कृष्ण जन्मोत्सव : आणि पडद्यामागच एक मोठे हत्याकांड

कृष्ण जन्मोत्सव : आणि पडद्यामागच एक मोठे हत्याकांड

अलोक पवार

प्रचंड पूर आला होता, आता पूर आला होता की आणला गेला होता म्हणजे ईश्वरी लीला वगैरे तो भाग विचार करण्या सारखा आहे. एखाद्या गोष्टी सोबत एखादी गोष्ट मोफत भेटली तर माणूस खूप खुश राहतो तसेच कदाचित एक आई- वडिलांसोबत अजून एक आई वडिलांचे प्रेम पाहिजे यासाठी हा सर्व थाट होता. कैद्यखान्याचे दरवाजे थेट उघडतात. आणि सुरू होते तात्पुरत्या सख्या आई वडिलांच्या सोबतची ताटातूट. आपले बालपण एका राक्षसी प्रवृत्ती पासून वाचविण्यासाठी ही एक शक्कल म्हणायला काही हरकत नव्हती.

सहा मुल मारले गेले होते आत्तापर्यंत. बघा यामध्ये खूप गहन अर्थ दडलेला आहे. कंसाला आपल्या बहिणीविषयी देवकीविषयी विशेष प्रेम होते. पण तिच्या लग्नाच्या रथात तिला बसवताना आकाशवाणी होते की त्याच बहिणीचा आठवा पुत्र तुझा काळ बनणार आहे तेंव्हा ते भगिनीप्रेम क्षणार्धात संपते. आणि सुरु होतात मुलांना मारण्याची कार्यक्रमाची सुरवात. कंस बहिणीला तेंव्हाच मारणार असतो पण वासुदेव स्पष्ट म्हणतात मी हिचे सर्व पुत्र तुला आणून देईल. जेंव्हा पहिला मुलगा झाल्यावर वासुदेव त्याला घेऊन कंसाकडे येतो तेंव्हा त्याला कळते की जर आठवा पुत्र माझ्याकडे नाही आला तर... आणि म्हणून वासुदेव व देवकी दोघांची रवानगी कैदखान्यात होते. खर तर आकाशवाणी स्पष्ट होती, की जे काही करणार ते आठवा मुलगा करणार तर आधीच्या मुलांना कंसाने का मारावे? मला अजून बरेच प्रश्न पडतात, की कृष्ण जन्मल्यावर जसा कारागृहाचा दरवाजा उघडतो आणि वासुदेवजी आपल्या मुलाला वाचविण्यासाठी यमुना ओलांडून गोकुळात पोहोचतात तसे आधीच्या मुलांना वाचविण्यास दरवाजा का उघडला गेला नाही? तेंव्हा ती मूल का गोकुळात पोहचली नाहीत? का त्या निरापराध मुलांची हत्या झाली. का त्यांना जन्मल्यावर त्वरित मृत्यूला सामोरे जावे लागले. ती आकाशवाणी झाली नसती तर कंस याने देवकी आणि वासुदेव यांना कारागृहात ठेवले असते का? बर मला या कंसाचे कळेना हा इतका चांगला का वागला त्याने बहिणीला आणि तिच्या पतीला म्हणजे देवकी वासुदेवाला का नाही मारलं? म्हणजे सहा मुलांना मारणाऱ्या आणि आठव्या मुलाला मारायला टपलेल्या कंसाला देवकी - वासुदेवाला किंवा दोघांपैकी का एकाला मारावेसे नाही वाटले. म्हणजे त्याच्या डोक्यात असे का नाही आले 'न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी'.. काय कंसा.... तुला एवढं नाही सुचलं का? म्हणजे एक बदनाम मामा आहेसच तु मग भाच्याला मारण्याच्या ऐवजी बहिणीलाच का नाही मारले. बर बहिणी च्या विषयी प्रेम होते तर भावजींना मारायचे. का तुला बहीण विधवा होईल याचे टेन्शन होते?  कंसाला अक्कल नव्हती का म्हणायची. बर त्याने देवकी आणि वासुदेवाला एकाच कारागृहात ठेवले. वेडाच आहे.



मला गोष्टीच्या पुढच्या भागाविषयी वाचून तर डोकेच फिरते. वासुदेव कृष्णाला टोपलीत घेऊन निघतात. कारागृहाचा दरवाजा आपोआप उघडतो. बघा नेमके कृष्णजन्म झाल्यावर बरोबर सगळे सैनिक त्यांना झोप लागते, काय सैनिक कारागृहाबाहेर नेमलेत नेमके जेंव्हा ज्या कामाचे पैसे भेटलेत ते काम करायची वेळ झाल्यावर यांना झोप लागते. बर एकाला नाही सर्वांना झोप लागते. वासुदेव बाहेर पडतात. यमुना नदीला पूर आलेला असतो, पाऊस जोरदार पडत असतो, नुकताच जन्म घेतलेला कृष्ण टोपलीत असतो, भिजत असतो. तो भिजू नये म्हणून नदीतून शेशनाग प्रकट होतात आणि अगदी छत्री सारखे कृष्णाच्या वर थांबतात. इथे तर मला थोडे गडबडल्यासारखे होते. यासाठी मी गोष्टीच्या पुन्हा मागे जातो. कंसाने आत्तापर्यंत वासुदेव - देवकीच्या सहा पुत्रांना मारले असते. मग सातवे काय? गोष्टीनुसार सातवा पुत्र म्हणजे शेशनाग. त्याने आठव्या बाळाला वाचवावे म्हणून देवकीच्या उदरात प्रवेश केला होता. पण शेषांनगाची भक्ती पाहून श्री विष्णू तो अर्भक वासुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भात बदली करतात. ही झाली त्या काळाची सरोगसीची प्रक्रिया. मला तर वाटते की पहिली सरोगसी प्रक्रिया हिच मानावी. बलराम कृष्णाचा मोठा भाऊ जन्म घेतो. कंसाला कानोकन खबर लागत नाही. बलरामजी रोहिणीकडे लहानाचा मोठा होतो. प्रश्न असा आहे की शेशनाग यांनी बलराम रूपात जन्म घेतला आहे तर तो पुन्हा कृष्णाच्या वर त्याला भिजू नये म्हणून कसा आला?

