गुरूनानक जयंती
गुरुनानक जयंती
अलोक पवार
कार्तिक पौर्णिमेला गुरूनानक जयंती साजरी केली जाते. गुरुनानक यांची शिकवण इतकी तेजोमयी, प्रकाशमयी होती म्हणून त्यांच्या जन्मदिवसाला प्रकाशपर्व असे देखील म्हणतात.
शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांचा जन्म रावी नदीच्या किनारी तलवंडी या गावी १४६९ मध्ये झाला. हे गाव सध्याच्या पाकिस्थान मधील पंजाब भागात आहे. वडील काळूचंद खत्री तर आई तृप्ता देवी यांच्या पोटी नानक नावाच्या बालकाने जन्म घेतला.
लहानपणापासून नानक यांची तल्लख बुद्दी होती मात्र देवाच्या शोधविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देताना गुरुनानक यांचे गुरू हतबल झाले आणि नानक यांची प्राथमिक पाठशाळा वयाच्या सातव्या आठव्या वर्षी सुटली. पुढील आयुष्य त्यांनी सत्संग, अध्यात्म यामध्ये व्यक्तीत केले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह सुलक्षणी देवी यांच्या सोबत झाला. पुढे त्यांना श्रीचंद आणि लखमी दास असे दोन पुत्र देखील झाले. आपल्या संपूर्ण परिवाराला सासरवाडीत ठेवून त्यांनी अध्यात्मिक जीवन प्रचारासाठी यात्रा केल्या. त्यांनी भारत अफगाणिस्तान, फारस आणि अरबी भागांत यात्रा केल्या, याला पंजाबीमध्ये उदासिया असे म्हणतात.
नानक हे मूर्तिपूजा विरोधी होते. त्यांनी परमेश्वराच्या विषयी १० मौल्यवान संदेश दिले होते.
१. आद्य परमेश्वर एकच आहे.
२. नेहमी एकाच परमेश्वराच्या पूजेत आपल्याला आपली भक्ती दाखवायची आहे.
३. जगातील प्रत्येक स्थानावर, प्रत्येक प्राणिमात्रात देव आहे.
४. देवाची निस्सीम श्रद्धा करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही भीती वाटण्याचे कारण नाही.
५. आपले पोट, इमानदारीने आणि मेहनतीने भरले पाहिजे.
६. कधीही मनात वाईट कार्य करण्याबद्दल विचार केला पाहिजे आणि कोणालाच त्रास द्यायचा नाही.
७. नेहमी आनंदी राहून ईश्वराची नेहमीच प्रार्थना केली पाहिजे.
८. मेहनत आणि इमानदारी यांच्या जोरावर पैसे प्राप्त करून त्यातून गरजवंतांना देखील मदत केली पाहिजे.
९. सर्वांना समान नजरेने बघितले पाहिजे, ज्यात स्त्री पुरुष देखील समानच आहेत.
१०. जेवण शरीरासाठी अत्यावश्यक आहे मात्र लोभाने त्याची साठवणूक करणे ही चुकीची गोष्ट आहे.
एकंदरीत नानक यांनी व्यक्तीला त्यांच्यातील दोष कमी करून योग्य जीवन जगण्यासाठी बरेच संदेश दिले आहेत.
फक्त शीख धर्मीयच नाही तर त्यांना मानणारे बरेच जण आज संपूर्ण जगात जेथे जेथे गुरुद्वारा आहेत तेथे एकत्र जमतात. साधारण तीन चार दिवस आधीच गुरुद्वारा परिसर संपन्न असा दिसतो. सर्वच जण यामध्ये गरीब - श्रीमंत, स्त्री - पुरुष, काळा - गोरा, लहान - थोर, असा कोणताही भेदभाव न करता आज सेवेसाठी एकत्र जमतात. गुरुद्वारा मध्ये शारीरिक आणि मानसिक स्वच्छता करून सर्व जण एकत्र भाज्या स्वच्छ करणे, कापणे, बनवणे, चपाती भात बनविणे या सर्व गोष्टी एकत्र पणे करतात. एकंदरीतच पोटभरून लंगर म्हणजेच सर्वांच्या मेहनतीने बनलेले हे शाही भोजन जेवून पुढे अगदी एकत्रित भांडी धुणे, साफसफाई करणे ही देखील कामे सर्व जण करतात. या लंगर भोजनामधील सेवा ही गुरुनानक यांनी 'माणसात देव बघण्याची शिकवण' त्यांचे अनुयायी म्हणजेच या दरबारात आलेली प्रत्येक व्यक्ती आचारणात आणताना दिसून येते. वाढताना प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून वाहेगुरु रोटी, वाहेगुरु सब्जी, वाहेगुरु खीर असे शब्द उच्चारण ऐकून मन अगदी वाहेगुरु समर्पित होत असते. गुरू दरबारातील एकमेकांच्या विषयीचे प्रेम बघून गुरू नानकांची शिकवण पावन होते.
Comments
Post a Comment