पर्युषण पर्व

पर्युषण पर्व

अलोक अर्जुन अलका पवार

जैन धर्मातील एक महत्वाचा कालावधी म्हणजे पर्युषण पर्व. हिंदू धर्मातील गणेशोत्सवासोबत चालू झालेला काळ म्हणजे पर्युषण पर्व. जैन धर्म 'अहिंसा परमो धर्म' या धर्तीवर उदयास आला आहे. याचीच शिकवण प्रत्येक जैन बांधवांमध्ये रुजू व्हावी म्हणून बरेच जैन साधू आणि साध्वी संपूर्ण वर्षभर प्रयत्न करतात. पावसाळा सोडला तर ते अगदी एका ठिकाणाहून दुसरीकडे अनवाणी चालत जातात. पावसाळ्यात नवीन जीवांची निर्मिती होत असते. त्यामुळे आपल्या पायाखाली चुकूनही कोणत्या जीवाला हानी पोहोचू नये या यामागचा पवित्र उद्देश. जैन साधू आणि साध्वी धर्मातील शिकवण आणि समाज प्रबोधन अगदी उत्तम रित्या पार पाडतात. चातुर्मास म्हणजेच पावसाळ्यातील चार महीने. मग त्या दिवसांत एकाच जागी बसून देखील कर्तव्य पालन करता येतील म्हणून एक जागी मुक्काम करून धर्माची साधना करण्याचे पावसाळ्यातील हे चातुर्मासाचे हे दिवस. या दिवसांतील एक पर्वणी म्हणजे पर्युषण पर्व. 

वर्षभरातील आपल्या कामाच्या व्यापाने आपल्याला जर धर्माचे अनुपालन करता आले नसेल तर सामान्य जैन नागरिक या पर्युषण पर्वात ही सर्व जबाबदारी पार पाडू शकतो. मग या काळात आहार, पूजा पाठ, धर्मपालन या गोष्टींची विशेष काळजी जैन साधकांकडून घेतली जाते.



यामध्ये महत्त्वाचे म्हणजे फक्त दिवसाचा आहार घेऊन रात्रीचा आहार वर्ज करणे, बम्हचर्येचे पालन, पूजा पाठ, महान साधुसंतांचे प्रवचन,विचार श्रवण आणि आत्मसात करणे, संस्कार जोपासणे या सर्व गोष्टी केल्या जातात. 

जैन लोकांमध्ये श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन पंथ आहेत. श्वेतांबर यामध्ये पुन्हा तीन उपपंथ आहेत. तेरपंथी मूर्ती पूजक जे पाण्याने मूर्तीला अभिषेक करतात, डेरावासी हे देखील मूर्ती पूजक आहेत मात्र ते पाण्याच्या ऐवजी पंचामृताने अभिषेक करतात,  आणि तिसरा स्थानक पंथ ज्यात मूर्ती पूजा नाही. दिंगंबर जैन पंथांमध्ये नग्न साधू यांना श्रद्धास्थानी ठेवले आहे. या पंथ उपपंथा नुसार पर्युषण पर्वा चा कालावधी ठरतो. सुरवातीला स्थानकवासींचे आठ दिवसीय, त्यांनंतर तेरापंथी यांचे तर दिगंबर पंथी यांचे गणेश उत्सवासोबत हे पर्व चालते.

शरीरातील मनाला चांगल्या गुणांसोबत बांधणी करणे म्हणजे या पर्युषण पर्वाची खरी ओळख. जैन धर्मात एकूण दहा गुण सांगितले आहेत त्यांना आत्मसात केले तर आयुष्य सुकर होते.

(१) क्षमा धर्म : व्यक्ती मोठा होत असताना त्याच्याकडून सर्व गोष्टी योग्य रित्या होतच असतील असे नाही. तो या सर्व गोष्टी नव्याने शिकत असतो. त्यामध्ये त्याच्याकडून काही चुका या जाणूनबुजुुन होतच असतील असे नाही. त्यान नुकसान देखील होत असते. मात्र जर चूक करणाऱ्या व्यक्तीला त्या चुकांबद्दल प्रायश्चित करू वाटत असेल त्याच्या मनात त्या चुकीने समोरच्याच्या भावना दुखावल्याचे बोध होत असतील तर त्याला क्षमा करणे हे देखील आद्य कर्तव्यच आहे. आपले नुकसान झाले आहे या गोष्टीने समोरच्याला भरपूर मनस्ताप किंवा क्रोधाची भावना देखील येऊ शकते. त्यामुळे त्या क्रोधावर जर व्यक्तीने नियंत्रण ठेवले तर नक्कीच चूक करणारा व्यक्ती हा देखील सदर व्यक्तीबद्दल आपली भावना दृढ बनवून पुन्हा चूक होणार नाही याकडे लक्ष देत राहतो. 

