चंपाषष्ठी : मल्हारी मार्तंड

 चंपाषष्ठी : मल्हारी मार्तंड

अलोक पवार

आयुष्य हे प्रॅक्टिकली जगावे हे हिंदू संस्कृतीमध्ये खूप खचून खचून सांगितले गेले आहे. सुरवात अगदी देवाधिकांच्या पासूनच आहे. म्हणजे आत्ता थेट प्रकट होऊन कोणताच देव किंवा देवी वरदान देत नाही. पण आधीच्या युगांमध्ये हे प्रमाण खूप होत, म्हणजे एक देव किंवा देवीने वर द्यायचा अगदी अमरत्वाचा किंवा तुझा वध कोण करू शकत नाही वगैरे वगैरे आणि मग दुसऱ्या देवाला किंवा देवीला हे सर्व वर प्रकरण निस्तरावे लागायचे. यातलीच एक भावांची जोडी म्हणजे मणी आणि मल्ल. 

दोघा भावंडाना ब्रम्हदेवाचे वरदान प्राप्त झाले होते आणि हे वरदान साधेसुधे नसून थेट अमरत्वाचे होते. मणी आणि मल्ल दोघा भावंडांनी आपल्या वरदानाचा दुरुपयोग करायला सुरुवात केली होती. त्यांनी अगदी देवांचा राजा इंद्र याला सुद्धा सोडले नाही. इंद्राला राजा म्हणून कुठे एकट्याने युद्ध जिंकले तेंव्हा मणी आणि मल्लाची बाजी तो जिंकणार. यावेळी पण संपूर्ण इंद्र दरबार विष्णू कडे गेले. भगवान विष्णूने असमर्थता दाखविल्यावर ही सर्व मंडळी शंकराकडे गेली. यावेळी शंकराने 'खंडोबा' चे रूप धारण केले. 



खंडोबा हा शंकराचे रूप. त्याच्यासोबत देवी पार्वती देखील असणारच. तिने देखील म्हाळसा देवीचं रूप धारण केले. मला खंडोबा या देवाचे एक आवडते की अगदी आद्य - रूपापासून तो प्रेम - विवाहासाठी प्रसिद्ध आहे. आणि या रुपात तर तो अगदी आंतरजातीय विवाहास देखील पुढे सरसावताना दिसतो. ही गोष्ट समस्त हिंदू म्हणवून घेणाऱ्या माझ्यासारख्या सर्व बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे की आपले कुलदैवत म्हणजे खंडोबा सुद्धा प्रेमविवाह करू शकतो आणि तेही आंतरजातीय पद्धतीने. खंडोबाचा पहिला विवाह म्हाळसेसोबत झाला. म्हाळसा हे देवी पार्वतीचे रूप असून ती नेवाश्याच्या तिमशेट या व्यापारी म्हणजे जातीने लिंगायत वाणी असणाऱ्या घरात जन्मली. लग्न संपन्न झाले. मात्र पुढे देखील कथेत नाट्य असावे तसे खंडोबा ला पुन्हा एकदा प्रेम जडले. अगदी पाहता क्षणी खंडोबा बाणाईच्या प्रेमात पडले. तिला बायको म्हणून स्वीकारावे म्हणून खंडोबाने म्हाळसेसोबत सारीपाट खेळ खेळला. जो हरेल त्याने पूर्ण १२ वर्षे वनवासात राहायचे हा खेळाचा अंतिम डाव होता. खंडोबा मस्तपैकी हा सारीपाटाचा डाव हरले. आणि वनवासाला जायला निघाले. दुसऱ्या बाजूला बाणाईचे मन देखील जिंकायचे होते. बाणाई जातीने धनगर. इथे पण खंडोबा अन्य जातीतील स्त्रीच्या प्रेमात पडलेले. खंडोबाने बाणाई च्या सर्व मेंढरांना तात्पुरते मृत केले. जर माझ्याशी लग्न केले तरच त्यांना पुनर्जीवित करेल ही बाणाई समोर अट घातली. बाणाई ला आपल्या मेंढरांच्या जीवाची धास्ती होती त्यामुळे तिला हे लग्न करावेच लागते. (बाणाई ला इंद्रकन्या असे देखील म्हणतात.) असा हा खंडोबा आणि त्याच्या दोन पत्नी म्हणजे म्हाळसा आणि बाणाई यांच्या आंतरजातीय विवाहाच्या कथा. पुढे म्हाळसा बाणाई ला स्वीकारत नाही म्हणून म्हाळसा गडावर आणि बाणाई गडाच्या पायथ्याशी अशा दोघीही खंडोबा सोबत संसार करतात. 

पुन्हा इकडे मूळ मुद्दा म्हणजे चंपाषष्ठीकडे येवूयात. सर्वत्रच त्राही माजवणाऱ्या मणी आणि मल्ल याला सगळेच त्रासले होते. खंडोबाने त्यांचा संहार करण्याचा विडा उचलला होता आणि त्यासाठीच अगदी कार्तिकेयला सेनापती बनवून मोठ्या सैन्यानिशी खंडोबाने त्या दोघांवर चाल केली. मनीची छाती फोडून त्याचा नाश केला. तो अगदीच जमीनदोस्त झाला. मणीने त्याची इच्छा व्यक्त केली की मला नेहमी खंडोबा यांच्या पायथ्याशी जागा मिळो आणि त्याचा अश्वरूप खंडोबा सोबत राहो. याच प्रकारे मल्ल राक्षस देखील पराभूत झाला आणि त्यानेदेखील मृत्युपूर्वी माझे नाव देवाच्या आधी लागावे ही इच्छा व्यक्त केली. ज्यांच्या संहारासाठी देवाने हे रूप घेतले त्यांच्या इच्छा देखील मान्य करणारा हा खंडोबा आणखीन एका नावाने ओळखला गेला, ते नाव म्हणजे मल्हारी मार्तंड

जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणतात. हळदीने पिवळी झालेली ही जेजुरी. खंडोबाने मणी आणि मल्ल राक्षसाना पराभूत करून पावन बनविलेला हा जेजुरी गड. आणि चंपाषष्ठी चा दिवस म्हणजे ज्या दिवशी या दोनही राक्षसांचा संहार झाला. हजारो भक्तांची पावले या जेजुरीकडे वळतात. प्रेमासाठी प्रसिद्ध असलेल्या या देवाकडे संसार सुखाचा होवो ही मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी बरेच नवविवाहित जोडपे लग्न झाल्यावर येतात. देवाला खाऊ तर घालतातच शिवाय तेथील मनी आणि मल्ल यांसारख्या दैत्यांना देखील खुश केले जाते. त्यांना कोंबडा - बकरा कापला जातो. नव दांम्पत्य जेजुरीला येताना वर आपल्या नववधूला स्वतच्या पायाने चालवत आणत नाही तर वर नववधूला उचलून आणतो आणि आपले प्रेम व्यक्त करतो. एकंदरीतच हा खंडोबा - मल्हारी मार्तंड अवतार ज्याप्रमाणे दैत्यांच्या वधासाठी प्रसिद्ध आहे त्याच प्रमाणे तो प्रेमाच्या कथांसाठी देखील प्रसिद्ध आहे.                      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त