कात्यायिनी देवी : आशेचा महिमा
कात्यायिनी देवी : आशेचा महिमा
डॉ. अलोक पवार
माणूस जन्मला की त्याच्या गरजा वाढत जातात. समाजातील गोष्टी बघितल्या की त्याच्या गरजा वाढत वाढत जातात. मात्र बरेचदा असे बघितले गेले आहे की देव माझाच असावा ही देखील बऱ्याच भक्तांनी आपली गरज दाखवलेली आहे. आणि देव काय हो भक्तीचा भुकेला असतो.
अशीच गोष्ट आहे कात्यायन या भक्ताची. महर्षी कत यांचा पुत्र कात्यायन. तो देवीचा निस्सीम भक्त. देवीने आपल्या घरी जन्म घ्यावा. आपल्या घरी तिचा अवतार प्रकट व्हावा ही त्याची मनापासून इच्छा होती. त्यासाठी त्यांनी भरपूर तप केले. महिषासुर राक्षसाचा त्रास वाढल्याने ब्रम्हा, विष्णू आणि महेश तिघांनी आपल्या शक्ती देऊन एका देवीला निर्माण केले. या देवीची प्रथम पूजा कात्यायन याने केली. आणि म्हणूनच या देवीला कात्यायनी हे नाव पडले. पुढच्या तीन दिवसांना देवी महिषासुराशी युद्धास सज्ज होत होती. कात्यायनाच्या घरी तो तिची पूजा करीत होता. युद्ध जिंकले गेले.
जर आपण कात्यायानीचा महिमा वाचला आणि लक्षात घेतला तर माणूस चांगली कर्मे करण्यासाठी नेहमीच मनाशी आशा बाळगत असतो. या आशा त्याला नेहमी प्रत्येक गोष्ट कशी छान छान होईल याकडे लक्ष देण्यास प्रवृत्त करतो. बरेचदा स्त्रिया जनहितार्थ बऱ्याच गोष्टी संपन्न करीत असतात. लोकांचे कल्याण कसे होईल हे त्यांचे पहिले आणि आद्य कर्तव्य असते. मग त्यामध्ये अगदी प्राथमिक शाळांमधील शिक्षिका यांच्यापासून नवोदित राजकारणामध्ये सरसावलेल्या स्त्रिया ज्या पक्ष बाजूला ठेवून सर्व राजकारणातील गोष्टी शिकून समाजातील प्रत्येक स्तराचा विकास कसाकाय होईल याकडे त्या लक्ष देऊ शकतात. देवी कात्यायनी याच सर्व स्त्रियांचे समर्थन करते.
आज महिषासुर असा राक्षस नाहीये. आणि त्याला मारण्यासाठी देवीला तयार करण्यासाठीची गरज नाहीये. मात्र समाजामध्ये बऱ्याच अशा प्रवृत्ती आहेत ज्या महिशासुरापेक्षा विकृत आहेत. त्यांचा नाश नक्कीच झाला पाहिजे. त्यासाठी देवी नक्कीच अवतार घेणार नाहीये. मग काय ही कात्यायिनी प्रत्येकाच्या शरीरात असते. तिला फक्त जागृत करायची असते. आता तिला जागृत करणे म्हणजे 'अंगात येणे' अशा चालीरीतीबद्दल मी अजिबात बोलत नाहीये. अवतार जागृत करणे म्हणजे आपणच आपल्यातील चांगल्या गोष्टींना ओळखून त्यांना चरितार्थ बनविणे.
जय मा कात्यायनी

Comments
Post a Comment