(२) मार्दव धर्म : व्यक्तीकडे एखाद्या गोष्टीबद्दल अहंकार तयार झाला की तो त्या गोष्टीबद्दल नेहमी मनात हेवा तयार करतो. ही गोष्ट फक्त माझ्याकडे आहे दुसऱ्याकडे ही गोष्ट कधीच नसावी या गोष्टीचा जो अहंकार मनात येतो तो कुठे तरी माणसाच्या अधोगतीला देखील कारणीभूत ठरत असतो. म्हणीनुसार म्हणतात न 'गर्वाचे घर खाली', त्यामुळे गर्वापेक्षा आपल्या अंगात जरी आपल्याकडे शक्ती असली कोणत्याही गोष्टीची अधिकची ताकद असली तरीही माणसाच्या अंगात मार्दता म्हणजेच मृदुता असणे अति आवश्यक आहे.   

(३) आर्जव धर्म : आपल्या मनात जे योग्य वाटते आणि जे कोणत्याही पद्धतीने अयोग्य नाही अशा पद्धतीने आपले आयुष्य जगणे म्हणजेच आर्जव धर्माचे पालन करणे. एक सरळ वचनी आयुष्य जोपासणे. 'मनी असे ते स्वप्नी दिसे', म्हणजेच जर मनात योग्य भाव असेल तर तो आयुष्याच्या प्रत्येक पावलाला योग्य दिशा देतो. त्यामुळे एखादी अयोग्य कृती करण्यास आपले मन तयार होत नसेल तर आपले मन काय सांगते ते जी योग्य दिशा देत आहे त्या मार्गावर चालणे म्हणजेच आर्जव धर्माची कृती प्रत्यक्षात आणणे. 

(४) उत्तम शौच धर्म : व्यक्तीच्या शरीर आणि मनाला प्रत्येक धर्मानुसार वेगळी व्याख्या मिळाली आहे. जैन धर्मातही शरीर आणि मनाचे एकमेकांना साजेसे राहणे म्हणजे व्यक्ती घडला म्हणू शकतो. व्यक्ती नेहमी स्वत:ला योग्य ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्वत: इतरांसमोर योग्य दिसेल याची तो नेहमी खातरजमा करतो. यासाठी तो आरसा देखील वापरतो. आरशात बघून तो आपले कपडे आपला चेहरा नीटनेटका राहील याची काळजी घेत असतो. या कृतीने तो शरीर, पेहराव जगाला सुंदर दाखविण्याचा प्रयत्न करतो. मात्र या दिसण्याबरोबर त्या व्यक्तीचे आंतरिक व्यक्तिमत्व देखील योग्य असले पाहिजे. त्याचे मन देखील तितकेच सुंदर आणि प्रभावी असले पाहिजे. मन योग्य विचार करणारे असेल तरच या बाह्य सुंदरतेला कोठेतरी जीवनात अर्थ राहतो. त्यामुळे मनाची स्वच्छता झाली की आपोआप शरीरशुद्धी होते. 

(५) सत्य धर्म : सत्याचा रस्ता हा नेहमी योग्य दिशादर्शक असतो. या वाटेवर चालणारा प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यात सफल होत असतो. प्रत्येक धर्म सत्याची बाजू धरून सत्यवचन सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रपिता महात्मा  गांधीजीनी देखील आपल्या आयुष्यात सत्य किती योग्य रीतीने मांडले की आयुष्य सुकर होते हे पटवून दिले आहे. असत्याला मोठ्याने ओरडून सांगावे लागते आणि पटवावे लागते की असत्य सत्य आहे. मात्र सत्य शांतीने योग्य रित्या न बोलता आपला आवाज चहू दिशांनी सांगू शकते. म्हणतात ना सत्य कटू असले तरी ते स्वीकारा, कारण ती कटुता आपल्याला निदान असत्या कडे तर नेत नाही .     

