आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
प्रा. अलोक पवार
हिंदू धर्मातील सणांच्या परंपरेतील एक मोठा सण म्हणजे आषाढी एकादशी. प्रत्येक मराठी महिन्यात तशा दोन एकादशी येतात पण आषाढात येणारी ही एकादशी मराठी मातीच्या, मराठी लोकांच्या हृदयातून फुलणारा सण म्हणायला काही हरकत नाही. आषाढी कार्तिकी अशा या दोन्ही एकादशींचे महत्व भरपूर आहे. विठ्ठलाच्या आरतीमधील ओळी पण या दोन्ही एकादशींचे महत्व सांगतात. "आषाढी - कार्तिकी भक्त जन येती ..." या एकादशीला देवशयनी एकादशी पण म्हणतात.
पंढरपूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची देवभूमी. आणि पंढरपूरचा विठोबा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे अवघा महाराष्ट्र, त्यामधील जे वारकरी संप्रदायातील भक्त आहेत, ते सर्व जण पंढरपुरात येतात. महाराष्ट्रातील एवढा मोठा जनसमुदाय त्या विठ्ठलाला भेटायला आतुरलेला असतो. त्यामुळे एक आत्मीयता, एक नाविण्य, एक शिस्त, एक भक्तीभाव पंढरपुरात एकवटलेला दिसून येतो. मागील वर्षापासून ही वारी जरी बंद असली तरी महाराष्ट्राच्या मनातील विठू माउलीची भक्ती यदकिंचितही कमी झालेली नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून संतपरंपरा असलेले सर्व भाविक आपल्या गावापासून पंढरपूरची वाट धरतात. आळंदीमधून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका, देहू वरून तुकाराम महाराजांच्या पादुका मोठ्या रथामध्ये अत्यंत भक्तिभावाने पंढरपूरच्या वाटेकडे मार्गस्थ होतात. संत ज्ञानेश्वर, संत, तुकाराम, संत जनाबाई, संत एकनाथ अशा सर्व संताना वारकरी पंथामध्ये मोलाचे स्थान आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाची प्रथा सुरु केली आणि चालू ठेवली म्हणायला काही हरकत नाही. आठशे वर्षांची ही परंपरा तितक्यात भक्तिभावाने, उत्साहाने सुरु असलेली दिसून येते. या वारीमध्ये सर्व जण विठ्ठलाशी एकरूप झालेले असतात. कोणी श्रीमंत - कोणी गरीब, कोणी लहान मोठा असा भेदभाव या वारीत अजिबात दिसून येत नाही. सगळेच एकसारखे वाटेतून जाताना सर्वांचे उठणे बसणे एक साथ.
महाराष्ट्रातला शेतकरी ऊस, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, डाळी एकदंरीत सर्वच भाज्या पिकवतो. पाऊस येण्याआधी नांगरणी आणि मग पेरणी केली की शेतकरी आपले पीक मोठे होण्याची वाट पाहतो. त्यासाठी रोजच्या रोज पाऊस पडला पुरेसा पाऊस आला तर की बागायती आणि जिरायती शेती करणारा शेतकरी एकदम खुश होतो. याच हंगामात हा शेतकरी पाऊस पडेल का? पीक मोठे होईल का? शेताची रखवाली कोण करणार? या सर्व चिंता विठ्ठलाच्या खांद्यावर टाकून त्याच्या भेटीला तर जायचे असते. आषाढा नंतर श्रावणसरी सोडणारा विठ्ठल आहे ना त्यामुळे संपूर्ण ग्रामीण वारकरी महाराष्ट्र जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष करीत पायी पंढरपूरच्या वाटेवर असतो.
विठ्ठलाचे नाव विठोबा - विठ्ठल याची कथा माहितीच आहे. नारायण हा आपला भक्त पुंडलिक याच्या भेटीला आल्यावर पुंडलिक नारायणाकडे वीट सरकवतो आणि म्हणतो नारायणा थांब रे मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय तो पर्यंत थांब आणि पुंडलिक ती सेवा करण्यात इतका गुंग होतो की विटे वरचा तो विठोबा अठ्ठावीस युगे उभाच आहे. तो बघतोय ही सेवा. त्याचे लक्ष आहे अवघ्या महाराष्ट्रावर, सकल जनावर की कोण आपल्या आईवडिलांची सेवा करते आहे, कोण काळ्या मातीची सेवा करतोय, कोण भक्ती भावाने पुढे जातोय. म्हणूनच पुंडलिक भक्त असला तरीहि देवाच्या आधी त्याचे नावच आपण पाहिले घेतो, आणि म्हणतो, 'बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'
देवपेक्षाही माझे आई वडील त्यांची सेवा महत्वाची आहे, हे सार्थ करण्यासाठी नारायणाला अठ्ठावीस युगे विटेवर उभा करणारा भक्त किती श्रेष्ठ असावा, आणि विठ्ठल देखील इतके वर्ष थांबलाय म्हणजे त्याची भक्ती ही मानली पाहिजे.
वारकरी भाविक ज्या मार्गी पंढरपूरला जातात वाटेत त्यांची सेवा साधण्यासाठी कित्येक लोक अगदी तत्पर असतात. वारकऱ्यांना खाऊ पिऊ घालणे, त्यांची सेवा करणे त्यांना काय हवे काय नको विचारणे, अगदी विठ्ठलच यांची सेवा मार्गी लावत असतो असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या वारी मार्गावर कोणतीच भय चिंता त्यांच्या अंगी लागेल.
भाविक विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाला भेटतात, चंद्रभागेत स्थान करतात, आणि पुन्हां परतीच्या वाटेवर जातात. महिला पण या वारीमध्ये सहभागी होतात. डोक्यावर तुळस घेऊन त्याही अखंड पुरुषांसोबत चालत असतात. शक्यतो झुणका भाकरी हे या वारीचे रोजचे खाणे असते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी बरेच स्वयंसेवक धावून जातात. वारकऱ्यांना मदतीचा हात देतात. स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, हरित वारी निर्मल वारी चा जयघोष देतात.

Comments
Post a Comment