत्नांना कंटाळून त्याला अद्दल घडवायचे ठरवतो आणि भक्त प्रल्हादाला गरम झालेल्या तेलाच्या कढईत टाकतो. प्रयत्न अयशस्वी. प्रल्हाद मस्तपैकी बाहेर येतो. दुसरी परीक्षा हिरण्यकश्यपू त्याची बहीण होलिका हिला सुपारी देऊन पाहतो. बाप तर बाप आत्या पण लाडाची नाही, ती पण आपल्या अग्निरूपात भाच्याला मांडीवर बसवते मात्र प्रल्हाद तेथूनही सुखरूप बाहेर. अशा बऱ्याच लढ्यांचा सामना प्रल्हाद अगदी व्यवस्थित करून पुन्हा आपले तेच ते नारायण नारायण....
हिरण्यकश्यपूचे कान आता हे नारायण नारायण चा जप ऐकून ऐकून पिकले होते. तो प्रल्हादकडे येऊन त्याला म्हणतो कोणासाठी तू हा नारायण नारायण चा जप लावला आहेस. आहे तरी कुठे तुझा नारायण. प्रल्हाद म्हणाला माझा नारायण या सृष्टीत आहे, चराचरात आहे.
हेच उत्तर खरे महत्वाचे आणि लक्षात घेण्यासारखे आहे. देव चराचरात आहे म्हणजे नक्की काय? आपण सर्व हा निसर्ग, इथली प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट कारणासाठी तयार झाली आहे. आपण, प्रत्येक पशु, पक्षी, सूक्ष्मजीव, झाडे, वनस्पती, पाणी, डोंगर, दऱ्याखोरे, अगदी सगळी सृष्टीचं कोणत्या ना कोणत्या कारणासाठी निर्माण झाले आहेत. मग त्या सर्वांमध्ये शक्ती आहे आणि ही एक अशी शक्ती आहे ज्यास आपण दैवी शक्ती म्हणू शकतो. प्रल्हादाला याच गोष्टींची माहिती होती आणि म्हणूनच तो म्हणत होता की माझा देव माझा नारायण चराचरात आहे.
हिरण्यकश्यपू चा पारा आज प्रचंड चढला होता, तो समोर असलेल्या मोठ्या खांबाकडे बघून प्रल्हादाला विचारतो या खांबात आहे का तुझा नारायण. घरातला खांब घर उभे करतो, तो खांबच नसेल तर घर उभे कसे राहणार. त्यामुळे त्याचे एक वेगळे विशेष आहेच. मात्र प्रल्हादाला खोटे ठरविण्यासाठी हिरण्यकश्यपू आपल्या हातातील गदा खांबावर जोरात आपटतो, तसे त्या खांबातून एक दैवी शक्ती बाहेर येते, ही दैवी शक्ती म्हणजे नरसिंह, नारायणाचे सोळावे रूप.
हे रूप पूर्ण पणे मानव नव्हता, पशु नव्हता तर शरीर मानवाचे आणि तोंड सिंहाचे असा मिलाप होता. त्याने इतके विक्राळ रूप धारण केले की त्याने हिरण्यकश्यपू ला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्या पोटातून कोथळ्या बाहेर काढल्या. हिरण्यकश्यपू चा अंत झाला. दिवस आणि रात्र गारठून वेगळाच प्रहर झाला होता. नरसिंहाच्या मांडीवर आकाश आणि जमीन या दोघांचाही भाग नव्हता. तसेच नरसिंहाने त्याच्या धार धार नखांनी हिरण्यकश्यपूचा वध केला होता, कोणत्याही प्रकाराचे अस्त्र किंवा शस्त्र त्याने वापरले नव्हते. अशा प्रकारे ब्रम्हदेवाच्या वरदानाला तारण्यासाठी हा होता नारायणाचा नरसिंहरुपी अवतार.
आपल्याला निसर्गातून बऱ्याच शक्ती मिळतात, मात्र आपण त्या शक्तींचा वापर यथायोग्य करणे अतिशय महत्वाचे आहे. आपण आजही या शक्तीचा गैरवापर करतो आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तीचादेखील वापर योग्य रित्याच केला पाहिजे. माणूस स्वतःला सुखवस्तू करण्यासाठी डोंगर फोडतो आहे, झाडे तोडतो आहे, त्याला चमचमीत खाण्याची सोय व्हावी म्हणून तो प्राणिमात्र देखील खातो आहे. म्हणूनच कुठे त्सुनामी येते, कुठे चक्रीवादळ, कुठे वेळी अवेळी पाऊस पडतो आहे तर कुठे स्वाइन फ्लू, डेंगू, बर्ड फ्लू, मलेरिया, आणि नुकत्याच नवीन येऊ घातलेल्या कोरोना ला पण आपण सामोरे जातोय. लक्षात ठेवा आत्ताच सावध राहा नाहीतर नरसिंह कधीही येईल....
आज नरसिंह जयंती निमित्त खास थोडक्यात ....

नारायणाच्या 'नरसिंहरूपी'..अवताराबद्दल अप्रतिमच लिहिलेस आलोक.. हिरण्यकश्यपू हा निव्वळ वरदान मागणारा स्वार्थी...तर त्या मुलगा प्रल्हाद हा चराचरा बद्दल प्रेम असणारा...दैवी अंश...
ReplyDeleteया दोन्हींचीही माहिती देऊन तू त्यातून वास्तवाचे भान दिलेस..अजुनही हिरण्यकश्यपू या ना त्या रूपात इथे नांदतो आहे..सर्व भल्या लोकांना त्रास देतोच आहे...सृष्टीची हानी करतोच आहे... आणि प्रल्हादासारखे ही आहेत..जे हे सर्व वाचवायचा प्रयत्न करत आहेत... आणि खरच एकदिवस त्या़च्यामुळे नारायणरूपी नरसिंहाला यावे लागेल...!
खरंच खूप छान लेख...
सुंदर अभिप्राय दिला आहेस मावशी
Delete