कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा
डॉ. अलोक पवार
भारतातील बहुतांशी सण हे कृषीप्रधान किंवा निसर्गाशी एकरूप असे दिसून येतात. कोजागिरी पौर्णिमा हा देखील त्यांपैकी एक. शेतकरी मोठ्या भक्ती भावाने शेत कसतो, नांगरतो, त्यात बियाणे पेरतो, मशागत करतो आणि धान्य तयार करतो. याच शेतकऱ्याला हे धान्य विक्री करून पैसा कमवायचा असतो. यासाठी त्याला योग्य ज्ञानाची कास धरायची असते. त्याच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला साक्षात लक्ष्मी पृथ्वीवर फिरत असते. संध्याकाळी चंद्रप्रकाशात लक्ष्मी साक्षात इथे फिरते आणि साक्षात तिच पाहते की कोजागर... म्हणजेच कोण जागे आहे. हे कोण जागे आहे म्हणजे कोण ज्ञान प्राप्ती साठी इच्छुक आहे. शेतकऱ्याला उपदेशून पौर्णिमा असल्याने लक्ष्मी सोबत बळीराजाची देखील पूजा केली जाते.
यादिवशी पृथ्वीभोंवती फिरणारा चंद्र पृथ्वीच्या भरपूर जवळ आलेला असतो, त्यामुळे चंद्र मोठा, सफेद आणि भरपूर तेजस्वी असा दिसतो.
कोकणामध्ये याच पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे देखील म्हणतात. बाजारामध्ये बऱ्याच गोष्टींची रेलचेल असते. त्यामध्येही भाताच्या लोंब्या, कुर्डूची फुले, नाचणी, वराई विविध फुले त्यातही झेंडू अशा गोष्टी बहुतांश पणे बघयला भेटतात.
जेवायला घरी तांदळाची खीर, पाटोड्या, घरासमोर उगवलेल्या भाज्या असा नवान्न आहार नैवैद्य म्हणून केला जातो. आटवलेल्या दुधात चंद्रप्रकाश घेऊन ते पिले जाते. कोजागिरी पोर्णिमा आणि सुगंधी दूध हे समीकरण अतिशय महत्वाचे आहे असे म्हणल जाते.

Comments
Post a Comment