(६) उत्तम संयम धर्म : आयुष्यात संयम राखणे अतिशय गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी एक वाक्य ऐकलेले दिसते मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. हा जो ब्रेक आहे ना तोच संयम. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी संयम बाळगणे गरजेचे आहे. एखादी गोष्ट जर प्राप्त होत असेल तर ती संयमाने प्राप्त झाली तरच योग्य असत. आपण काही शिकत असू तर थेट पदवी परीक्षा देता येत नाही. तिथे देखील प्रत्येक वर्ष संयमाने परीक्षा मार्गाचा अवलंब करून आपण पुढे जातो. नोकरी करताना ती देखील संयमाच्या आधारे आपल्याला पुढे नेत असते. थेट खालच्या पदावरून वरच्या पदावर बढती मिळत नाही. आपल्या बोलण्यावर देखील संयम असणे अतिशय आवश्यक आहे. समोरच्याचा भावना जपणे हे आपल्याला आपल्या बोलण्याच्या संयामावरून योग्य प्रकारे करता येते. एकंदरीतच आपल्याकडून घडणाऱ्या घटनांवर आपला संयम असणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत कोठे थांबायचे आहे हे देखील कळणे अत्यावश्यक आहे. आपल्या आयुष्यात आपल्यासमोर विविध आकर्षक गोष्टी येत असतात त्याचा मोह होणे आणि त्याकडे आपल्याला त्या वस्तू प्राप्त करण्याची इच्छा असणे, हि देखील संयमाची परीक्षा असते. त्यामुळे योग्य ठिकाणी थांबणे म्हणजेच उत्तम संयम धर्माचे पालन करणे.     


(७) उत्तम तप धर्म : तप म्हणजेच साधना. आपण काही गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी काही वर्ज करतो आपला मोह आवरतो, पाहिजे त्या गोष्टीसाठी मनाकडे लढतो ती साधना. हा तप म्हणजे फक्त उपवास करून प्राप्ती करणे इतकेच नव्हे तर आपल्या मनावरचा ताबा आपल्या इंद्रीयांवरील ताबा. आपल्या इच्छा, व आकांशा यांची प्राप्ती करण्यासाठी योग्य साधना हाच उत्तम पर्याय राहतो. पर्युषण पर्व हा एक असा कालावधी आहे जो सामन्य व्यक्तींसाठी देखील काही साधना करण्यासाठी कालावधी प्रदान करतो. 

    

(८) त्याग धर्म : त्याग करणे म्हणजे आपल्याकडे काही गोष्टी आहेत किंवा आपल्याकडे येणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा सोडणे. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर या सर्व गोष्टींचा त्याग करणे ही देखील कला आपल्याला आली पाहिजे. दुसऱ्याचा किंवा उपेक्षितांचा विचार करणे आणि त्याग भावना मनात आणणे म्हणजे त्याग. गौतम बुद्धांनी आपल्याला मिळालेला राज थाट याचा त्याग केला होता. रामाने भावासाठी आणि सावत्र आईच्या इच्छेसाठी राजभवनाचा त्याग करून वनवास स्वीकारला होता. त्यागाची अशी अनेक उदाहरणे देता येतील.   

(९) आकिंचन्य धर्म: आकिंचन्य धर्म आपल्याला मोहावर ताबा मिळविण्यास भाग पाडतो. बाहेरून चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी जे प्राप्त करावे लागते. ज्ञानाची प्राप्ती करणे हेच जीवनाचे धेर्य आहे. एखाद्या गोष्टीवरील मालकी हक्काची प्राप्ती झाली तर त्या मालकी हक्कासोबत आलेली त्या गोष्टीबद्दलची चिंता देखील व्यक्तीच्या दु:खाचे कारण बनू शकते. त्यामुळे स्वामित्वाची भावना जर कमी केली तर आपल्याकडे आपले मन आणि त्यावरील नियंत्रण हेच आपल्या हातात आहे असे समजायला काही हरकत नाही.  

(१०) ब्रम्हचर्य धर्म : ब्रम्हचर्य पालन करणे म्हणजे निष्ठेचे प्रतिक आहे. बऱ्याच व्यक्तींच्या मनात कामवासना जागृत होते. त्या गोष्टीवर नियंत्रण प्राप्ती म्हणजे उत्तम ब्रम्ह्चर्याचे पालन करणे. कुटुंब योजना टिकून राहण्यासाठी विवाह हा एक संस्कार आहे मात्र हा संस्कार होण्याआधी मनात कामभावना निर्माण होणे. किंवा स्वतःचा पती किंवा पत्नी असताना परस्त्री  तसेच परपुरुषांकडे आकर्षित होणे, कामभावना उत्तेजित करणे हे चुकीचे आहे. विवाहासाठी स्त्री आणि पुरुषांची योग्य वये ठरलेली आहेत. स्त्रीसाठी लग्नाचे वय १९ तर पुरुषांचे वय २१ असल्याशिवाय त्यांचे विवाह होणे हे चुकीचे आहे. एखाद्या स्त्रीची गर्भधारणा झाली असल्यास तिने आणि तिच्या पतीने ब्रम्हचर्य धर्माचे पालन करणे म्हणजे पोटात वाढणाऱ्या बाळाची सुरक्षितता जपणे.          



Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त