रक्षाबंधन

 रक्षाबंधन

डॉ. अलोक पवार

लहानपणी राखी बांधून घ्यायची म्हणजे अगदी उत्साह असायचा अजूनही हा उत्साह आहेच. म्हणजे माझ्या आवडीची राखीच पाहिजे. त्यावर अमुक तमुक कार्टून पाहिजे, गाडीची राखी पाहिजे, शक्तिमान ची, सुपर हिरोची राखी पाहिजे. म्हणजे त्या काळी रक्षाबंधन या दिवसाचे महत्व काय माहिती. मला पाहिजे, माझ्यासाठी पाहिजे शक्यतो हिच भावना सर्व लहान भावंडात असतेच. आणि मुलांमध्ये बर भावना, मुली ही भावना जोपासू शकत नाहीच. कारण हे रक्षा सूत फक्त आणि फक्त भावाच्या मनगटावर बांधले जाते. 

असो आजच्या लेखात मी धार्मिक, ऐतिहासिक आणि अलोक - स्टाईल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. जर धार्मिक गोष्टी बघायला गेलो तर इंद्राच्या बायकोला 'शूचीला' विष्णुकडून एक धागा मिळालेला. हा विष्णू म्हणजे तोच जो कधी कठोर रामाचा अवतार घेतो कधी प्रेमळ कृष्णाचा अवतार घेतो, कधी तोच कृष्ण विठेवरचा विठ्ठल बनतो. वृत्रासूर नावाच्या दैत्यासोबत युद्ध होते. त्यावेळी शुची ने तो धागा इंद्राच्या मनगटावर बांधला. आणि इंद्र ते युद्ध जिंकला. ही सत्य घटना असेल किंवा आख्यायिका असेल. काही गोष्टी समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहेत. इंद्र हा शुचीचा भाऊ नव्हता नात्याने पती होता. तसेच देवांचा किंवा संपूर्णच त्या जगताचा राजा होता. राजाचे कर्तव्य आहे की प्रजेच रक्षण करणे. 

दुसरी गोष्ट आहे, द्रौपतीची. सारिपाट खेळात सर्व काही हरलेल्या पांडवांना जेंव्हा काही सुचत नाही तेंव्हा त्यांनी द्रौपती म्हणजे आपल्या पत्नीला देखील खेळामध्ये हरली व तिचे चिरहरण होत होते तिची साडी भर दरबारामध्ये फेडली जात होती त्यावेळी लीलाधार कृष्णाने तिला वस्त्र बहाल करून तिचे रक्षण केले होते. माझ्या चरित्रावर जेंव्हा प्रश्न उठवला जातोय तेंव्हा एक नाही माझे पाच पती असून सुद्धा माझे रक्षण श्रीकृष्ण करतोय, तेव्हा द्रौपती साठी तो एक जवळचा सखा झाला होता. पुढे कृष्णाच्या मनगटातून ज्यावेळी रक्त वाहत होते तेंव्हा आपल्या वस्त्राचा एक धागा द्रौपतीने त्याचे वाहते रक्त थांबण्यास बांधला होता. या गोष्टीतही द्रौपती ही कृष्णाची थेट किंवा सख्खी बहीण नव्हती.

इतिहासात डोकावल तर अजूनही काही गोष्टी समोर येतात, सर्वात पाहिले आपले छत्रपती शिवाजी महाराज. काही झाल तरी युद्ध करावेच लागते. प्रजेच अंतिम हित महत्वाचं असते. मात्र या युद्धात नकळत लहान बालके आणि स्त्रिया ही अक्षरश: रस्तावर येतात. युद्ध संपले की युद्ध भूमीबार हरलेल्या मुघल लोकांच्या बायका यायच्या. मात्र या स्त्रियांच्या त्या वेळीच्या भावना या विरहाच्या असायच्या. तरीही संयमी महाराजांची सर्व मावळ्यांना ताकीत असायची अगदी शत्रूची स्त्री जरी युद्ध भूमीवर असेल तरीही तिला साडी - चोळी देऊन तिच्या घरी तिला सुखरूप सोडवून यायचे. शिवाजी महाराज आणि या सर्व मुघल स्त्रिया यांच्यातही तसे पाहिले तर सख्या बहीण भावाचे नाते मुळीच नव्हते. 

