भोगी
भोगी
अलोक पवार
संक्रांतीच्या आधल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा सण अगदी आनंदाने सर्वजण साजरा करतात. भोगी हा सण प्रामुख्याने शेतकरी बांधवांसाठी असलेला सण आहे असे म्हणवायला हरकत नाही. हिंदू सणांचे मूळ मुख्यत्वे शेतकऱ्यांवर एकवटलेले दिसून येते. शेतकरी पावसाळा संपल्यावर जी पिके घेतो ती जानेवारी पर्यंत तयार होतात. याच ऋतूमध्ये प्रचंड थंडी असल्याने शरीर सर्दी, खोकला, ताप अशा गोष्टींना सामोरे जातो. मात्र शरीराला असे रोगी ठेवणे योग्य नाही, त्यामुळे शरीराला काही पौष्टिक खायला भेटले, आरोग्यदायी खायला भेटले तर रोग जवळ येत नाहीत. म्हणूनच म्हणतात, 'खाल भोगी तर राहताल निरोगी नाहीतर होताल रोगी'.
आता हे खाऊ घालण्याचे काम कोणाचे तर शेतकऱ्याचे म्हणून हा शेतकऱ्यांचा सण म्हणले जाते. शेतकरी शेतात भरपूर भाज्या पिकवतो, ज्यात हरबरा, ऊस, शेंगा, मटार, गाजर, वांगी, पालेभाज्या अशी भरपूर येतात. या सर्व भाज्यांना एकत्र करून पौष्टिक भाजी बनवली जाते. जिला आपण भोगीची भाजी म्हणतो. या भाजीसोबत ज्वारी किंवा बाजरीची भाकरी ज्याला वरून तीळ लावले जातात तीही केली जाते. या भाकरीवर लोणी टाकून ते भोगीच्या भाजीसोबत खाल्ले जाते. याच सोबत मुगाची खिचडी देखील या दिवशी केली जाते. तीळ आणि बाजरी उष्ण पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसात ते शरीराला पौष्टिक असे असतात.
ग्रामीण भागात सर्व शेतकऱ्यांनाकडे सर्वच पिके पिकतील असे नसते. त्यामुळे ग्रामीण भागात या सर्व भाज्या एकत्र करून महिला एकमेकींना त्या अगदी हळदी कुंकू लावून देतात. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्याने तो पौष्टिक होतो, त्यामूळे या भाज्या मातीच्या भांड्याचे प्रतीक असल्याने सुगड्यात देतात. गव्हाच्या लोम्ब्या देखील यात असतात. काही लोक गावाला हुरडा खातात, या गव्हाच्या लोम्ब्या याचाच प्रतीक.
या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते, अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अंघोळी केली जाते. निरोगी राहण्याची ही एक प्रथा.
सर्वांना भोगीच्या शुभेच्छा !!!
Comments
Post a Comment