हिमालय कन्या : शैलपुत्री

 हिमालय कन्या : शैलपुत्री

पवार अलोक अर्जुन अलका

सती, भगवान शंकराची अर्धांगिनी. सतीने महादेवावर यथेच्छ प्रेम केले, हे प्रेम करताना तिने तो व्यक्ती कसा आहे, तो कसा राहतो, कोणासोबत राहतो या सगळ्या गोष्टी अजिबात लक्षात घेतल्या नव्हत्या. मात्र तिच्या वडिलांना प्रजापती दक्षाला शंकर अजिबातच मान्य नव्हता. आपली राजकन्या कुठे श्रीमंतीच्या थाटात वाढलेली, आणि कुठे हा विरक्ती पुरुष जो स्मशानात राहतो. गरीब-श्रीमंती सोबत येथे उच्च आणि कनिष्ठ या सर्वच गोष्टी पुढे आल्या होत्या. मात्र लग्न करेल तर महादेवासोबतच म्हणून तप करून घरातून निघून जाऊन सतीने शंकराची प्राप्ती केलीच.

पुढे दक्षाने एक यज्ञाचे आयोजन केले. तिन्ही लोकांतून बऱ्याच मंडळींना आमंत्रण होते फक्त महादेवाच्या परिवाराला आमंत्रण दिले गेले नाही. सतीला ही गोष्ट समजल्यावर तिने महादेवांसोबत तिथे यज्ञाला येण्याबाबत बोलले. मात्र आमंत्रण नाही तर तिथे कसे जावे हा प्रश्न महादेवाने समोर केला. एकाच घरातले असल्यामुळे आपल्याला आमंत्रण नसावे असे ती म्हणाली मात्र महादेव आपल्या विचारांवर ठाम होते. त्यांनी सतीला जाण्यास अडवले नाही, मात्र स्वतः तिकडे गेले नाहीत. 

सती यज्ञस्थळी पोहोचल्यावर तिला बराच लवाजमा दिसला. सर्व जणांचे आदरातिथ्य व्यवस्थित होत होते मात्र सती आली तरीही तिच्या कडे कोणी बघत नव्हते. आई वडील भावंडे यांनी सती आल्याचे लक्षातच घेतले नाही. तिला महादेवांचे शब्द आठवले. हा माझ्या पतीचा अपमान आहे हे तिला जाणवले. सतीला हा अपमान सहन नाही झाला व तिने त्याच यज्ञाच्या आहुतीमध्ये स्वतःला झोकावून दिले. सतीने स्वतःचे आत्मबलिदान केल्यावर पुढे तिने हिमालयाच्या घरी जन्म घेतला. हिमालय या पर्वत राजाच्या घरी जन्म घेतल्याने पर्वताची म्हणजेच दगडाची म्हणजेच शैलाची पुत्री म्हणजे शैलपुत्री. 

शैलपुत्रीचा पुनर्जन्म शक्य झाला. या काळात पुनर्जन्म वैगरे काही शक्य नाही. मात्र प्रेमविवाहात जावई नक्की कोणत्या कुळातील आहे, त्याची ऐपत कशी आहे, तो आपल्या मुलीच्या सर्व बाबींसाठी साजेसा आहे का, या गोष्टी आजही पुढे येतात. सैराट सारखे चित्रपट आज येतात. ज्यामध्ये ज्या प्रमाणे सतीचा अंत झाला त्याच प्रमाणे एक पूर्ण कुटुंब संपलेले दाखवले गेले आहे. ही चित्रित कथा असली तरीही बऱ्याच ठिकाणी ही चित्रित कथा सत्यात असलेली दिसून येते. 

शैलपुत्री याच सर्व स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते.

शैलपुत्रीने म्हणजेच पार्वतीने या जन्मातही शंकराशी लग्न केले. व ती शंकराची अर्धांगिनी झाली. शंकराच्या वाहनावरच म्हणजे नंदिवरच ती संपूर्ण हिमालय पर्वत फिरताना दिसते. 

शैलपुत्रीच उदाहरण घेता आता तरी हा भेदभाव कुठेतरी दूर झाला पाहिजे निदान नाते जोडले गेल्यावर हे लक्षात घेतले पाहिजे नाहीतर अंत हा निश्चित आहे. नात्यांचा अंत हा देखील दुःख देणारा असतो.

नवरात्रीच्या या पहिल्या देवी रूपाचा आदर करूयात. शैलपुत्रीने मांडलेल्या नात्याचा आदर करूयात.

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त