वासुदेव संपूर्ण नदीत बुडालेल्या अवस्थेत असतात. बाळकृष्णाचा पायाचा अंगठा यमुनेला स्पर्श झाल्यावर एकदम यमुनेच पाणी ओसरत आणि वासुदेवाला वाट तयार होते. वासुदेवाची वाट असते गोकुळातल्या आपल्या मित्राकडे म्हणजे नंदाकडे.

कृष्ण जन्मलाय गोष्ट संपत नाही गोष्टीला एक नवीन पैलू येतो तो म्हणजे गोकुळात नंद आणि यशोदा या दांपत्याच्या घरी कन्यारत्न झालेले असते. वासुदेव तिथे येतो आणि कृष्णाला तिथे त्यांना देऊन त्यांची मुलगी स्वतःकडे घेतो. बघा इथे काय घडते ते. का नंद आणि यशोदा त्यांची स्वतःची मुलगी वासुदेवाला देतात. त्यांनाही मुलगी नको असते. त्यांना पण मुलगी नकोशी होते का? त्यांना माहित असेलच ना की आपण वासुदेवाला मुलगी देतोय म्हणजे कंस तिचापण खून करेल. मग यशोदा आणि नंदाला आपली मुलगी मारण्यासाठी का द्यावीशी वाटली? 

तसेच झाले वासुदेव त्या मुलीला त्याच रात्री पुन्हा कारागृहात घेऊन आले. दुसऱ्या दिवशी कंसाला कळले की देवकी आणि वासुदेवाला मुलगी झाली. तो तिलाही मारायला जाणार तितक्यात त्या मुलीची देवी होते आणि पुन्हा आकाशवाणी, तुला मारणारा काळ जन्माला आला आहे.  आपल्याकडे म्हण आहे की आकाशवाणी एकदाच होते बघा इकडं दोनदा होण्याची काय गरज होती?

बघा म्हणजे वासुदेवाने रात्रभर एवढे कष्ट घेतले, हळूच कारागृहातील सैनिक जागे असतील झोपले असतील, पाऊस, यमुनेचा पूर, बाळांची आदला बदली या सगळ्या गोष्टी केल्या. आणि या आकाशवाण्या. म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. आधीच पहिल्या आकाशवाणीने बहिणीच्या विरोधात भावाला घालवले. आणि आता दुसऱ्या आकाशवाणीने त्याला अजून सतर्क केले. त्याच्यात अजून राक्षसी भावना निर्माण केल्या. या कंसाने पुन्हा गावातील सर्व मुलांना मारायला सुरवात केली.

कृष्णा तुझा जन्म बघ कसा झालाय. सात मुलांची हत्या करून झालाय. फक्त सातच नाही गावातील कितीतरी बालके मारली गेली. यशोदेपासून तु मोठा झाल्यावर पुन्हा देवकीकडे येतोस तर यशोदेकडे तिची मुलगी असती रे पण तुला तारायचं होत म्हणून यशोदेने तिची मुलगीच दिली. एकूण काय रे मुलींच्या जन्माची कहाणी. तेंव्हा देखील मुलींच्या जन्माचे स्वागत नव्हते आजही त्यांच्या जन्माला नकोसे म्हणले जाते आहे. तुझ्या जन्माच्या वेळी नशीब सोनोग्राफी सारख्या सोई नव्हत्या, नाहीतर तुझ्यासोबत तुला खेळायला गोपिका भेटल्याचं नसत्या. 

तुझा जन्मोत्सव तर आम्ही करू, पाळणा म्हणू. तुझ्या जन्माच्या दिवशी काल्याचा प्रसाद देखील करू. पण त्या नकोशा मुली गेल्या आजच्याच दिवशी ना. तुझ्या सोहळ्यातला हा गोड प्रसाद त्या मुलीच्या हत्येची आठवण झाल्यावर गोड लागेल का रे कृष्णा. तुला बऱ्यापैकी सर्वजणी बहिणी मानतात. पण आकाशवाणीने तु तुझ्या सख्या भावांचा काळ ठरला की रे देवा. 

घेऊ शकतोस का रे कृष्णा कालचक्र मागे. रोखू शकतो का आकाशवाणी. वाचवू शकतोस का भाऊ बहिणींना.. का म्हणणार आहेस होनी को कोन टाल सकेगा... प्रभुची लीला.. 

जाऊ दे तुझ्या जन्माच्या आधी एवढे मोठे हत्याकांड झाले ते सर्व विसरून तुझा पाळणा म्हणणे महत्वाचा आहे. कृष्ण जन्मला रे घरी कृष्ण जन्मला...

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त