चित्तोड प्रदेशाची राणी कर्मवती हिने देखील हुमायून बादशहाला  राखी पाठवून दिली होती. या राखीचे मोल म्हणून त्या बादशहाने देखील बहादूर शहाच्या आक्रमणापासून चित्तोड प्रदेश संरक्षित केला होता. या ठिकाणी कर्मवती राणी किंवा हुमायून हे देखील बहीण भाऊ नव्हते. त्यांच्यात तर एका धर्माचे असे देखील नव्हते. 

हा झाला सर्व धार्मिक आणि ऐतिहासिक रक्षाबंधनचा भाग. धार्मिक असो किंवा ऐतिहासिक रक्षाबंधन यामध्ये एका प्रकारचे नाते आहे. बहीण भावाचे थेट नसावे पण आहे. काही ठिकाणी नाते आहे, निर्माण केलेले नाते आहे किंवा अगदीच निर्माण झालेले नाते आहे. प्रत्येक नात्यामध्ये एका नात्याकडून दुसरे नाते रक्षणार्थ नाते बांधले गेलेले आहे. रेखा चा एक चित्रपट आहे, ज्यामध्ये तिचा अर्ध्याहून लहान वयाचा भाऊ तिला म्हणतो, "दीदी मेरे हाथ मे राखी बांधो मे बडा होके आपकी रक्षा करुंगा". रेखा ने त्याला दिलेले उत्तर खूप विचार करण्यासारखे आहे. ती त्याला म्हणते, "तु तो बहुत छोटा हे तु क्या मेरी रक्षा करेगा." इथे प्रश्न असा आहे मग बहिणी म्हणजे स्त्री वर्ग रक्षण करूच शकत नाही का? खर तर रक्षणार्थ जो समर्थ आहे राखी त्याच्या हातावर बांधली पाहिजे आणि ज्याला रक्षण हवे आहे त्याने ती बांधावी. 

धार्मिक पडसाद पाहायला गेल्यास द्रौपती आणि कृष्णाची गोष्ट इतिहासात सांगितली जाते, पण या ठिकाणी श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांचे नरकासुराशी युद्ध हे पाहिल्यास कृष्ण तर त्या युद्धात बेशुद्ध होऊन पडला होता. त्या ठिकाणी एकंदरीतच ते युद्ध सत्यभामेने तारले होते. म्हणजे या ठिकाणी सत्यभामा ही स्त्री असून युद्ध पातळी वर पुरुषाचे संरक्षण करू शकते हे तीने दाखवून दिले. आजकाल बऱ्याच क्षेत्रात एखादा व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीचे रक्षण करत असेल तर ते होते रक्षेचे बंधन.

जमिनीच्या वाटण्यांची जेंव्हा वेळ येते तेंव्हा अजूनही काही ठराविक शहरी बऱ्यापैकी ग्रामीण भागात बहिणींच्या वाटण्यांची भावाच्या नावे जमीन करण्याचे ना हरकत प्रमाणपत्र सहि करून घेतले जाते. बहिणी आनंदाने हे सर्व करतात देखील. बहिणींना कायद्याने समान वाटा असूनही भाऊ रक्षा सूत बांधतात. बहिणीला ओवाळणी देतात. मात्र एकदा ना हरकत प्रमाणपत्र दिलेल्या भावासाठी बहिणीने किती मोठी ओवाळणी दिलेली आहे या गोष्टीचा पण विचार रक्षाबंधनाच्या दिवशी झाला पाहिजे. बहिणींचे रक्षण करणे म्हणजे तिच्या शिक्षणाचे रक्षण करणे, तिच्या आरोग्याचे रक्षण करणे, तिच्या रोजगाराचे रक्षण करणे, तिच्या मानसिक स्वास्थाचे रक्षण करणे. 

Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त