काळभैरव जयंतीनिमित्त
काळभैरव जयंतीनिमित्त
अलोक पवार
साधारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये काळभैरवाचे मंदिर असते. अगदी घरात म्हणले तरी हा काळभैरव प्रत्येक हिंदू माणसांच्या घरात देखील कुलदैवत म्हणून विराजमान दिसतो. कालभैरव बऱ्याचदा मंदिरांमध्ये रूढी परंपरा यांच्या मध्ये घट्ट होताना दिसतो. काही दिवसांपूर्वी स्त्रिया आणि मंदिरप्रवेश या विषयावर महाराष्ट्रात आणि केरळमध्ये पण बराच तांडव झाला, वाद झाला. या लढाई मध्ये कोण हरल कोण जिंकलं हे पाहण्यापेक्षा आपण सत्य शोधलं पाहिजे आणि त्याला अनुसरून आपले आचरण केले पाहिजे. सर्वात पहिले आपण या देवाच्या उत्पत्तीच्या काही गोष्टीं समजून घेऊ.
एकदा ब्रम्हा विष्णू आणि महेश म्हणजेच भोलानाथ शंकर यांच्यामध्ये वाद झाला, विषय होता तिघांमध्ये नक्की श्रेष्ठ कोण? देवांमध्ये असा वाद होणे म्हणजे थोडे आश्चर्यच नाही. तिघांचे स्थान तसे आपल्या जागेवर इतके मोठे होते की त्याची तुलना इतरांशी होऊ शकत नव्हते. एक निर्मिती करणारा होता, एक पालन करणारा होता तर एक मोक्ष देणारा होता. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की भगवान शंकराला प्रचंड राग आला आणि त्यांनी रुद्राक्षातून काळभैरवाची निर्मिती केली. एकंदरीतच रागाने निर्माण झालेला रुद्रावतार कालभैरव.
शंकराच्या कोपलेल्या प्रवृत्तीची ही रचना. ज्या मुखातून शिवाचा अपमान झाला कालभैरवाने शंकरच्याच त्रिशूळाने ब्रम्हदेवाचे ते पाचवे मुंडके धडपासून वेगळे केले. तेंव्हापासून ब्रम्हदेवाला फक्त चारच तोंडे. ही कृती घडण्यापूर्वी कालभैरव जितका क्रोधीत होता ब्रम्हाचे मुंडके उडवल्यावर तो तितकाच शांत आणि पश्चातापाच्या भरात त्रासलेला असा झाला. त्याच्या हातून काहीतरी वाईट घडले हे त्याला जाणवू लागले. त्याला ब्रम्हदेवाचा म्हणजेच सृष्टी रचणाऱ्या देवतेचा घात केला हे जाणवू लागले. पापाचे प्रायश्चित करण्यासाठी त्याने बरीच तीर्थक्षेत्र केली मात्र शेवटी ज्या ठिकाणी ब्रम्हदेवाचे ते पाचवे तोंड होते त्या ठिकाणी म्हणजे काशी येथे त्याला पापमुक्ती भेटली.
एक दुसरी आणखी कथा आहे, कितीही झाले तरीही सती लग्नानंतर प्रथम आपल्या माहेरी गेली होती. वडिलांनी अश्वमेघ यज्ञ ठेवला होता. जावई शंकर आणि मुलगी सती यांना दक्ष राजाने बोलावले नव्हते. शंकराने उगाच अपमान होईल म्हणून जाणे टाळले होते. तरीही सती यज्ञस्थळी पोहोचली. तिथे तिला सत्याची अनुभूती झाली. आपल्या पतीचा अपमान बघून त्याच तिने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. शंकराला हे कळताच तो सतीच्या ठिकाणी आला. संपूर्ण जगाला मोक्ष देणारा शिव कासावीस झाला. त्याने सतीचे प्रेत उचलून रडत फिरत होता. तो इतका सैरावैरा धावू लागला की सृष्टीचा ऱ्हास होत होता. सृष्टीच्या पालनहार म्हणजेच विष्णूने सतीच्या शरीराचे आपल्या सुदर्शन चक्राने एक्कावन्न तुकडे केले. हे सर्व तुकडे भारतभर सर्वत्र पसरले. या सर्व ठिकाणी देवीची शक्तिपीठे झाली. शिव भानावर आले. सध्या कालभैरव निर्मिती साठी आपल्याला इतकीच गोष्ट महत्वाची आहे. या सर्व शक्तीपीठांचे रक्षण करण्यासाठी शिवाने याच काळभैरवाची नियुक्ती सर्व शक्तीपीठांसाठी केली. म्हणजे एक्कावन्न ठिकाणी एकावन्न काळभैरव देवीच्या रक्षणासाठी.
आता थोडे आपण या कथा आणि सध्याची परिस्थिती यांच्याकडे पाहू. मी ज्या ज्या काळभैरवाच्या मंदिरांना पाहिले त्या सर्व मंदिरांच्या बाहेर पाहिले की 'स्त्रियांना प्रवेश निशीब्द.' मला खूपदा प्रश्न पडला या काळभैरवाचे आणि स्त्रियांचे नक्की काय वाकडे आहे. सतीच्या गोष्टीवरून तर त्याची नियुक्तीच एका स्त्री रक्षणासाठी झाली आहे. तर ब्रम्हदेवाच्या गोष्टी वरून हे दिसते की तो ज्या प्रमाणे क्रोधीत होऊ शकतो आहे त्याच प्रमाणे चुकी देखील सहज करू शकत नाही. मग हे लेबल्स त्याच्या मंदिराच्या बाहेर का? का ही मानवनिर्मिती आहे. बरेचदा स्त्रियांच्या मासिक पाळीची जोड या गोष्टीशी लावली जाते. आणि म्हणून स्त्रियांना प्रवेश निषिद्ध म्हणले जाते. आणि मग असे असेल तर आसाम मधील कामाख्या देवीच्या मंदिरात तर सतीच्या एक्कावन्न तुकडयांपैकी योनीचा भाग पडला होता. बरं तिथे स्थापन झालेल्या शक्तीपीठासाठी देखील कालभैरव आहेच. त्या ठिकाणी तर देवीचे तीन दिवस मासिक पाळी ही एखाद्या सणासारखी साजरी केली जाते. मग आपण कालभैरवाला असे स्त्री द्वेषी का बनवतो आहे. ही मानव निर्मित रचना असेल तर आपण या गोष्टी सोडल्या पाहिजेत. निदान शिवाच्या भीतीने या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण सतीचा पुढचा जन्म पार्वतीच्या अवतारात झाला. आणि हीच सती हीच पार्वती पुढे प्रत्येक स्त्रीच्या रुपात आपल्या समोर आहे. तर तिच्यासाठी असा दुजाभाव करून तिला वेगळे ठेवून तिचा अपमान होतो आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आणि खऱ्याखुऱ्या काळभैरवाच्या निर्मिती कशी झाली हे लक्षात घेतले पाहिजे. त्याची जयंती आपण त्याची निर्मिती मुळात स्त्री रक्षणासाठी झाली आहेत हे लक्षात घेऊन साजरी केली पाहिजे.
Nice
ReplyDelete